-योगेश्वर पी.मिरकुटे, मु.पो. नरंगल (बु ), ता.देगलूर, जि.नांदेड
माझं गाव नरंगल (बु.) नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातलं हे गाव. महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर हे गाव आहे. माझ्या गावापासून तेलंगणा राज्याची सीमा अगदी ३ किलोमीटर अंतरावर आहे. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं. दहावीला मी गावातून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालो त्यामुळे मी पुढील शिक्षण कुठे घेणार याकडे साऱ्या गावाचं लक्ष होतं.
मला शहरात शिक्षण घ्यायचं होतं. माझा नंबर परभणीच्या एका नामांकित तंत्रनिकेतनला लागला. सुरुवातीला परभणीला कोणत्या मार्गाने जायचं मला कळत नव्हतं. आमच्या गावातले सर परभणीला राहत होते. त्यांच्याकडून सल्ला घेऊन मी परभणीला निघालो. गावातून नांदेड कसंबसं गाठलं, नंतर नांदेड ते परभणी प्रथमच रेल्वेचा प्रवास केला. तो गर्दीचा प्रवास माझ्यासाठी खूप नवा होता.
परभणीत मी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होतो. तिथं राज्याच्या विविध ठिकाणांहून आलेली मुले माझ्या संपर्कात आली. अतिशय चांगले मित्र मिळाले. मोलाचं मार्गदर्शन करणारे शिक्षक मिळाले. वसतिगृहात राहिल्यामुळे समाजात तऱ्हेतऱ्हेचे लोक असतात त्यांच्यासोबत कसं वागावं हा अनुभव आला. माझे रूम पार्टनर तर असे होते की ज्यांच्यामुळे मला कधीच घरची कमतरता वाटत नव्हती. वेळोवेळी ते मदतीला धावून यायचे.
परभणीचे वैशिष्ट्य म्हणजे कृषी विद्यापीठ. आम्ही आवर्जून या विद्यापीठाला भेट द्यायचो. कधी कधी सिनेमा पहायला जायचो. दहीहंडी महोत्सवाला खूप मजा लुटायचो. हसत-खेळत माझे तीन वर्षे कधी उलटून गेली ते कळलेच नाही. त्यानंतर मी अभियांत्रिकीचे शिक्षण सोलापूरमध्ये घेतले. अजून एक स्थलांतर केलं.
अनेकदा शहरातले लोक ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना कमी लेखतात. असे अनुभव आले की खचून न जाता स्वत:च्या मनाला जिद्दीने सावरत आपलं जगणं त्यांच्यापेक्षा अधिक सुखकर कसं बनवता येईल याकडे लक्ष दिलं. ती जाणीवच मला या प्रवासानं दिली. हार्डवर्कला स्मार्टवर्कची जोड देता आली..आणि एका नव्या जगाची ओळख झाली..