मनसुख प्रजापती.त्यांचा अख्खा प्रवासच चमत्कारांनी भरलेला आहे.गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातलं निचिमंडल हे छोटंसं गाव हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमीही.मातीत वाढलेल्या या माणसाचं मातीवर अपार प्रेम. घरची परिस्थिती अगदी बेतास बात. शिकून मोठं व्हायची, शास्त्रज्ञ व्हायची त्यांची इच्छा होती, पण परिस्थितीपुढे त्यांना हात टेकावे लागले. घर चालवण्यासाठी शिक्षणही अर्धवट सोडून मिळेल ती नोकरी पकडावी लागली. अनेक ठिकाणी त्यांनी नोकऱ्या केल्या, पण त्यातून त्यांना समाधान मिळत नव्हतं. आपली ‘माती’ त्यांना कायम हाका मारत होती. त्यातूनच एक दिवस त्यांनी नोकरी सोडली आणि उद्योगधंदा कराययचं ठरवलं. हा उद्योगही त्यांनी ठरवला तो मातीचाच.मातीचे तवे तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी तीस हजार रुपये कर्ज काढलं आणि केला आपल्या उद्योगाचा श्रीगणेशा. एक हॅँडप्रेस मशीन त्यांनी विकसित केलं. या मशीनच्या साहाय्यानं एका दिवसात सातशे तवे तयार होऊ शकत. या तव्यांची पहिली बॅच तयार झाल्यावर त्यांनी ते विकायला ठेवले. या तव्याची किंमत होती, प्रत्येकी ६५ नवे पैसे! १९८८ची ही गोष्ट. लोकांना हे तवे इतके आवडले की, पहिल्या दोन दिवसांतच सगळा माल खपला. तवे स्वस्त असल्यामुळे ते हातोहात खपत होते, पण काही काळानंतर लोकांकडून तक्रारी येऊ लागल्या की हे तवे लवकर फुटतात. मनसुख यांनी त्यावर पुन्हा संशोधन केलं, वेगवेगळ्या प्रकारच्या माती एकत्र केल्या, त्यांचं प्रपोर्शन बदलून पाहिलं, प्रयोग केले.. त्यातूनच त्यांना एक फॉर्म्युला सापडला. हे तवे पहिल्यापेक्षा खूपच दणकट आणि टिकाऊ होते. यातून प्रेरणा मिळाल्यानंतर मातीच्या आणखी अनेक वस्तू त्यांनी तयार करायला सुरुवात केली. मातीचा नॉनस्टिक तवा, मातीचाच कुकर, मातीचे वॉटर फिल्टर, मातीच्या वॉटर बोटल्स..त्यांचे हे अफलातून प्रयोग इतके फेमस झाले की, त्यांच्या मातीच्या वॉटर फिल्टर्स अगदी नैरोबीतूनही खूप मोठी आॅर्डर मिळाली. त्यांनी आपल्या साऱ्या उपकरणांन नाव दिलं ‘मिट्टीकूल’! त्या नावानं रजिस्ट्रेशनही केलं.आता सारं काही बऱ्यापैकी सुरळीत सुरू झालं होतं, पण नियतीनं पुन्हा एक जोरदार धक्का दिला. सन २००१मध्ये गुजरातच्या भूज परिसरात आलेल्या भयंकर भूकंपात मनसुख यांचंही प्रचंड नुकसान झालं. ‘माती’तून उभा राहिलेला त्यांचा सारा उद्योग अक्षरश: मातीत गेला. विक्रीसाठी तयार असलेल्या साऱ्या वस्तूंची अक्षरश: माती झाली. तरीही त्यांच्यातली माणुसकी इतकी मोठी, की त्यातल्या ज्या वस्तू सुस्थितीत राहिल्या होत्या, त्याही त्यांनी भूकंपग्रस्तांना वाटून टाकल्या. आता सारं काही पुन्हा नव्यानं उभं करायचं होतं.