- कलीम अजीम
अखेर 40 वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. त्यानंतर इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वेबसाइटने स्टेडिअममध्ये दाखल होऊन आनंदोत्सव साजरा करणार्या अनेक महिलांचे हजारो फोटो प्रकाशित केले आहेत. अनेक वृत्तसंस्थानी या घटनेवर थेट प्रक्षेपण करून विशेष कव्हरेज दिलं. सोशल मीडियावर या ऐतिहासिक क्षणाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. फोटोतील महिला व लहान मुलींच्या चेहर्यावरील आनंद लक्षणीय व उत्साहवर्धक होता.मागच्या गुरुवारी राजधानी तेहरानच्या आझादी स्टेडिअममध्ये हजारो महिला दाखल झाल्या. बुधवारपासूनच फुटबॉल सामन्याचे तिकिटे खरेदी करण्यासाठी महिलांच्या रांगा स्टेडिअमबाहेर दिसत होत्या. अल जझिराच्या वृत्तानुसार तब्बल 3500 महिलांनी तिकिटे खरेदी केली. मोठय़ा संख्येने स्रिया व लहान मुलींनी स्टेडिअममध्ये प्रवेश करून इराण विरुद्ध कंबोडिया या फुटबॉल मॅचचा आनंद घेतला. 2022 साली होणार्या फिफा वर्ल्डकपसाठी हा क्वॉलिफायर सामना खेळला जात होता.1979 साली इराणमध्ये खोमेणी यांच्या नेतृत्वाखाली राजकीय क्र ांती घडून आली. इराण शासक शाह मुहंमद रजा पहेलवी यांना पदच्युत करून खोमेणी यांनी ‘धार्मिक प्रजासत्ताक’ इराणची स्थापना केली. याला इस्लामिक रिव्होल्यूशन म्हटले जाते. या घटननेनंतर इराणमध्ये सामाजिक, राजकीय व धार्मिक सुधारणांच्या नावाखाली अनेक र्निबध लादण्यात आले. त्यातले बरेचसे र्निबध महिलांसाठीच लागू होते.महिलांवर बुरखा सक्तीसह अनेक बंधनं घालण्यात आली. या बंदीअंतर्गतच महिलांना स्पोर्ट्स स्टेडिअममध्ये जाऊन खेळ बघण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला. ही बंदी झुगारण्यासाठी 40 वर्षापासून लढा सुरू होता. या लढय़ाचा इतिहास फार जुना आहे. निषेध मोर्चे, आंदोलने व निदर्शने करून महिलांनी सरकारला हे नियम शिथिल करण्याची मागणी केली होती.सौदी सरकारने महिलांसाठी विविध कार्यक्षेत्रे खुली केल्यानंतर इराणमध्ये स्रियांच्या हक्काच्या विविध लढय़ांना बळ प्राप्त झाले. सौदी सरकारने ड्रायव्हिंग, सिनेमा, मल्टिनॅशनल कॉर्पोरेट कंपन्या, खेळ, एअरहोस्टेस इत्यादी क्षेत्रे स्रियांसाठी खुली केली आहेत. पूर्वी या सर्वच क्षेत्रात महिलांना काम करण्यास बंदी होती. ‘व्हिजन 2030’ या आर्थिक विकासाच्या धोरणातून हा क्रांतिकारी बदल सौदीने स्वीकारला. इस्लामिक देशात सौदीचे अनुकरण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे त्याचे पडसाद साहजिकच अन्य मुस्लीम देशात उमटत आहेत.गेल्या दोन वर्षापासून इराणमध्ये स्थानिक महिलांनी विविध मूलभूत हक्कासाठी बंडाला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 5 मुलींनी नकली दाढी-मिशा लावून पुरु षांचे वेश करून फुटबॉल स्टेडिअममध्ये प्रवेश केला होता. इराणी सरकारविरोधातला हा प्रतीकात्मक निषेध होता. नंतर त्या मुलींना अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटला भरण्यात आला.