* तरुण मुलांनाही व्हायचंय, झटकेपट स्मार्ट.
* लग्नात ‘परफेक्ट’ दिसण्याचं त्यांच्यावरही प्रेशर.
* झटकेपट जाड-बारीक होण्याचा प्रयत्न करणार्यांना हमखास अशक्तपणा येतो, अंगदुखी,
स्नायू दुखाण्याचा त्रास.
* प्रोटीनचे डबे, जिम, लिक्विड डाएटचं फॅड मोठं.
‘‘अरे यार कसला काळा पडलाय चेहरा.. केसही पांढरे झालेत.. पोट सुटलंय.. लग्न तर १५ दिवसांवर आलयं.. कसं होणार?
काळजी करू नकोस आपल्या ओळखीचं पार्लर आहे, चेहरा आणि केस एकदम टकाटक होईल! पोटासाठी डॉक्टरकडून गोळ्या घेऊ..
पण, एवढय़ा कमी दिवसंत होईल का रे नीट?
अरे होईल रे, नो टेन्शन..’’
-दोन मित्रांमधील हा एक प्रातिनिधिक संवाद. लग्न ठरल्यानंतर बहुतेक तरुणांना एकदम अशी ‘दिसण्याची’ एन्झायटी येते. लग्नात तिच्याबरोबर ‘तो’ही सेलिब्रिटीच, त्याचंही दिसणं महत्त्वाचंच. त्यात तू मस्त दिसला पाहिजेस यारऽऽ म्हणत मित्रांचं प्रेशर, नातेवाइकांचे टोमणे. यासार्यांचा परिणाम म्हणून आता लग्न ठरलेले तरुणही चांगलं दिसण्यासाठी, स्वत:ला उत्तम प्रेझेंट करण्यासाठी झगडताना दिसताहेत. त्यांची ही हौस भागविण्यासाठी ‘मेन्स पार्लर’वालेही सरसावलेत. अनेक पॅकेजेस तयार आहेत.
त्यात आता भावी बायकोही ‘त्याला’ म्हणतेच, तू असा दिस, तसं करून घे, आयुष्यात एकदाच लग्न होणार, किमान त्या दिवशी फोटोसेशनसाठी तरी चेहर्यावर ‘ग्लो’ असायला हवा ना.
तिच्यापुढे त्याचं अनेकदा काही चालत नाही. म्हणून मग तो ही मेन्सपार्लर, स्कीन-हेअर स्पेशालिस्ट, डाएटिशियन, जिम यांच्या वार्या सुरू करताना दिसतो. लग्नाला थोडेच दिवस शिल्लक राहिल्याने ‘झटकेपट’ रिझल्ट हवे असतात. एकदम बदल करायचा म्हटल्यावर थोडी रिस्क घेण्याची अन् जास्त पैसे मोजण्याची तयारीही त्यानं केलेली असतेच.
‘तरुण मुलांमध्येही इन्स्टण्ट स्मार्टनेसची मागणी वाढत चालली आहे. खूप जाड आहे म्हणून किंवा खूप बारीक आहे म्हणून तरुण तातडीनं एखादा आहारतज्ज्ञ गाठतात. जिमचा रस्ता धरतात’ असं सांगून आहारतज्ज्ञ डॉ. अरूंधती जोशी सांगतात की, ‘काही दिवसांत वजन वाढवायचंय किंवा कमी करायचंय असा तरुणांचा धोशाच असतो. पण दोन महिन्यांत १0 किलो वजन कमी होऊ शकत नाही हे त्यांना पटत नाही. मग क्रॅश डाएटिंग द्या, असा आग्रह ते ही धरतात. ते आरोग्यासाठी घातक असतं हे सांगून अनेकांना पटत नाही. ते वजन वाढवा म्हणणार्यांचही. त्यासाठी बाजारात मिळणार्या गोळ्या-औषधांचा विपरित परिणाम होऊ शकतो. अचानक जिममध्ये जाऊन बॉडी बनत नाही. हा परिणाम फक्त तात्पुरत्या स्वरूपात दिसतो. काही दिवसांनी त्याचे साइड इफेक्ट्स दिसू लागतात, हे सांगूनही अनेकजण ऐकत नाही!’
फिट होण्याबरोबरच आता मुलांनाही गोरंच व्हायचं असतं. लग्नाआधी काही दिवस चेहर्यावर वेगवेगळ्या क्रिम्सचा मारा करणं, सातत्याने फेशियल, मसाज करून ग्लो आणण्याचा प्रयत्न सुरू होतो. त्वचातज्ज्ञ डॉ. वैशाली किराणे सांगतात, थंडीच्या दिवसातच लग्नाचे मुहूर्त जास्त असतात. त्यामुळे चेहर्याची त्वचा कोरडी पडते. अशावेळी आपल्या चेहर्यावर कोणती क्रीम योग्य ठरेल, फेशियल, मसाज, ब्लीच करावं की नाही, याची माहिती न घेताच तरूण स्मार्ट दिसण्यासाठी प्रयत्न करतात. पण नको त्या क्रीम लावल्यानं चेहर्याला खाज येणं, आग होणं, पुरळ येणं, डोळ्याखाली काळी वतरुळ येणं असे त्रास सुरू होतात.
हल्ली लग्नाच्या तयारीसाठी पॅकेजसही येऊ लागलीत. लग्नाच्या एक महिना आधीपासून ते लग्नाच्या दिवसापर्यंत मिळून एक पॅकेज खास तरुणांसाठी काहीजण देतात. पुण्यातील मॉडर्न मेन्स पार्लरचे सुनील गायकवाड सांगतात. ‘एकदम बदल होत नाही, पण लग्नापूर्वी एक महिना आधीपासून काही ब्यूटि ट्रिटमेण्ट योग्य पद्धतीनं केल्यास चांगला दिसतो चेहरा. लग्नाआधी फक्त दोन दिवस फेशियल, ब्लीच, मसाज, मशीन ट्रिटमेंट केली तर चेहर्याचा ग्लो वाढविण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. पण तो जास्त इफेक्टिव ठरत नाही. त्यामुळे घाई-घाई काहीच करण्यात अर्थ नाही.’
अर्थात हे सारं समजून घेऊन विचार करण्याची फुरसत स्वत:ला न देता जे तरुण इन्स्टण्ट स्मार्ट बनायला जातात, ते अनेकदा पस्तावतानाच दिसतात.
राजानंद मोरे