गेल्या आठवडय़ातील एक बातमी. एका भावानं बहिणीचाच खून केल्याची. निमित्त होतं, तिनं तंग कपडे घातल्याचं! आपल्या बहिणीला ‘त्या’ भावानं अनेकदा सांगितलं होतं, की तू ‘असे’ कपडे घालत जाऊ नकोस, मला आवडत नाही.
पण तिनं ऐकलं नाही. आणि त्यामुळे संताप होऊन त्या भावानं घरातच (तेही आई घरात असताना) त्या बहिणीला बेदम मारहाण केली, आणि तिचा जीवच घेतला. हा भाऊ संतापी आहे, मनोरुग्ण आहे असं नंतर त्याच्या आईनं पोलिसांना सांगितलं!
आता पोलीस तपास सुरू असल्यानं नेमकं खरंखोटं यथावकाश समोर येईलच! म्हणूनच त्या केसविषयी अधिक बोलण्यात काही हाशील नाही.
पण निमित्त या घटनेचं.
त्यातून आठवली अधनंमधनं खेडय़ापाडय़ातून ‘ऑक्सिजन’ला येणारी पत्रं.
कुणा बहिणीचं, एखाद्या भावाचंही, कुणा मैत्रिणीचं आणि तिच्या मैत्रिणीचंही.
कहाणी असते घरातल्या बदललेल्या चित्रची.
अनेक मुली लिहितातही की, आमच्या घरात आता आईवडील मुलगा-मुलगी असा काही भेद करत नाहीत. थोडी भावाला मोकळीक जास्त असते, पण मुलगी आहोत म्हणून शिक्षण, इतर सुविधा यात काही दुजाभाव होत नाही. उलट मुलगी म्हणून लाड जास्त होतात, हट्ट पुरवले जातात, राग झेलला जातो. कपडय़ालत्त्याचे, सिनेमाचेही लाड पुरवले जातात.
पण मोठय़ाच कशाला, धाकटय़ा भावाला मात्र अनेक प्रकारचे ‘ऑब्जेक्शन’ असतात. आम्ही जातो कुठं, येतो कुठून, किती वाजता परत येतो, आमच्या मैत्रिणी कोण, त्यांचे मित्र कोण, आम्ही मुलांशी बोलतो का, काय बोलतो, कुठल्या मुलांशी बोलतो, काय कपडे घालतो, कुठल्या सिनेमाला जातो, कुठल्या हॉटेलात जातो.
यावर त्यांची बारीक नजर असते. त्यांचीच कशाला, त्यांच्या मित्रंचीही. तेही चहाडय़ा करतात. तुझी बहीण अमक्या ग्रुपमधे दिसली, अमक्या पोराबरोबर तमक्या ठिकाणी दिसली हे सगळं ते भावांना सांगतात.
मग घरी आले की त्याची उलटतपासणी सुरू. आईबाबांचे कान फुंकणे सुरू. त्यावरून चिक्कार भांडणं होतात. संताप होतो.
हे कमीच होतं म्हणून आता आमच्या फेसबुकवर नजर. व्हॉट्सअॅपवर नजर. सतत फोन चेक करणार, वाचणार आम्ही कुणाकुणाशी बोलतो.
हे सगळं का? कशासाठी? कुणासाठी?
- असं त्रगा करत अनेक मुली लिहितात. त्यांना हे कळतं आणि मान्यही असतं की, आपले भाऊ हे सारं आपल्या काळजीपोटी करतात. त्यांना आपल्याविषयी प्रेम आहे, आपण त्यांची जबाबदारी आहोत असं वाटूनच ते इतकी जिवापाड काळजी घेतात.
मात्र त्यांचा हा आक्षेप असतो की, आम्ही आमची काळजी घेऊ शकू, असा आमच्याविषयी विश्वास का वाटत नाही? आम्ही काही गैर करू असं का वाटतं? आम्ही म्हणजे जोखीम असाच एकूण सूर का?
आईबाबा पण भावाचीच बाजू घेत म्हणतात की, तो असतो ना सोबत म्हणून आमच्या जिवाला घोर नाही, असं का?
***
या प्रश्नांची उत्तरं ‘ऑक्सिजन’कडे रेडिमेड नाहीत पण तुमच्याकडे असतील?
घरोघरच्या बहीण-भावांकडे?
