- ओंकार करंबेळकर
आजवर मोठमोठय़ा कंपन्यांनी एकत्र येऊन भागीदारीत नवी कंपनी स्थापन केल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण अशी भागीदारी केवळ आर्थिक क्षेत्रातच करता येते असं नाही. एखाद्या छंदाबाबत समान आवडीचे लोक एकत्र येऊन संशोधनाचं, लोकशिक्षणाचं काम करू शकतात. मुंबईमध्ये राहणार्या दोन निसर्गवेडय़ा मुलांची अशीच एक जोडी तयार झाली. जे. वाय. ब्रदर्स हे त्यांचं नावं. एकाचं नाव महेश यादव आणि दुसर्याचं नाव भूषण जाधव. या दोघांच्या आडनावाच्या अद्याक्षराने जे. वाय. ब्रदर्स असं नाव तयार झालं आहे. या जोडीतील महेश आहे सिव्हिल इंजिनिअर तर भूषण आहे वाणिज्य शाखेचा विद्यार्थी. दोघांनी वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं असलं तरी त्यांना निसर्ग या समान धाग्यानं जवळ आणलं. मुंबईच्या मधोमध असलेल्या आरे जंगलाच्या जवळच राहत असल्यामुळं त्याचं आरेमध्ये सतत जाणं व्हायचं. लहानपणापासून आरेमधील झाडं, प्राणी, पक्षी, साप-सरडय़ासारखे सरपटणारे प्राणी यांचं निरीक्षण केल्यामुळे त्यांना आपल्याला इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा निसर्गज्ञानाची आवड जास्त असल्याचं जाणवलं. महेश यादवला संकटात सापडलेल्या प्राणी-पक्ष्यांची सुटका करणं किंवा घराच्या आवारात आलेल्या सापाला पकडून त्याची सुटका करणं याची विशेष आवड होती.
आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये मनुष्य आणि प्राणी समोरासमोर आल्यामुळे अनेकदा लोकांची, प्राण्यांची आणि प्रशासनाचीही तारांबळ उडते. एखाद्या घरामध्ये साप निघणं, एखाद्या पहाटे रहिवासी सोसायटीत बिबटय़ा लपलेला असणं, एखाद्या सोसायटीत रात्री बिबटय़ा आल्याचं सीसीटीव्हीत दिसणं असले प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे या दोघांनी आरे वसाहतीच्या आजूबाजूच्या लोकांना प्राणी व निसर्ग यांच्याबाबत माहिती द्यायला सुरुवात केली. आरे जंगल हे मुंबईचं फुप्फुस आहे अशी जागृती करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आरेमधील झाडं विकासकामांमुळं धोक्यात येऊ लागल्यावर मुंबईतील अनेक पर्यावरण संस्था विरोधासाठी उभ्या राहिल्यावर हे रहिवासीही जंगल वाचविण्यासाठी सरसावले.