- कंगणा रनोट
(लोकमत दीपोत्सव-2015)
सुंदर दिसण्याच्या प्रचलित व्याख्येत, यशस्वी होण्यासाठी ‘मस्ट’ असलेल्या लिस्टमधे बसेल असं माङयाकडे काहीही नव्हतं. बॉलिवूडमधे तर मी आउटसायडरच! माङयासारख्या हजारोंकडे बघत पण नाही ही दुनिया.
मलाही गरजच नव्हती म्हणा स्वत:ला कापूनकुपून त्यांच्या व्याख्येत आणि दुनियेत कोंबून बसण्याची.
मी आहे अशी आहे.
नाहीयेत माङो केस सरळ.
कुरळे आहेत! - तर आहेत.
नाहीयेत माङो डोळे निळे.
नाहीये माझी उंची 5-11 पेक्षा जास्त.
नाही जिंकली मी कुठली ब्यूटी क्राऊनवाली स्पर्धा. कुठला बडा अॅक्टिंग कोर्सही केला नाही. बडय़ा नावाजलेल्या संस्थेत अभिनय शिकल्याचा ठप्पाही माङयाकडे नाही!
मग??
पण हे सारं हवंच तुमच्याकडे असा काही नियम आहे का? आणि नसलं तर?
- नसलं तर नसलं!
मी जशी आहे तशी मला आवडते.
स्मॉल टाऊन इंडियावाल्या, मध्यमवर्गीय घरातल्या आजच्या कुणाचीही गोष्ट अशी माङयासारखीच असेल.
1500 रुपये खिशात घेऊन मुंबईत आले होते. त्याआधी कधी मुंबई पाहिलीही नव्हती. गरिबीही माहिती नव्हती. बस-ट्रेनमधे धक्के खाल्ले, कित्येक मैल रस्ते तुडवले, प्रसंगी फुटपाथवर काढल्या रात्री. तेव्हा दिसणारं जग वेगळं होतं. आता बीएमडब्ल्यूत बसल्यावर त्या जगाचा चेहरा वेगळा कसा दिसेल?
किती टोमणो ऐकलेत आजवर. बाकी जाऊ द्या, मला इंग्रजी सफाईदार बोलता येत नाही. माझा अॅक्सेण्ट चांगलं नाही यावरूनही लोकांनी माझी टिंगल केली. माङया उच्चरांची टवाळी झाली. लोक असे वागायचे जसं की मी तोंड उघडणंच पाप आहे. माङयासारख्या मुलींनी या इंडस्ट्रीत येण्याची हिंमत करू नये इतके वाईट दिवस मी पाहिलेत.
म्हणतात ना, झगडणं ही काही लोकांची नियतीच असते. आयुष्यभर हा नाही तर तो झगडा त्यांच्या वाटय़ाला येतो.
माझा आता नवा झगडा सुरू झाला आहे. नव्या वाटांवरचे नवे प्रश्न, नवे तिढे आणि नवी आव्हानं आहेतच उभी वाट पाहत.
कलाकार म्हणून तरी तुम्हाला दुसरं काय हवं असतं?
एक संधी?
ती मिळतेच. पण ती मिळाल्यावर मात्र तिच्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करणं, जीव तोडून करणं, स्वत:ला विसरून करणं एवढंच आपल्या हातात असतं!
लोक तुम्हाला कसं जोखतात, ‘जड्ज’ करतात, तो त्यांचा विषय. त्याच्याशी तुमचा काय संबंध?
जा, उत्तम काम करा, स्वत:शी प्रामाणिक राहा, घसघशीत पैसे कमवा, विषय संपला!
स्वत:चाच सामना करत, जबाबदारी घेत स्वत:लाच उत्तरं द्यायला बांधील असणं यापेक्षा जास्त मोठा आनंद नाही.