- संजय अप्तुरकरसहयोगी वैज्ञानिक,महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर
गाव काटेपूर्णा (कुरणखेड), जिल्हा अकोला. बालवाडी ते दहावीपर्यंतचं शिक्षण या गावातच झालं. इथं आपण एक नंबरी होतो. जून १९९२. गावं सुटलं, पुढची दोन वर्षं श्री शिवाजी कॉलेज, अकोला. इथं गंमत सुरू झाली. मी ‘खानदानी’ मराठी माध्यमातून शिकलो. इकडे सायन्स घेतलं. इंग्रजी मीडिअम. पहिले सहा महिने रोज संध्याकाळी आपलं ‘रडणं’ सुरू व्हायचं.. मला इंग्रजी समजत नाही, मी ‘आटर््स’ घेतो’. मला माझी मावशी सांगायची, ‘थोड्या दिवसांत जमून जाईल’. कॉलेजमध्ये माझ्यासारखा मित्र भेटला.. श्याम माहोरे. दोघंही ‘बॉटनी’चा वर्ग सोडत नव्हतो, कारण तेवढंच समजत होतं. आॅक्टोबर १९९२ मध्ये ‘ट्युशन’ सुरू झाल्या. रोज जवळपास पंचवीस किलोमीटरची ‘सायकल’ चालवून, बऱ्यापैकी जम बसला. पण शेवटी इंग्रजीनं दगा दिला. घरी ‘रणकंदन’. तेवढ्यात आमचं अकोल्यात होतं ते बिºहाड गावात स्थलांतरित झालं. रि-अॅडमिशन घेतली आणि रूम करून राहत होतो, रविनगर अकोला. बारावी पास झालो. अॅडमिशनकरता ‘कृषी महाविद्यालय’ अकोल्याची ‘आस’ घेऊन होतो, पण मिळालं नागपूर, सप्टेंबर १९९५, आपली रवानगी ‘ओल्ड होस्टेल, ‘कृषी महाविद्यालय’. रॅगिंग, सामाजिक सलोखा आणि इतर शिकवण सगळं मजेदार होतं.सोबतीचे बहुतेक वर्गमित्र पत्ता सांगताना मु+पो.+ता+जि. असंच सांगायचे. सगळेच ग्रामीण. इथं भेटला किंगमेकर ‘नित्या’ ऊर्फ आजचा डॉ. योगेश इंगळे. चार वर्षे गेली, डिग्री हातात आली, पुढे काय करायचं कळतच नव्हतं. आमच्या आधीच्या बॅचमध्ये २०-२२ सिनिअर एम.एस्सी. कृषीकरता होणारी राष्टÑीय पातळीवरची परीक्षा पास झाले आणि राज्याबाहेर शिकायला गेले. त्याला ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ मिळत होती. आपण तेच करायचं ‘असं’ ठरवून ‘अभ्यास’ केला. निकाल ‘येरे माझ्या मागल्या’. आपल्याकरता एम.एस्सी.चे दरवाजे बंद. १९९९ गेलं. सन २०००. परत एम.एस्सी. एण्ट्रन्सच्या तयारीला लागलो. यावेळेस म्हणजे जानेवारी ते एप्रिल २००० पर्यंत लहान भावासोबत राहिलो अकोल्यात. तो बी.एच.एम.एस. करत होता. रूम घेऊन राहत होता. कृषी भवन, पुसा, नवी दिल्ली इथंही काही काळ गेलो. अग्रोनॉमी विषयाची परीक्षा देत होतो आणि मार्गदर्शन होतं डॉ. नरेश भरडे सरांचं. ते त्याच विषयात पी.एचडी. करीत होते. थंडी, ऊन आणि दिल्लीची गर्मी असे सगळे अनुभव घेतले त्या ‘दोन’ महिन्यात. आम्ही चार मित्र सोबत होतो. या कृषी भवनात खरा अभ्यास झाला. रोज १८ तासांचं शेड्युल होतं. परीक्षा जवळ आली तशी मित्रांची गर्दी वाढली. त्यावेळेस ‘दोन’ पलंगांवर आळी-पाळीने दहाजण झोपत होतो. एकाला तीन तासांपेक्षा कोणी झोपूच देत नव्हतं. परीक्षा संपली तसे पैसे पण संपले. खिशात ‘रिटर्न तिकीट’ आणि २० रुपये, कसं तरी नागपूरला पोहचलो. एका सिनिअरकडून १०० रुपये उधार घेतले आणि काटेपूर्णा गाठलं. रिझल्टची वाट पाहत महिनाभर गावातच होतो. तो आला आणि आपल्या पायाखालची जमीन सरकली. पेरणीचा हंगाम होता. आईसोबत शेतात जाऊन काम करत होतो. एक दिवस आईला म्हटलं, मी पुढं शिकत नाही, दुसरं काही करतो. आईनं दुसºया दिवशी हजार रुपये हातात दिले आणि साध्या ‘शब्दात’ घराच्या बाहेर ढकलून दिलं. कुठं जावं माहीत नाही. अकोल्यात गेलो, माझे मित्र पी. जी. होस्टेलमध्ये होते, त्यांच्या रूममध्ये राहिलो, ‘पॅरासाईट’. ४ आॅगस्ट २००० ला होस्टेलमध्ये धाड पडली, रात्री पाऊस सुरू, मी आणि आणखी काही मित्र ‘कृषिनगरमधील’ एका दुकानाच्या