-अतुल कहाते
“काय करू यार? डिग्री घेऊन पण नोकरी मिळत नाही”, अशा प्रकारचा संवाद आपल्या सवयीचा आहे. आता तर तो कदाचित आणखी जास्त वेळा ऐकायला मिळत असेल. कोरोनानं असंख्य लोकांच्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं केलं आणि अमुकअमुक पदवी घेऊन आपण नोकरी मिळवावी, अशी स्वप्नं बघत असलेल्या कित्येक युवक-युवतींच्या स्वप्नाला मोठा तडाखा बसला. आधीच पदवीचं शिक्षण घेऊन हाती फारसं काही लागत नसल्यामुळे हताश होत असलेल्या यार? सळसळत्या उत्साही युवा गटाला आणखी मोठा धक्का बसला. निराशेपोटी त्यांना हताश झाल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे.
पण, खरं म्हणजे असं वाटू न देता यातून मार्ग काढण्यासाठीची धडपड करणं शक्य आहे! ते कसं?
तर, जसं महिंद्रा उद्योगसमूहानं अलीकडेच “स्किल है तो फ्यूचर है” असं म्हणत एक कॅम्पेन चालवली तसं. पण म्हणजे नेमकं काय?…
मुळात “स्किल” या इंग्रजी शब्दाच्या मुळातच याचं रहस्य दडलेलं आहे. आजपासून सुमारे ८०० वर्षांपूर्वी “इतरांपासून जरा हटके असलेलं कुणीतरी”, अशा अर्थानं ‘स्किल’ हा शब्द वापरण्याची पद्धत रुजवली. म्हणजेच ८०० वर्षांपासून खरं म्हणजे आपल्याला यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, हे माहीत होतं. आपण ‘स्किलफुल’ असायला हवं. म्हणजेच आपल्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असायला हवं. आपल्यामध्ये काहीतरी खास कौशल्यं असायला हवीत. तर आपण टिकून राहू शकू. पण, आता प्रश्न असा आहे की आता यश मिळवण्यासाठी हे कौशल्य पैदा कुठून करणार?
१. पहिली गोष्ट म्हणजे पदवी घेणं आणि कौशल्य प्राप्त करणं यांचा कायम संबंध असेलच; असं नाही. उलट कित्येकदा पदवी घेणं म्हणजे कौशल्यापासून लांब जाणं असा उलटाच प्रकार घडू शकतो. याचं कारण म्हणजे कौशल्याची व्यवहारात केली जाणारी व्याख्या ही जगाला सध्या नेमकं काय लागतं याच्याशी संबंधित आहे. आपण ज्या पदवीचं शिक्षण घेतो आणि त्यानंतर ती पदवी मिळवतो, त्या पदवीचा जगात गरज असलेल्या कामांशी संबंध असेलच; असं सांगता येत नाही. म्हणूनच “डिग्री असूनही नोकरी नाही”, असं आपल्याला नाइलाजानं म्हणावंसं वाटतं. असं का घडतं?
२. याचं कारण म्हणजे पदवी देणारे अभ्यासक्रम अनेकदा काळाशी जुळवून घेणारे नसतात. ते मागे पडलेल्या गोष्टी शिकवतात. त्यांचा व्यवहारामध्ये फारसा उपयोग होत नाही. ‘पदवीधर’ म्हणवून घेण्यासाठीची उपयुक्तता त्यांच्यामुळे आपल्याला मिळते; पण प्रत्यक्षात काम शोधायला गेल्यावर आपल्यासारखेच हजारो किंवा लाखोसुद्धा लोक असेच काम शोधत फिरत असल्याचं आपल्याला जाणवतं. असं असताना हे ‘स्किल’ मिळवायचं कुठून?
३. आपल्याकडच्या तांत्रिक आणि व्यावहारिक कौशल्यं शिकवणाऱ्या महाविद्यालयांकडे आपण बरेचदा दुर्लक्ष करतो. तिथून आपल्याला ‘डिप्लोमा’ मिळतो; ‘डिग्री’ नाही – ही एकच गोष्ट आपल्याला टोचत असल्यामुळे आपण तिकडे वळत नाही. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्लंबिंग, सुतारकाम अशी कित्येक कौशल्यांची यादी आपल्याला इथे दिसेल. आता तर अनेक खासगी आणि अभिमत विद्यापीठंसुद्धा अशी कौशल्यं शिकवणारी महाविद्यालयं सुरू करताना दिसतात. इंटरनेटवर तुम्ही ‘स्किल युनिव्हर्सिटी’ असं शोधलंत तर, तुम्हाला अशा विद्यापीठांची आणि त्यांच्या अभ्यासक्रमांची माहिती सापडेल. युवक-युवतींना काळाशी सुसंगत असं कौशल्यावर आधारलेलं प्रशिक्षण देण्यासाठीच त्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. शोधा तिथं, नक्की तुम्हाला आवडेल, असं काही सापडेल.
४. आपल्या घरी, आपल्या आजूबाजूला, आपल्या गावात नेमक्या कशाप्रकारच्या लोकांची गरज आहे हे आपण जरा डोळे आणि कान उघडे ठेवून बघितलं-ऐकलं तरी आपल्याला नेमकी कुठली कौशल्यं शिकण्यातून फायदा मिळू शकतो, हे आपल्याला समजू शकेल. कोरोनामुळे लोक आरोग्य, व्यायाम, आरोग्यसेवा, आहार अशांसारख्या गोष्टींविषयी किती प्रचंड गरजा जाणवायला लागल्या आहेत. नर्सिंग, फिजिओथेरपी, घरगुती देखभाल, आहाराविषयीचं मार्गदर्शन, मानसिक-शारीरिक आरोग्याची जोपासना यात किती प्रचंड संधी असू शकतात, याचा आपल्याला विचार करता येईल? फक्त आपल्याकडे कौशल्य शिकण्याची तयारी, मेहनत आणि तयारीची गरज आहे. कोरोनानंतरच्या काळात “स्किल है तो फ्यूचर है” हेच सत्य आहे.
( लेखक तंत्रज्ञान अभ्यासक आहेत.)
akahate@gmail.com