त्यांच्या बदलत्या नात्याकडे?
भावांचीही या सा:यात काही बाजू असेलच ना?
आणि बहिणींची?
बहिणींच्या आक्षेपांचं काय की, जे आम्ही करू नये असं वाटतं ते सारं हा भाऊ करतो, त्याची मैत्रीण करते. त्याला मैत्रिणीनं बेधडक असलेलं चालतं, पण बहिणीनं नाही, असं का?
या प्रश्नांचंही उत्तर असेलच ना भावाकडे?
- एकदा शोधायचीच का या सा:या प्रश्नांची उत्तरं.
- शोधूयात.
निमित्त येत्या राखीपौर्णिमेचंही आहेच!
त्यानिमित्त बघू शोधू की, बहीण-भावाचं हे प्रेमाचं नातं कसं बदलतंय? बहरतंय की कोमेजतंय? हक्क सांगतंय की हक्काचं होतंय?
- बोलूच, जरा मनापासून आणि खरंखरं!
- ऑक्सिजन टीम
दादाताई आणइ हक्कबिक्क
तुम्ही बहीण असाल तर.
तुमच्या नात्यात अनुभवलाय तुम्ही असा काही ताण?
तुमचा भाऊ असा अतीच काळजीनं तुमच्यावर बंधनं घालतो असा काही अनुभव आहे तुमचा?
त्रस होतो त्याचा?
तो आपल्या आयुष्यात जास्त लुडबूड करतो असा काही फिल आहे?
आणि ती लुडबूड म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं?
नेमकं काय करतो तो, ज्याचा तुम्हाला त्रस होतो?
का करतो?
मुख्य म्हणजे एरवी प्रेमळ असणारा आपला भाऊ असा का वागतो, असं तुम्हाला वाटतो?
तो समाजाला घाबरतो, इतर मुलांना घाबरतो,
असुरक्षित असतो?
आपल्या बहिणीमुळे आपल्या घराण्याचं नाव धोक्यात येईल असं त्याला वाटतं?
नेमकं का वागत असेल तो असं तुम्हाला वाटतं?
की नाहीच्चे असं काही?
असंही असेल की तुमचा असा काही अनुभव नसेल,
तुमची आणि तुमच्या भावाची छान दोस्ती असेल.
तुम्हीच त्याच्यावर ताईगिरी करत असाल?
ते छान मस्त दोस्तीचं नातं असेल तुमचं तर ते तसं का आहे हेदेखील सांगा.
तुम्ही भाऊ असाल तर.
आपल्याच बहिणीला आपला त्रस होतो, ती आपला राग राग करत असेल हे वाचूनही त्रस झाला ना?
पण असं होतं का, तुम्ही नाही तर भाऊ असलेले तुमचे मित्र असे वागतात का?
बहिणीवर सतत नजर ठेवतात का?
की तुमचे मित्र, ते तुम्हाला भरवतात आणि बहिणीकडे जरा लक्ष दे म्हणतात.
की तुम्हालाच वाटते की, आपली जबाबदारी आहे. एखादा कुणी लफंगा आपल्या बहिणीला फूस लावू शकतो?
ती बाहेर ‘सेफ’ नाही. तिच्या मैत्रिणी चांगल्या नाहीत?
असं बरंच काही तुम्हाला छळत असेल?
ते छळणारं नेमकं काय असतं?
का असतं?
केवळ समाज, अवतीभोवतीचं जग म्हणून तुम्हाला ही काळजी घ्यावी लागते का?
नेमकं भाऊ म्हणून होतं काय तुमचं?
घरात आईबाबा पण तुम्हालाच धारेवर धरतात का? भाऊ असून तू काय करतोस असं विचारतात का?
की नाहीच्चे असं काही?
असंही असेल की तुमचा असा काही अनुभव नसेल,
तुमची आणि तुमच्या बहिणीची छान दोस्ती असेल.
तर ती कशामुळे?
कसं जमवलं तुम्ही हे मस्त फ्रेण्डली नातं.?
तेदेखील लिहा.
पाकिटावर- दादाताई आणि हक्कंबिक्कं
असा उल्लेख करायला विसरू नका.
आमचा पत्ता शेवटच्या पानावर तळाशी.
तुम्ही मेलही करू शकता, oxygen@lokmat.com
अंतिम मुदत- 20 ऑगस्ट 2015