शेतकऱ्यांनं जीवनदान देणारं ‘बोअरवेल स्कॅनर’!
देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं.रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधानिमित्तराष्ट्रपतींनीही त्याचा गौरव केला आणि राष्ट्रपती भवनात त्यांच्या या उपयुक्त संशोधनाचं प्रदर्शन भरवलं. अशा प्रतिभावंतांची ही ओळख..शेतकऱ्यांसाठी जीवनमरणाचा प्रश्न म्हणजे पाणी. शेतात पिकं घ्यायची, तर त्यासाठी पाणी हवं. पावसाचा भरोसा नाही आणि पाण्याची दुसरी कुठली सोय नाही. त्यामुळे आजकाल बहुतांश शेतकरी आधार घेतात तो बोअरवेलचा. शेतात बोअरवेल खोदतात.पण कुठल्याही गावात, कुठल्याही शेतकऱ्याला, बोअरवेल खोदायची असली, तर तो काय करतो?- अनेकदा यासंदर्भात देवाच्या नाहीतर, कुठल्यातरी ‘बाबा’च्या भरोशावरच ‘रामभरोसे’ निर्णय घेतला जातो. यातले काही ‘बाबा’ कधी जमिनीला कान लावून बसतात (जमिनीतल्या पाण्याचा आवाज त्यांना ऐकू येतो म्हणे), कोणी पुजापाठ मांडतात, तर कोणी आणखी काही ‘मंत्रतंत्र’ मारुन ‘या ठिकाणी’ खोदा, शंभर टक्के पाणी लागेल असा छातीठोक दावा करतात.. पण पाणी खरंच लागतं का?बऱ्याचदा ते लागत नाहीच. आता एवढं खोदलेलंच आहे, मग आणखी खोल, आणखी खोल जा, एवढा खर्च केलेलाच आहे, आणखी ‘थोडा’, असं म्हणून अडलेला आणि पाण्यासाठी आसूसलेला शेतकरी आपल्याकडची आहे-नाही तेवढी सारी पुंजी गमावूनही शेवटी कोरडाच राहतो. ‘अमूक ठिकाणी पाणी लागेलच’ याची शंभर टक्के तंत्रशुद्ध खात्री कोणीच देत नाही.गिरीश बद्रागोंड हा कर्नाटकच्या विजयापुराचा शेतकऱ्याचा तरुण मुलगा. त्याच्या गावातही पाण्याची कायमच मारामार. आधीच गाव कोरडं. त्यात पवासाळी ढगांनीही कायम गावावरुन पळ काढलेला. लोक कायम पाण्याच्या तलखीत. दहावीतपर्यंत शिकलेल्या गिरीशनं नंतर इलेक्ट्रिशिअन म्हणून काम सुरू केलं, पण त्याच्याही डोक्यात कायम पाण्याचा विचार.पाऊस-पाण्यानं नडलेला शेतकरी कायम इथे बोअरवेल खोदून बघ, तिथे खोदून बघ, इथे तरी पाणी मिळेल, तिथे तरी पाणी मिळेल म्हणून कायम आशेवर. जमिनीतून तर पाणी निघायचं नाही, पण या साऱ्या प्रयत्नांनी हात टेकल्यावर आणि होते नव्हते तेवढे सारे पैसे गमावल्यावर त्या शेतकऱ्याच्या डोळ्यांत मात्र हमखास पाणी यायचं. गिरीशच्या डोक्यातही कायम एकच विचार, आपल्या गावाची पाण्याची चिंता कशी दूर करता येईल? असं एखादंही यंत्र, यंत्रणा असू नये, जी ठामठोकपणे सांगू शकेल की इथे पाणी निघेलच..शेवटी गिरीशच कामाला लागला. त्यानं अभ्यास सुरू केला. अनेक प्रयोग करून पाहिले. भंगार बाजारातल्या वस्तू आणून जोडजाड करून पाहिली. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलंच.