तुफान जुमानतच नाही.
काय सांगू? तुफान सांभाळतोय घरात. जीव मुठीत धरून जगतोय. आपल्या पोटच्या पोरांची भीतीच वाटते. एक शब्द बोलताना शंभरदा विचार करते मी.’’
- ही वाक्यं आहेत एका आईची. 15 वर्षाच्या मुलांच्या जगात फिरताना, त्यांचे पालक भेटले. विशेषत: अनेक चिअरफूल मैत्रिणीसारख्या आया भेटल्या. हेही लक्षात आलं की, या मुलांची घरात सगळ्यात जास्त दोस्ती आईशी आहे आणि सगळ्यात जास्त तक्रारीही आईविषयीच आहेत.
पण आईला काय वाटतं, आपल्या या वयातल्या मुलांविषयी? कसं समजून घेतात त्या आपल्याच अडनिडय़ा वयातल्या मुलामुलींना?
खरं सांगायचं तर या आयाच मुलांपेक्षा जास्त पिचलेल्या दिसतात. एकीकडे मुलामुलींच्या कलानं घ्यायचं, त्यांचं मन-मर्जी राखायची आणि दुसरीकडे नवरा, घरातली मोठी माणसं यांनाही समजून घेत, मुलांपुढे ढाल होऊन उभं राहत सारे वार ङोलायचे.
अनेक आयांनी तर कळवळून सांगितलं की, ‘ भीतीच वाटते या मुलांशी बोलताना, काय करतील नेम नाही. नाही म्हणायची तर सोयच नाही. नुस्ते तुफान. काही करू नको म्हटलं की नुस्ता धिंगाणा, रडारडा, तमाशा. इतकं बोलतात की आपण गप्प रहावं.’
बोलताना अनेक आयांच्या चेह:यावर भीतीच दिसते. मुलंमुली घरकाम नको म्हणतात, काम सांगितलं तर अभ्यासाचे बहाने सांगतात, मित्रंशी तासंतास बोलतात पण आईनं एक प्रश्न विचारला तर लगेच चिडतात. वाट्टेल ते बोलतात, अपमान करतात. पैसे दिले नाही तर नुस्ता थयथयाट, रडरडून घर डोक्यावर घेतात.आणि हे सारं असहाय्यपणो पाहण्यावाचून आपण काहीच करू शकत नाही.
असं अनेक आयांनी सांगितलं.
का पण असं होतं? इतक्या का तुम्ही दबून राहता असं विचारलं तर त्या सांगतात, ‘ ही मुलं जीवाचं काही करुन घेतील अशी भीती वाटते, म्हणून सांभाळून घेतो.’
पण म्हणजे या मुलांमधे काहीच चांगलं आयांना दिसत नाही असं नाही. उलट आपली मुलं उत्तम बोलतात, खूप कॉन्फिडण्ट आहे, आपल्यासारखं भिडेभिडे जगत नाहीत, खूप हुशार आहे, देखणी दिसतात, मनासारखं जगू पाहतात याचं तमाम आयांना अप्रूप आहेच..
अभिमानही आहे मुलांचा.
पण.?
हा ‘पण ’ त्यांना घाबरवतो.
हे तुफान मोठं होतंय अशी भावना त्यांना हादरवते.
पोटात गोळा आणते.