- शुभदा चौकर
Institute for Psychological Health (IPH) आणि ‘वयम्’ मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने अलीकडेच ‘बहुरंगी बहर’ या व्यक्तिमत्त्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभरातून सातवी ते नववी इयत्तातील सुमारे १२५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. वयात येणाऱ्या मुलांच्या जगात आणि मनात डोकावू पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या उपक्रमातून हाती लागलेलं हे त्या पिढीचं व्यक्तिमत्त्व. सातवी ते नववी, या वयोगटातली मुलं. वयात येणारी, थोडी स्वतंत्र डोक्यानं चालणारी. काय चालतं त्यांच्या मनात? काय म्हणायचंय त्यांना? हे काही अंशी कळले. त्यांच्या मतांची व विचारांची चुणूक मिळाली ती आम्ही राज्यभर केलेल्या एका उपक्रमातून. आणि मुलांनी भरून पाठवलेल्या प्रश्नावल्या वाचून, त्यांच्याशी बोलून एक लक्षात आलं की ही मुलं त्यांचं म्हणणं विनासंकोच व्यक्त करतात. कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल- अशा संकोचांचे काच त्यांना जाणवत नाहीत. जे वाटतं ते असं आहे, या खाक्याने ते स्वत:चं मत मांडतात. भले त्यांचे विचार अजून पक्के नसतील, त्यात बदल व्हायला वाव असेल, पण आता जो काही विचार त्यांच्या मनात येतोय, तो ते स्पष्टपणे मांडू पाहताहेत. अनेक मुलांचा शब्दसंग्रह अजून तोकडा आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी शब्दांची सरमिसळ करत ते लिहितात, पण त्याचाही गंड त्यांच्या मनात नाही. जमेल तसं बिनधास्तपणे व्यक्त करण्याचा मोकळेपणा त्यांच्यात आहे. या मुलांना आपण यंग अॅडल्ट म्हणू शकू, कारण ते स्वतंत्रपणे विचार करताहेत. पालक, शिक्षकांपेक्षा किंवा मोठ्यांपेक्षा त्यांच्या धारणा वेगळ्या असल्या तरी त्या मांडण्याचा धीटपणा त्यांच्यात आहे. हल्ली लोक सर्रास म्हणतात की आजची मुलं हट्टी आहेत, ती आई-वडिलांचं ऐकत नाहीत. पण खरं तर अशी स्थिती आहे की, आई वडिलांच्या आग्रहाबद्दलच मुलांना काही आक्षेप आहेत. उदाहरणार्थ, घरोघरी सर्रास होणारा एक वाद. कौटुंबिक लग्नसमारंभाला आपल्या मुलांनी यावं असा आई-वडिलांचा आग्रह असतो आणि मुलं मात्र अशा ठिकाणी यायला तयार नसतात. याबाबत या मुलांनी अतिशय तर्कशुद्ध विचार मांडले आहेत. एक तर या समारंभाचे स्वरूप त्यांना जुनाट वाटते. तिथे त्यांना आवडेल, पचनी पडेल असं काहीच घडत नाही. तिथे पोचल्यानंतर मोठी माणसं स्वत:च्या घोळक्यात मश्गुल असतात, त्यावेळी आपली मुले कंटाळत आहेत, याचं भान त्यांना राहत नाही. काही मोठी माणसं या मुलांना उगाच कोणत्यातरी विषयावरून पिडत राहतात. शिवाय या मुलांचे पालक किंवा अन्य नातेवाईक त्या मुलांना किंवा समस्त पिढीला टीकेच्या धारेवर धरतात. अभ्यास नीट करायला नको, टीव्ही-मोबाइलवर फार वेळ घालवतात, जरा शिस्त म्हणून नाही... वाद होतो तो इथंच. ही मुले तिथे चरफडत बसतात. अजून एक म्हणजे या मुलांना चुका करत शिकण्याचं स्वातंत्र्य बहुदा पुरेसे मिळत नाहीये. शूज कोणते घ्यावे, ट्यूशन क्लासला जायचं की नाही, डान्स क्लासचा कंटाळा आला तर तो सोडून द्यायचा- असे निर्णय त्यांना स्वत: घ्यावेसे वाटतात. मग भले तो निर्णय चुकीचा आहे, असं लक्षात आलं तरी चालेल, नंतर बदलता येईल! पण आईबाबांना ते पटत नाही. मात्र याउलट या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे, अभ्यासेतर विषयांत रुची असली तरी रूढ शिक्षण सोडून अन्य विषयांत करिअर करण्याचं धाडस करणे शहाणपणाचं नाही, याची जाण त्यांना आहे. त्यासोबतच ज्यात त्यांना रु ची आहे, त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी कष्ट करणारी ही मुले आहेत. अभ्यास असो वा एखादी कला, ती कष्टपूर्वक जोपासण्याची जाणीव त्यांच्यात आहे. यातील काही मुलांचे पालक अल्पशिक्षित आहेत, पण आपल्या मुलांचे समजूतदार पालकत्व निभावण्याचा समंजसपणा त्यांच्यात आहे. भविष्यकाळात समाजात भरीव योगदान करू शकतील अशा क्षमतेची कितीतरी मुले आम्हाला ‘बहुरंगी बहर’च्या निमित्ताने भेटली. हे चित्र खूप आश्वासक आहे!
* मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांची मुलं सहभागी झाली. मराठी माध्यमात शिकणाऱ्यांचा सहभाग खूपच जास्त होता. इंग्लिश मीडियमच्या बहुतांश मुलांनी मराठीत उत्तरे लिहिली.
* शूज घ्यायला मॉलमध्ये गेल्यावर आई-बाबांचे म्हणणे ऐकाल की तुमच्या मित्रांसारखे ब्रॅण्डेड पॉश शूज घ्याल, अशा आशयाचा एक प्रश्न होता. त्याचे उत्तर लिहिताना बहुतेक मुलांनी प्रांजळपणे म्हटले की आम्हाला आमच्या मित्रांसारखे ब्रॅण्डेड पॉश शूज घ्यावेसे वाटतात. पालकांनी त्यांचे म्हणणे आमच्यावर लादू नये. आमचा निर्णय एकदा चुकला तर त्यातून आम्ही धडा घेऊ. पण तेवढी रिस्क आम्हाला घेऊ द्या.
* देव- संकल्पनेच्या बाजूने एक वेगळाच मुद्दा एका मुलाने मांडला- ‘देवळात देव नसता तर आपला देश फार मोठ्या परंपरेला मुकला असता! आपल्याकडे अनेक देव आहेत, त्यांची देवळे आहेत. काही देवळांच्या इमारती म्हणजे वेगवेगळ्या स्थापत्यकलेचे नमुने आहेत. तसेच अनेक देवळांनी संगीत, नृत्य या कलांना प्रोत्साहन दिले आहे. जर देवळे नसती तर आपला देश या सांस्कृतिक वारशाला मुकला असता...’ या उत्तरावर आम्ही सर्व थक्क!