- प्रज्ञा शिदोरे
भारताला भेडसावणारे महत्त्वाचे ५ प्रश्न कोणते?- असं कोणालाही विचारलं, तर भारतातील अन्नधान्याचा तुटवडा किंवा शेतीचा प्रश्न, शेतीला बाजारभाव न मिळणे या संबंधीचा प्रश्न हा पहिल्या तीनात नक्कीच असेल.अर्थात, असं आपल्यालाच वाटतं असं नाही तर आता वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन्स फूड प्रोग्रॅम अशा संस्थाही या प्रश्नाबाबत सजग झालेल्या आहेत.२००९ पासून या जागतिक संस्थांचे लक्ष पहिल्यांदा ‘जगातला अन्नधान्याचा तुटवडा’ या विषयाकडे वळलं. या प्रश्नाचं मूळ होतं ते ‘आपण २०५० साली जगाच्या ९ अब्ज लोकसंख्येला कसे अन्नधान्य पुरवणार?’ या प्रश्नात. याला इतिहास होता तो २००८ सालच्या मंदीचा.२००८ साली जगभरातल्या अन्नधान्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या. लोकांचे हाल होत होते. जगभरातल्या नेत्यांना आपलं या विषयाकडे लक्ष आहे आणि आपण त्यासाठी पावलं उचलतो आहोत, हे दाखवायचं होतं. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर या विषयाची चर्चा भलतीच रंगात आली.हे सगळं समजायला जरा अवघड आहे असं वाटलं ना?असंही वाटेल की २०५० अजून लांब आहे, आपला काय संबंध या प्रश्नाशी?पण, आपण जर या प्रश्नाचा सूर बदलला तर कदाचित हा प्रश्न आपल्याला नीट समजू शकेल.अमेरिकास्थित सारा मेनकर यांनी या प्रश्नाची उकल करायचं ठरवलं. सारा या खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या विश्लेषक. आपली घसघशीत पगाराची वॉलस्ट्रीट वरची नोकरी सोडून त्यांनी या प्रश्नाचा छडा लावण्याची तयारी सुरू केली. आणि ग्रो इंटेलिजंट नावाची एक संस्था सुरू केली. त्यांनी या प्रश्नावर काम सुरू केलं. त्यांच्या अभ्यासानुसार जर आपण आत्ताच काही दूरगामी बदल आखले नाही तर अन्नधान्याचं हे संकट यायला आपल्याला २०५० ची वाट बघायला लागणार नाही. पुढच्या काहीच वर्षांत, म्हणजे साधारण अजून दहाएक वर्षात आपल्याला हे संकट भेडसावणार आहे, असं त्या म्हणतात.त्यांच्या मते, या प्रश्नाची उकल करण्यात सर्वात मोठा अडथळा आहे तो आकड्यांचा. आणि आकडे नसल्यामुळे आपल्या राज्यकर्त्यांना आपल्या देशातल्या/राज्यातल्या अन्नधान्याच्या समस्येवर उत्तरे शोधता येत नाहीत. त्यांनी सांगितलेल्या आकड्यांनुसार २०२७ पर्यंत जगात २१३ ट्रिलियन कॅलरिजचा (उष्मांकाचा) तुटवडा भासणार आहे. ५० वर्षांपूर्वी देश अन्नधान्य निर्यात करत नव्हते; पण जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण आपली खाद्यसंस्कृती बदलली. आणि नेमक्या गरीब देशांना अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. याबरोबरच जगात लोकांचा मांसाहार वाढला. मांसाहारासाठी, प्राण्यांना वाहवण्यासाठी आणि खूप संसाधनं खर्ची घालावी लागणार.हा तुटवडा कसा भरून काढायचा? त्यासाठी आपण काही करू शकतो का?ते काय?हे समजून घेण्यासाठी टेड टॉकवरचं हे भाषण नक्की ऐका. सारा आपल्या मांडणीमध्ये भारतातील हरितक्र ांतीचे उदाहरण देतात आणि म्हणतात की, या हरितक्रांतीचे तोट्यापेक्षा फायदेच अधिक दिसत आहेत. यामुळेच भारतावर १९६० नंतर अन्नधान्य एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात करण्याची वेळ नाही आली. यामुळेच एवढी अधिक लोकसंख्या असूनही स्वातंत्र्यानंतर भूकबळीचे प्रमाण भारतात कमीच आहे. अशी हरितक्रांती आफ्रिकेच्या एकाही देशात नाही झाली. आणि आज आफ्रिका दरवर्षी सर्वाधिक प्रमाणात अन्नधान्य आयात करत असते.फूड क्रायसिस नक्की काय असतो?सारा हे एक उदाहरण सांगतात, आजही आपल्या देशात दर चौथा माणूस उपाशी आहे. आणि तो का? हे समजून घेण्यासाठी ‘वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’चा ‘ग्लोबल रिपोर्ट आॅन फूड क्र ायसिस’ म्हणजेच अन्नसंकटाविषयीचा जागतिक अहवाल नक्की वाचा. याच वर्षी मार्च महिन्यात प्रकाशित झालेल्या या अहवालामध्ये जागतिक अन्नसंकटाविषयीची आकडेवारी आपल्याला वाचायला मिळेल. संपूर्ण अहवाल हा तब्बल १४७ पानांचा आहे; पण पटकन माहीत करून घेण्यासाठी त्याचं १६ पानी संक्षिप्त स्वरूप नक्कीच तुम्हाला वाचता येईल. यामध्ये जगातील कोणते देश अन्नसुरक्षेमध्ये सर्वात मागे आहेत त्याची उत्तम मांडणी केली आहे. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय संस्थांनी हा विषय कसा हाताळावा, या विषयीची माहितीसुद्धा दिली आहे.अन्नसंकट आज भारताला जरी भेडसावताना दिसत नसलं तरीही त्याची सुरुवात शेतकºयांच्या प्रश्नापासून झाली आहे मित्रांनो. आज देशात कित्येक हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यामागची जागतिक स्तरावरची कारणे समजून घेण्यासाठी हा टेड टॉक आणि वर्ल्ड फूड प्रोग्रॅमचा २०१७ साली प्रकाशित झालेला अहवाल नक्की वाचा!