- मयूर पठाडे
एचवन बी व्हिसाचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे नियम बदलून ट्रम्प प्रशासनानं अनेक तरुणांच्या पोटात गोळा आणला.
सुरुवातीला एचवन बी व्हिसाच्या संख्येवर टाच आणताना अनेक कॉम्प्युटर प्रोग्रार्मसचा पत्ता तर ट्रम्प प्रशासनानं कट केलाच, पण अनेक नवे मापदंडही लावले.
ज्यांच्याकडे ‘विशेष’ प्रकारचं शिक्षण किंवा ज्ञान आहे त्यांनाच आता एचवन बी व्हिसावर अमेरिकेत प्रवेश दिला जाईल असं जाहीर झाल्यानंतर त्याबद्दल काही जणांनी आनंदही व्यक्त केला होता. कारण ज्यांना खरोखरच अमेरिकेत जाण्याची गरज आहे अशा कौशल्यपूर्ण व्यक्तींच्या हक्कावर आता गदा येणार नाही असं म्हटलं जात होतं, पण तोही आनंद कालच ट्रम्प यांनी हिरावून घेतला आहे.
अर्थातच या सार्या बदलत्या नियमांचा सर्वाधिक फटका भारतीय आयटी कंपन्या आणि आयटीतील तरुणांना बसणार आहे.
सध्या अमेरिकेत असलेल्या अनेक भारतीयांनी तर ट्रम्प प्रशासनाच्या भीतीनं भारतात येणंही रद्द केलं आहे.
न जाणो, गेलोच भारतात आणि ट्रम्प यांनी आपल्याला पुन्हा अमेरिकेत पायच ठेऊ दिला नाही तर काय घ्या, या भीतीनं अनेक तरुणांनी भारतभेटीवर येण्याचं टाळलं आहे.
तशा प्रकारचे किस्सेही भारतीय तरुणांबाबत घडलेले आहेत.
अगोदरच ठरल्याप्रमाणे हे तरुण भारतात तर आले, पण पुन्हा अमेरिकेत परतण्याचं त्यांनी ठरवलं, तर त्यांच्यासाठीचे दरवाजे अमेरिकेनं बंद केलेले होते. त्यासाठीचा नवा संघर्ष आता त्यांना करावा लागत आहे.
थोडक्यात अमेरिकेची उक्ती आणि कृती यात तारतम्य असेलच याची काहीच खात्री सध्या राहिलेली नाही.
ते वारंवार दिसतंय.
एचवन बी व्हिसावर स्किल्ड प्रोफेशनल्सनाच प्रवेश दिला जाईल असं अगोदर अमेरिकेनं जाहीर केलं असलं तरी आता पुन्हा नियमांत बदल करून अशा विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींच्या प्रवेशावरही एका आदेशाद्वारे बंधनं आणली आहेत.
‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या नव्या धोरणानुसार अमेरिकन नागरिकांबाबत कोणताही दुजाभाव होणार नाही, कमी पगारावर भारतीय आणि इतर देशांतील तरुणांना नोकर्या देऊन अमेरिकन बेकार होणार नाहीत याची सर्वतोपरी काळजी ट्रम्प घेत आहेत.
त्यामुळेच आणखी एक नवा धक्का अमेरिका देण्याच्या तयारीत आहे.
त्याचीही सारी तयारी पूर्ण झाली आहे.
एचवन बी व्हिसावर सध्या अमेरिकेत लॉटरी पद्धतीनं प्रवेश दिला जात आहे.
ही लॉटरी पद्धतही आता लवकरच बंद होणार आहे.
ज्यांच्याकडे ‘मेरिट’ आहे आणि मेरिटचं ज्याचं नाणं खणखणीतपणे वाजेल, अमेरिकन लोकांना ज्यांचा खरोखरच उपयोग होईल अशाच लोकांना आम्ही आता प्रवेश देऊ असं त्यांनी जाहीर केलंय.
त्यात आणखी किती भारतीय तरुणांचा बळी जाईल हे काळच ठरवेल.
अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणार्या भारतीय तरुणांची संख्या प्रचंड आहे आणि दरवर्षी हजारो भारतीय तरुण त्यासाठी प्रय} करीत असतात, हे तर जगजाहीर आहेच, पण अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलियानेही आपल्याला तडाखा दिला आहे. अस्थायी विदेशी कामगारांसाठीचा व्हिसा कार्यक्रम त्यांनी रद्द केला आहे.
महत्वाकांक्षी भारतीय तरुणांच्या वाटा अडवण्याचं काम सध्या बर्याच ठिकाणाहून होतं आहे.
भारतीय तरुणांनाही आता वेगळा विचार करावा लागेल.
तो तातडीनं केला तर ठीक, नाहीतर एचवन बीच्या अपेक्षेवर अजूनही अवलंबून राहिलं तर सारंच मुसळ केरात जायला वेळा लागणार नाही.