त्यातच भूकंपानंतर दुसऱ्या दिवशी स्थानिक वर्तमानपत्रात एक फोटोफिचर प्रसिद्ध झालं. त्यातल्या एक फोटोत भूकंपानं रस्त्यावर आलेल्या कुटुंबाचा फोटो होता. त्याच्या शेजारी मनसुख यांनी तयार केलेला, भूकंपामुळे फुटलेला वॉटर फिल्टर होता. फोटोच्या खाली ओळी लिहिलेल्या होत्या.. ‘गरिबों का फ्रिज टूट गया..’तो फोटो पाहून मनसुखही गहिवरले, पण त्याचवेळी त्यांच्या डोक्यात एक नवं चक्रही सुरू झालं.. खरंच गरिबांसाठी आपण मातीचाच फ्रिज का तयार करू नये?..ते पुन्हा कामाला लागले. प्रयोग सुरू झाले. त्याच्या डिझाइनसाठी अहमदाबादच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन’चीही त्यांनी मदत घेतली आणि खरोखरच मातीचा फ्रिज आकाराला आला!आपल्या प्रस्थापित फ्रिजपेक्षा तर हा खूप स्वस्त तर होताच, पण मुख्य म्हणजे या फ्रिजला कोणत्याही विजेची किंवा ऊर्जेची गरज नव्हती!त्यातही त्यांचे प्रयोग सुरूच होते. मातीच्या या नव्या फ्रिजमध्ये कोणत्याही विजेशिवाय भाज्या पाच-सहा दिवस राहू शकतात!हा फ्रिज सर्वसामान्यांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्यासाठी त्यांना विविध पुरस्कारही मिळाले.पण ही गोष्ट इथेच थांबणार नव्हती.एकदा त्यांच्या पत्नीनं त्यांना बाजारातून नॉनस्टिक तवा आणायला सांगितला. त्याची किंमत त्यावेळी दोनशे रुपये होती. एवढे पैसे देऊनही पदार्थांची नॅचरल चव मात्र त्यातून मिळत नव्हती आणि कोटिंगही लवकर जात होतं.एवढी एक गोष्ट त्यांच्या डोक्यातली चक्रं फिरवण्यासाठी पुरेशी होती. त्यांनी मग मातीच्या नॉनस्टिक तव्याचा ध्यास घेतला. त्यासाठी मुंबईला जाऊन तव्यांवर नॉनस्टिक कोटिंग कसं करतात त्याचं प्रशिक्षण घेतलं. तोच प्रयोग आपल्या मातीच्या तव्यांवर करून पाहिला. त्यात बरेच बदल केले आणि तयार झाला, मातीचा नॉनस्टिक तवा! हा तवा तुलनेनं बराच स्वस्त आहे, त्याचं कोटिंग आपल्या नेहमीच्या नॉनस्टिक तव्यांपेक्षाही जास्त टिकाऊ आहे आणि मुख्य म्हणजे खाद्यपदार्थांची नॅचरल चव या तव्यात टिकून राहते. या तव्यावर पदार्थ शिजायला कमी गॅस लागतो, ते अजून वेगळंच!याशिवाय मातीपासून त्यांनी आणखी काय काय तयार केलंय, दोन आणि पाच मिनिटांत गार होऊ शकणारं पाणी, एक आणि दोन लिटरचे मातीचे थर्मास, मातीचा कुकर, मातीचा डिनर सेट, मातीचा कंदिल..प्रत्येक वस्तू इको फ्रेंडली आणि विजेशिवाय, ऊर्जेशिवाय चालणारी!आजही ते स्वस्थ बसत नाहीत. फावल्या वेळात ते एकतर मातीवर काहीतरी प्रयोग तरी करत असतात, नाहीतर आपली ही मातीची भांडी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठे ना कुठे प्रवास तरी करीत असतात..‘माती’शी इमान राखणाऱ्या या मातीतल्या माणसाचा राष्ट्रपतींनीही त्यांच्या राष्ट्रपती भवनात नुकताच जंगी सत्कार केला..