-मन्मथ नरवणे
वयाच्या दहाव्या वर्षी आपण काय काय विचार करतो. मित्रांसोबत मोठमोठी स्वप्न रंगवत असतो. मीही दहा वर्षांचा असताना स्वप्न पाहत होतो, गावच्या शाळेतून म्हणजे उजनीच्या शाळेतून शहरातल्या शाळेत जाण्याचं. पण जर घरात तुम्ही सर्वात लहान असाल तर हे स्वप्न स्वप्नच राहतं. पण माझ्यासाठी तो योग लवकरच जुळून आला. माझी नवोदय विद्यालय, गढी (बीड) या शाळेत निवड झाली. तीही दिवाळीनंतर म्हणजे जानेवारीमध्ये. म्हणजे तेव्हा काहीच अपेक्षा नव्हती की आपली निवड होईल. तिथून जो प्रवास सुरू झाला गाव सोडून जाण्याचा तो अजून सुरूच आहे.सुरुवातीला खूप अवघड वाटत होतं. घरची फार आठवण यायची. खूप रडूपण यायचं. पण रडलो तर बाकीचे मुले चिडवतील म्हणून तेही करत नव्हतो. पण हळूहळू त्याही वातावरणात जम बसू लागला. वेगवेगळ्या लोकांसोबत कसं रहावं लागतं याची समज आली. प्रत्येक वेळी एक खरा मित्र शोधण्याचा प्रयत्न करायचो. पण ज्यावरती विश्वास ठेवला तो बाकी सर्व मुलांमध्ये जाऊन खिल्ली उडवायचा. खूप वाईट वाटायचं. पण असे काही अनुभव खूप काही शिकवून गेले. कदाचित घरी असतो तर हे कधी अनुभवलं नसतं.
या शालेय जीवनामध्ये माझा आत्मविश्वास वाढवण्यास फार मदत झाली. खूप छान मित्रपरिवार झाला. शिस्त आणि सामाजिक भान या शाळेची देणगी. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी लातूरला प्रस्थान केलं. या वेळी जिल्हा बदलला. शहरांत राहण्याचा हा पहिला अनुभव होता. पाय घसरणं साहजिक होतं कारण वय आणि वातावरण या दोन्हीचा प्रभाव होता. यावेळी माझ्या मोठ्या भावाने आणि आजीने यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. मला एक सवय होती. मी जरा स्वत:कडून जास्त अपेक्षा ठेवायचो. जास्त मार्क्सपडतील असं वाटायचं. पण नंतर हाती निराशा यायची. बारावीला तेच झालं. मेडिकलची एण्ट्रान्स दिली, तिथंही तेच झालं.
मग पुढे पदविकासाठी फार्मसीला गेलो. इथे मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र असा प्रवास केला. कोपरगावला पदविकेचा प्रवास सुरू झाला. आपण डॉक्टर नाही झालो याची कायम खंत मनात होती. कारण स्वप्नं मोठी पाहिली होती; पण जिद्दही नव्हती सोडली. मला तर मास्टर्सपण करायचे होतं पण एकच पर्याय होता तो म्हणजे गेट परीक्षा पास होणं आणि शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेणं.नाशिकला मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेजला प्रवेश मिळाला. पण माझ्या दुर्दैवाने त्याच वर्षी तेथील फीस डबल झाली आणि जी शिष्यवृत्ती मिळणार होती तिचापण काहीतरी प्रॉब्लेम सुरू होता. आर्थिक प्रश्न उभा होता. इथे मेसपण परवडत नव्हती आणि हाताने करून खाऊ शकत नव्हतो. आम्ही सर्व मित्रांनी मिळून एका मावशीवर आमचा जेवणाचा भार सोपवला. खर्च कमी झाला अन् व्यवस्थित जेवणही भेटले.
नाशिक सोडलं आणि मास्टर्सचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता, म्हणून मग थेट जम्मू येथील उरकफ ’ गाठली. ट्रेनी म्हणून जॉईन केले. सहा महिन्यांसाठी. जम्मूला येण्याआधी मनामध्ये खूप काही न्यूनगंड होते, भीती होती. माझी ट्रेन तिथं रात्री पोहचणार होती म्हणून आणखी जास्त भीती होती. पण प्रत्येक ठिकाणी चांगली माणसं असतात. आपल्याला विश्वास ठेवून जावं लागतं. फक्त या ठिकाणी एक वेगळा असा आत्मविश्वास आला की जर आपण जम्मूला येऊ शकतो तर विदेशात का नाही जाऊ शकत? इथे काही लोकांनी मला तैवानबाबत माहिती दिली. ट्रेनिंग पूर्ण करून महाराष्ट्रात परत आलो आणि मास्टर्स पूर्ण केलं. मनात होतंच की पुढं शिकायचं.पुढचा टप्पा औरंगाबाद. इथं मायलानमध्ये कॅम्पसमध्ये निवड झाली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागलो. थोडे चांगले दिवस आले आणि याचवेळी शिष्यवृत्तीपण आली. पण कुठेतरी मन खात होते की हा जॉब आपल्यासाठी नाही आहे. आपलं ध्येय काहीतरी वेगळं आहे.तैवान डोक्यात होतं. पासपोर्टपासूनची तयारी करायची होती. ती केली. पैसा जमवला. सारी तयारी केली आणि तैवानमध्ये पीएच.डी.साठी प्रवेश घेतला.थेट चीन गाठलं.इथं एक वेगळं वातावरण. खूप भन्नाट असा अनुभव. इथला शिष्टाचार पाहून मी खूप हरखून गेलो. पण प्रश्न इथे होता तो भाषेचा. कारण इथे चिनी भाषा बोलली जाते आणि त्यांची इंग्रजी खूप जेमतेम. मोठा प्रश्न निर्माण झाला. पण लोक खूप मायाळू आणि मदत करणारे असल्यामुळे निभावून जाऊ लागले.खरी पंचाईत झाली ती जेवणाची. त्यांचा मुख्य आहार मांसाहार असल्यामुळे शाकाहारी जेवण मिळणं अवघड झालं होतं. मग अभ्यासासोबत स्वावलंबी आयुष्य स्वीकारलं. सर्व काही स्वत: बनवून खाणं सुरू झालं. तोडकी मोडकी चिनी भाषा शिकलो. पीएच.डी.चा प्रवास सुरू झाला. आणखी हा प्रवास खूप पुढे घेऊन जायचा आहे. अजून खूप काही शिकायचं आहे. अजूनही माझ्यासाठी हे तिकीट वन-वेच आहे...
(लेखक पीएच.डी. स्कॉलर,कौशंग मेडिकल विद्यापीठ,चीन)
अनाउन्समेण्ट
छोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी; पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं. आपल्या स्वप्नांचा हात धरून, संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना? कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..? - ते अनुभव शेअर करण्याचा हा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास? आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही? काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण? या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय? तर मग ही एक संधी !
लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट. १. लिहून पाठवणार असाल, तर पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा. सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरही जरूर लिहा.. पत्ता- शेवटच्या पानावर, तळाशी. २. ई-मेल- oxygen@lokmat.com