गिरीशनं असं एक उपकरण शोधून काढलं, ज्यामुळे जमिनीत नेमकं कुठे पाणी आहे, हे तर कळतंच, पण त्या पाण्याचं प्रेशर नेमकं किती आहे, त्या ठिकाणचं तापमान किती आहे. जमिनीखाली पाण्याचा प्रवाह कसा, किती आहे, तिथे पाणी किती आहे, त्या पाण्याची आणि जमिनीची प्रत कशी आहे, त्या ठिकाणी बोअर खोदल्यावर प्रत्यक्ष जमिनीवर तुम्हाला किती पाणी मिळू शकेल, जमिनीच्या खाली आणि तिथून उपसल्यावर जमिनीच्या वर त्या पाण्याचा प्रवाह कसा असेल, जमिनीखाली ज्या ठिकाणी पाणी आहे, त्याच्या आजूबाजूची माती कशी आहे, खालची जमीन दगडाळ आहे का, या दगडांचे किती ब्लॉकेजेस तिथे आहेत, समजा जमिनीखाली त्या ठिकाणी पाणी असलं तरीही शेतीसाठी ते तुम्हाला उपयुक्त आहे का.. यासारख्या असंख्य गोष्टी तुम्हाला समजू शकतील, असं अत्यंत बहुपयोगी यंत्र गिरीशनं विकसित केलं. या यंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे सारी सिद्धता केल्यानंतर बसल्याजागी ही सारी माहिती तुम्हाला मिळू शकते. हे कमी म्हणून की काय, ज्या जमिनीत ही बोअरवेल खोदायची आहे, तिथे कोणत्या प्रकारची पिके तुम्हाला घेता येतील याबाबतचा ‘फुकट’ सल्ललाही गिरीश शेतकऱ्यांना देतो. गिरीशच्या डोक्यात या स्कॅनरचाच विचार अहोरात्र चालायचा. स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं त्यांना काय काय अडचणी येतात, हे गिरीशला पक्कं आणि नेमकेपणानं ठाऊक होतं. त्यासाठी काय करता येईल यासाठीच्या साऱ्या शक्यता त्यानं तपासल्या आणि हे उपकरण तयार केलं. त्यासाठी त्यानं काय काय करावं?जमिनीखालचं पाणी शोधणाऱ्या या स्कॅनरसाठी गिरीशनं त्याच्या उपकरणाला हाय डेफिनेशन कॅमेरे बसवले, डिजिटल कंपास, टेंपरेचर आणि प्रेशर सेन्सर्सचा उपयोग केला, पाण्या फ्लो कसा आहे, पाणी असलेल्या ठिकाणी जमिनीची खोली किती आहे हे कळण्यासाठी डिटेक्टर्स वापरले, जीपीएसचा उपयोग केला, एवढंच नाही, ही सगळी माहिती स्क्रीनवर मिळण्यासाठी एलसीडी स्क्रीनचाही वापर केला.अथक मेहनत घेऊन गिरीशनं हे उपकरण तयार केलं; जे हजारो शेतकऱ्यांसाठी अक्षरश: देवदूत ठरणार आहे.भूगर्भाच्या पोटातली ही जादू आपल्या डोळ्यांसमोर उभ्या करणाऱ्या गिरीशच्या या उपकरणाचं वजन आहे फक्त दीड किलो आणि जमिनीखाली तब्बल सहाशे फूट खाली पाण्याचं स्कॅनिंग हे उपकरण करू शकतं!गिरीशनं हे उपकरण तयार केलं, पण त्याआधी असं कुठलं ब्रोअरवेल स्कॅनर उपलब्धच नव्हतं का?बाजारात आजही असे स्कॅनर उपलब्ध आहेत, पण एकतर ती आहेत खूप महागडी. शिवाय ती फक्त जमिनीखालची इमेज घेऊ शकतात. जमिनीखाली पाण्याचा स्त्रोत कसा आहे, पाण्याचा फ्लो कसा आहे याबाबतचे नेमकेपणानं विश्लेषण करण्याची क्षमता या स्कॅनर्समध्ये नाही.गिरीशला हे उपकरण तयार करण्यासाठी जवळपास दोन लाख रुपये खर्च आला. मात्र या उपकरणाच्या मदतीनं ही सारी माहिती देण्यासाठी गिरीश आकारतो फक्त १५०० रुपये!या अनोख्या उपकरणासाठी गिरीशला अनेक पुरस्कार मिळाले. नुकतंच राष्ट्रपतींनीही त्याला सन्मानित केलं.- प्रतिनिधी