शेडमध्ये बसलो होतो. दीड वाजता एका मित्राच्या मित्राने रूममध्ये आश्रय दिला. या दरम्यान माझ्यासाठी नितीनने इंदिरा गांधी कृषी विश्व विद्यालय, रायपूरचा फॉर्म मागितला होता. ७ आॅगस्ट २००० शेवटची तारीख होती. ५ तारखेला रायपूरसाठी रेल्वेच्या जनरल डब्यात प्रवास सुरू झाला. मी जवळपास दहा तास उभाच होतो. एकदाचं रायपूर गाठलं. मित्रानं सांगितलं, यावर्षी अॅग्रो मेट्रोलॉजी नवीन डिपार्टमेंट सुरूझालं. तू त्यालाच पहिला प्रेफरन्स दे. मी तेच केलं. फॉर्म सबमिट करून अकोल्यात आलो. अमित दोरकर जालना येथे मार्केटिंगचा जॉब करत होता, त्याच्या सोबत जालना गाठलं. पंधरा दिवस ‘पेस्ट्रीसाइड’ कंपनीत काम केलं. घरी ‘तार’ आली. मला एम.एस्सी. अॅग्रो-मेट्रोलॉजीला अॅडमिशन मिळाली. दोनच दिवसांत पैसे भरायचेत हे सांगायला लहान भाऊ आणि त्याच्या मित्राने जालना गाठलं. मी भोकरदनमध्ये, अमित ‘अंबड’मध्ये, संपर्क करायचं साधन काहीच नाही. मी रात्री आठ वाजता जालन्यात पोहचलो. तसा अकोल्याच्या गाडीत बसलो. भाऊ गावी गेला अॅडमिशनचे पैसे आणायला. कारण माझे हजार रुपये संपले होते. मी अकोल्यात पोहचलो. वडील लहान भावाच्या रूमवर पैसे घेऊन आले होते. लगेच रायपूरची ट्रेन पकडली, अठरा तास प्रवास करून रायपूर गाठलं. सप्टेंबर २००० ते आॅक्टोबर २००२, आपण पी.जी. झालो. दरम्यान, मार्केटिंगमध्ये जॉब मिळाला. जानेवारी २००३. पहिले तीन महिने दिल्लीतच, नंतर ‘कर्नाल’. यादरम्यान मी ‘मध्य प्रदेश रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर, भोपाळ’ येथे ‘प्रोजेक्ट सायंटिस्ट’ पदासाठी अॅप्लिकेशन केल होतं. मुलाखतीची तारीख जवळ आली. पण मी तापानं फणफणत होतो. ठरवलं जायचं नाही. तरीपण रेल्वेचं रिझर्वेशन केलं. दुसºया दिवशी बस पकडून दिल्ली गाठली. पोहचलो. मुलाखत छान झाली. निवडही झाली. पुढे तीन वर्षे तिथंच प्रोजेक्ट सायंटिस्ट म्हणून काम केलं.इथंच मी खºया अर्थाने रिमोट-सेन्सिंग आणि जी.आय.एस. शिकलो. तो प्रोजेक्ट संपला. मग भोपाळमध्ये एका कॉलेजमध्ये पार्ट टाइम ‘लेक्चरर’ म्हणून जॉब केला. पुढे ‘वॉटरशेड आॅर्गनायझेशन ट्रस्ट’ अहमदनगरला ‘टेक्निकल आॅफिसर’ म्हणून काम पाहू लागलो. इथे ट्रेनिंग, सर्व्हे, दौरे आणि सोशल अॅप्लिकेशन सर्वच अनुभव घेता आला. अहमदनगरला यायच्या आधी मी ‘सेंटर फॉर अॅटमॉस्फेरीक सायन्स’ आय.आय.टी. दिल्ली येथे अॅप्लिकेशन केलं होतं. ‘प्रोजेक्ट सायंटिस्ट’ पदाकरिता मुलाखत दिली, निवड झाली आणि परत एकदा दिल्ली. आय.आय.टी.त कामाला सुरुवात झाली. एकदा दिवाळीनंतर घरून परत जाताना सकाळी नागपूरला पोहचलो. इथं महाराष्टÑ रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटरची जाहिरात भेटली. जीवन कातोरे सोबत होताच. गाडी दुपारी १२ वाजताची. सोबत सारी कागदपत्रं होतीच. ११ वाजता मुलाखतीला गेलो. जानेवारी २००८ ची गोष्ट. तिथं निवड झाली. मार्च २००८ पासून आजपर्यंत ‘असोसिएट सायंटिस्ट’ या पदावर काम करत आहे. ड्रीम जॉब आहे माझा.१९९२ मध्ये गाव सुटलं, १९९५ मध्ये घर सुटलं. हजार रुपये देऊन आईनं घराबाहेर काढलं नसतं, नितीनने फॉर्म नसता आणला, अमित दरेकर सोबत नसता, भाऊ जालन्यामध्ये नसता आला, वडील पैसे घेऊन नसते आले तर आज मी हे ‘वन वे तिकीट’ पण लिहिलं नसतं. माझी मुशाफिरी सुरू आहे. कॉलेजमध्ये असताना कधी सहलीला जाता आलं नाही, पण या क्षेत्रात काम करताना जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक सोडून कामानिमित्त प्रत्येक राज्यास भेट देऊन आलो. मी मनापासून जगतोय माझं काम..