- मयूरा चौधरी
तरूणांच्या फॅशनबद्दल किती बोललं आणि लिहिलं जातं. कोणी कोणती फॅशन फॉलो करावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून टिप्सही दिल्या जातात. तरूण जे काही घालतात आणि करतात ती फॅशन असंही म्हटलं जातं. पण जे म्हटलं जातं ते अगदी तसचं वास्तव जीवनात अनुभवायला मिळतं असं नाही.
आता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट ऐश्वर्या रायनं कान्सच्या रेडकार्पेटवर चालताना जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली. तिच्या या लूकविषयी मी माझं मत व्यक्त करणार तितक्यात माझ्या समोर ढीगभर प्रतिक्रिया येवून पडल्या. कोणी म्हणत होतं ऐश्वर्याची ही एकदम बोल्ड स्टेप आहे, तर कोणी म्हणत होतं की असं दिसून तिनं मेकअपचा, स्टाइलचा नवा फंडा समोर ठेवला आहे. कोणाला ते छान वाटत होतं, कोणाला ते एकदम भारी.
तसं पाहिलं तर मीही माझ्या आयुष्यात मी करे सो फॅशन याच मताची आहे. कशावर काही घालून घेते, आणि त्याच्याकडे फॅशनच्या नजरेतून बघते मला ते एकदम छान वाटतं. आता दोनच दिवसांपूर्वी आमच्या ग्रूपमधल्या एका मैत्रिणीची बर्थडे पार्टी होती. मग मीही थोडंसं वेगळं दिसावं असं ठरवलं. नेहमीपेक्षा जरा डार्क मेकअप करून गेले तर माझ्या समोर परत ढीगभर प्रतिक्रिया मी न विचारताही येवून पडल्या. शी काहीतरीच काय?
तुझ्या रंगाला सूट नाही होत लिपस्टिकची ही शेड, ही काय टिकली लावली? या हेअर स्टाईलमध्ये अक्काबाई दिसतेय तू. एक ना अनेक. कोणीही कौतुकाचे चार शब्द काढले नाहीत.
मनातल्या मनात मी चरफडलेच. एकतर मी काय घालावं, कसं दिसावं हा माझा प्रश्न. पाहणाऱ्यानं पाहावं, नाहीतर पाहू नये. नसेल आवडलं तर तो माझा प्रश्न म्हणून गप्प राहावं ना? पण नाही नुसत्या टीका. म्हटलं ऐश्वर्याच्या फॅशनबद्दल बोलताना फॅशनबद्दलचा किती अॅडव्हान्स दृष्टिकोन आहे हे दाखवण्याची धडपड तर इथे आपल्या मैत्रिणीचा पेहराव ही तिची फॅशन आहे, त्यामागे तिचा विचार आहे हे समजून न घेण्याची मानसिकता याला विरोधाभास नाहीतर दुसरं काय म्हणावं?
आपण कायम टी.व्हीवर जे पाहतो त्याला फॉलो करतो पण आपण आपल्या मनातल्या आपल्या लूकला, आपल्या स्वत:च्या फॅशन कल्पनांना फॉलो केलं तर. आपली स्टाइल कायम स्टार, मॉडेल, चित्रपट, मालिका यावरून का ठरवावी.आपण जर आपल्या दिसण्याचा, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा नीट अभ्यास केला तर आपण आपली स्टाइल स्टेटमेण्ट बनवू शकतो. त्यासाठी आपण स्टार वगैरे असण्याची गरज नाही. आपण आपल्यासाठी स्टारच असतो. फक्त हे आजूबाजूचं जग टीका करून कायम आपल्याला नाऊमेद करत इतकचं. पण या टीकेला भीक न घालता मला हवं तसचं मी दिसेल असं मी ठरवलय !