- प्रज्ञा शिदोरे
स्टीफन हॉकिंग. त्यांचं व्यक्तिमत्त्व अलौकिक होते. त्यांनी दुर्धर आजारावर मात करून कृष्णविवरांवर (ब्लॅक होल्स) लक्षवेधी संशोधन केलं हे तर आपण जाणतोच. मोटर न्यूरॉन डिसीजसारख्या दुर्धर आजारावर मात करून त्यांनी विज्ञान संशोधनात मोठं काम उभारलं. आजारामुळे चालता-बोलता येत नव्हतं; पण व्हीलचेअरवर बसून संगणकाच्या मदतीनं ते सगळ्या गोष्टी करीत होते. त्यांचे विचार, त्यांचं आयुष्य, चिवटवृत्ती आणि समर्पण सारंच अत्यंत प्रेरणादायी आहे.हॉकिंग २१ वर्षांचे असताना त्यांना त्यांच्या या आजाराचे निदान झालं. डॉक्टारांनी त्यांना सांगितलं की ‘याच्याकडे २ वर्षांचं आयुष्य असेल.’ तेव्हा ते आॅक्सफर्ड विद्यापीठात शिकत होते. याचाच अर्थ त्यांचं सगळं काम त्यांनी त्या आजारावर मात करत पूर्ण केलं.१९९१ साली दिग्दर्शक स्टीफन स्पीलबर्ग यांनी हॉकिंग यांच्या आयुष्यावर एक चित्रपट काढला. इतक्यात, म्हणजे २०१४ मध्ये ‘थिअरी आॅफ एव्हरीथिंग’ नावाचा चित्रपटही बराच गाजला. २००८ साली हॉकिंग यांनी टेड टॉकमध्ये एक भाषण केलं. त्यात त्यांनी काही मूलभूत प्रश्नांवर कसं संशोधन सुरू आहे याचा आढावा घेतला. यामध्ये, आपण म्हणजे मानव कुठून आला, तो कुठे चालला आहे, आपल्या पृथ्वीचं भविष्य काय, इत्यादी प्रश्न आहेत. तुम्हाला हॉकिंग यांच्या खासगी आयुष्याबद्दलही वाचायचं असेल तर जेन हॉकिंग, त्यांची पहिली पत्नी यांनी लिहिलेलं ‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी- माय लाइफ विथ स्टीफन हॉकिंग’ हे नक्की वाचा. याचं मराठी भाषांतरही उपलब्ध आहे.हे टेड टॉकही पाहता येईल.. https://www.ted.com/talks/stephen_hawking_asks_big_questions_about_the_universe
( pradnya.shidore@gmail.com )