- डॉ.भूषण केळकर
बाहेर धो धो पाऊस पडत होता, बायकोला ताप आलेला होता, आम्हा सर्वाच्याच पोटात कावळे ओरडत होते आणि आम्हा चौघांना चार वेगळ्या उपाहारगृहातील गोष्टी खायच्या होत्या. बसल्या बसल्या मुलांनी एक अॅपवरून आमची सोय करून टाकली. चारही हॉटेलमधून आवश्यक त्या उदरभरणाच्या गोष्टी घेऊन गूगलमॅपवरून पत्ता सापडवत ‘डिलिव्हरी’चा माणूस आला; आमची सोय झाली.ज्याला ‘सप्लाय चेन’ किंवा ‘पुरवठा साखळी’ म्हणतात त्याचं हे अत्यंत साधं उदाहरण आहे. इंडस्ट्री 4.0चे या ‘सप्लाय चेन’मध्ये होणारे परिणाम आपण आजच्या संवादात पाहणार आहोत.‘फोर्ब्स’ व ‘गार्टनर’ या जगद्विख्यात संस्था आहेत ज्या माहिती विश्लेषण करता प्रसिद्ध आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, एआयचा वापर सप्लाय चेनमध्ये खूपच वाढेल. त्याचं विश्लेषण करताना त्यांचा अहवाल असं सांगतो की, एकूण आठ भागांमध्ये एआय व इंडस्ट्री 4.0चा प्रभाव जाणवेल.पहिलं म्हणजे अनेक प्रकारच्या अॅप्स व चॅटबॉटद्वारा कच्चामाल व सुटय़ा भागांचे संकलन. दुसरं म्हणजे त्याचं नियोजन व ज्याला जेआयटी (जस्ट इन टाइम) तंत्रज्ञान म्हणतात, त्याप्रकारे मांडणी. तिसरं म्हणजे वेअरहाऊसचं नियोजन, म्हणजे तिथे वस्तू, कच्चामाल, सुटे भाग ठेवले जातात व त्याचबरोबर तयार माल व विक्रीयोग्य वस्तू असतात. अशाचं मापन, देखरेख आणि व्यवस्थापन. साधं उदाहरण बघा र् 2-3 वर्षापूर्वी मित्राबरोबर केरळला गेलो होतो; पण त्या मित्राचं जे पुण्यात दुकान आहे त्यातला स्टॉक किती, आज किती कोणता माल खपला इत्यादीची माहिती एका अॅपवर त्याला केरळमध्ये सहज मिळत होती.चौथा भाग म्हणजे पुरवठा साखळीतील वाहतूक व वस्तूंची ने-आण. तिसर्या व चौथ्या भागांमध्ये प्रामुख्यानं आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) येतं. नुसतं दुकानातल्या दुकानात नव्हे; दोन शहरांमध्ये वा देशांमध्येच नव्हे तर मागल्या महिन्यातील बातमी आहे की सेल बाय मेट नावाची (रइटी3) रोबॉटवर आधारित चालकविरहित बोट संपूर्ण अटलांटिक समुद्र पार करून गेली!‘सप्लाय चेन’चा पाचवा भाग जो डस्ट्री 4.0 मुळे प्रभावित होईन तो आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित सुसंवादाचा. एनपीएल (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग)मुळे भाषांतर, अनुवाद व एकूूणच संवादात एकसूत्रीपणा येईल. सहावा भाग आहे त्यात सीआरएम (कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट) येतं. यात ग्राहकांना आगामी काळात काय आवडेल, लागेल याचा पुरेसा अचूक अंदाज आल्यानं ग्राहकाला राजासारखा मान देणं आणि त्यामुळे ग्राहक खूश राहणं सहजसाध्य आहे. सातवा भाग म्हणजे या पुरवठा साखळीमधील गुणवत्तेवर देखरेख. यामध्ये आयओटी, एआय आणि बिग डाटा ही तीन तंत्रज्ञानं प्रामुख्याने येतात. शेवटचा भाग हा अद्ययावत आहे व तो चौथ्या भागाशी वाहतूक व ने-आण संबंधित आहे. त्यात प्रामुख्याने येते ड्रोन तंत्रज्ञान!
(लेखक आयटीतज्ज्ञ आहेत.)