गेल्या ऑगस्ट महिन्यात एका 23 वर्षीय सहर खोडयारी नावाच्या कॉम्प्युटर इंजिनिअर तरु णीने निळी केशरचना करून लपून स्टेडिअममध्ये प्रवेश मिळवला होता. सुरक्षा रक्षकाने तिला ताब्यात घेतले. तिच्यावर कायदा मोडल्याचा खटला भरण्यात आला. सुनावणी सुरू असतानाच शिक्षेच्या भीतीने तिने स्वतर्ला आग लावून जाळून घेतले. सात दिवसाच्या उपचारानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.सहर नावाच्या ब्लू गर्लच्या मृत्यूनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर या धक्कादायक प्रकाराचे पडसाद उमटले. जगभरात या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात होता. फुटबॉलप्रेमीने सोशल नेटवर्किग साइट्सवर इ’4ी¬्र1’ हा हॅशटॅग वापरून सहरला श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर इराण सरकारने कायदे बदलण्याच्या मागणीची मोहीम सुरू झाली.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्यूमन राइट वॉच या मानवी हक्क संघटनांनी ब्लू गर्लच्या मृत्यूचा निषेध नोंदवला. स्पॅनिश फुटबॉल स्लब, बार्सिलोना क्लब, चेल्सी क्लब आदी फुटबॉल संघाने या घटनेवर आक्रोश व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) एक पत्रक जारी करून इराणच्या नियमांवर आक्षेप नोंदवले होते. इतकेच नाही तर हे कठोर कायदे बदलण्याचा आदेशही काढला होता.महिनाभरातच इराण सरकारने महिलांसाठी स्पोर्ट्स स्टेडिअमच्या प्रवेशासंबधी नियम शिथिल केले. इराणी सरकारला स्रियांच्या लोकचळवळीपुढे झुकावे लागले. या घोषणेनंतर इराणी महिलांनी जल्लोष साजरा केला. इराणीयन महिलांच्या चार दशकाच्या लढय़ाला यश आले. याबद्दल अल जझिरा या वृत्तसंस्थेला एका मुलीनी दिलेली प्रतिक्रि या खूप बोलकी होती. फुटबॉल पत्रकार असलेली राहा म्हणते, ‘‘विश्वासच बसत नाही की मी आता थेट स्टेडिअममधून लाईव्ह करू शकेल. मीडियात काम करणार्या मुलींना तर आनंद झालेला आहे; पण त्यापेक्षाही मोठा आनंद सामान्य मुलींना झालेला असून, तो शब्दातीत आहे.’’विशेष म्हणजे सरकारने गुरु वारी झालेल्या सामन्यासाठी तब्बल 150 महिला पोलिसांची नियुक्ती केली होती. त्या महिला पोलिसांसाठीदेखील हा वेगळा अनुभव असल्याचे त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रि येत म्हटले आहे.गेल्या काही वर्षापासून इराण हा देश विविध कारणांसाठी सतत चर्चेत असतो. ऑलिम्पिक खेळात इराणी महिला खेळाडूंचे स्थान अधोरेखित झालेले आहे. फुटबॉल व कबड्डीसारख्या खेळात इराणी महिलांचे नाव जागतिक कीर्तिस्थानी आलेले आहे. रनिंग, स्विमिंग, रग्बी, टेनिस, नेमबाजी, तिरंदाजी, स्किइंग इत्यादी खेळात इराणी स्रिया विशेष प्रावीण्य मिळवत आहेत. अशा काळात महिलांना स्टेडिअममध्ये जाऊन खेळ बघण्याला बंदी असणं सयुक्तिक नव्हतंच. 40 वर्षानंतर का होईना अखेर ती बंदी उठवण्यात आली आणि तरुणींनी स्टेडिअममध्ये पाऊल ठेवलं.