प्राची खाडे (स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर) -
नवीनवी नोकरी लागते, ऑफिसातलं वातावरण चकाचक. आपले कॉलेजातले कपडे अगदीच कॅज्युअल वाटतात आणि पंजाबी ड्रेस घालून जावं तर फारच ‘टिपीकल’ वाटतं. पण शर्ट-पॅण्ट् ‘फॉर्मल्स’ म्हणून वापरणंही बरं दिसत नाही, अशावेळी आपल्या नेहमीच्याच पंजाबी ड्रेसेसना काही पर्याय नसतो. पण ते म्हणजे जुनाट असं कुणी सांगितलं. सीमी गरेवाल कायम पांढरे कपडे वापरायची, शबाना आझमी किंवा नंदिता दास साध्या कॉटनच्या साड्या नेसतात. नंदिता तर त्यावर दाट काजळही लावते, तीच तिची खास स्टाइल बनली आहे. असं आपण करू शकतो का, ऑफिसवेअर म्हणून जर आपण ट्रॅडिशनल पंजाबी ड्रेस घालणार असू तर त्याला स्मार्ट-ट्रेण्डी तरीही फॉर्मल लूक कसा देता येईल?
त्यासाठीच हवं योग्य स्टायलिंग.
१) मेक इट फॉर्मल
ऑफिसमधे पंजाबी ड्रेस घालून जाताना काही गोष्टी डोक्यात क्लिअर असाव्यात. एकतर आपण ऑफिसला जातोय लग्नाला नाही, हे पक्कं लक्षात ठेवायचं. त्यामुळे ऑफिस साठी वापरण्याच्या पंजाबी ड्रेसचे रंग, पॅटर्न, प्रिण्ट्स अगदी सावधपणे निवडायला हवेत.
हे मस्टच
सटल कलरचे अर्थात फिकट रंग निवडा. त्यावर प्रिण्टही साधंच असावं.
चेक्स, रेघारेघांचे, जिओमॅट्रिक्स प्रिण्ट्सचे पंजाबी ड्रेसेस ऑफिससाठी परफेक्ट.
हे टाळाच.
फ्लोरल प्रिण्टचे कपडे ऑफिसला जाताना वापरू नयेत. फ्लोरल, फुलाफुलांचे डिझाईन्स फॉर्मल नाही, कॅज्युअल मानले जातात.
एम्ब्रॉयडरी केलेले, मणी-चमकी-टिकल्यांचे काम असलेले कपडे नकोच.
शिफॉनसारखे सुळसुळीत कपडेही ऑफिसला जाताना न घालणंच उत्तम.
2) कीप इट कम्फर्टेबल
खोल गळे, उघड्या पाठींचे ड्रेस, ब्लाऊज ऑफिसमधे घालून जायचं नाही म्हणजे नाहीच. सतत कुणीतरी छातीवर सरकणारा दुपट्टासारखा करतंय. हे अत्यंत अनप्रोफेशनल दिसतं.
हे मस्टच.
दुपट्टा किंवा साडीचा पदर नीट पिनप करा. ज्या कपड्यात अन् कम्फर्टेबल वाटतं, अकारण पुरुष सहकार्यांच्या माना वळतात तसले कपडे न घालणं, आणि स्वत:ची प्रतिमा बिघडू न देणं उत्तम.
३) स्टाइल इट वेल
तुम्ही म्हणाल की, मग काय काकूबाईसारखंच रहायचं का? बोअरिंग कपडे घालायचे का? पण साध्या स्टायलिंगनेही तुम्ही स्मार्ट दिसूच शकता.
हे मस्टच.
तुमचा ड्रेस साधा, उत्तम फिटिंगचा असेल तर तो छानच दिसतो. त्याला जोड म्हणून नेमके आणि मोजके दागिने घाला.
एखादी मोत्याची सर. साधीशी सोन्याची किंवा चादीची चेन. नाजूक कानातले, एखादीच अंगठी, छानसं ब्रेसलेट. हे एवढं केलं तरी तुम्ही वेगळ्या दिसाल, एक स्टेटमेण्ट कराल, जे सोबर, प्रोफेशनल असेल. पंजाबी ड्रेसेसमधे घाम जास्त येतो त्यामुळे चांगल्या दर्जाचा डिओडरण्ट वापरा.
हे टाळाच.
चमकधमकचे, आवाज करणारे दागिने ऑफिसात घालू नका. खूप दागिने तर अजिबात नको. मेकप करतानाही प्लेन-बेसिक असावा. साधीशीच लिपस्टिक. डार्कशेड नकोच आणि कशीबशी घाईघाईत फासलेलीही नकोच नको.