शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जाच आणि काच

By admin | Published: February 25, 2016 9:47 PM

हुंड्याचा ताण मुलींनाच येतो असं नाही, तर मुलांनाही येतो. मुलगे म्हणतात, आम्ही कात्रीत अडकलोय, रीत सुटत नाही, घरचे ऐकत नाहीत आणि तसंही आमचं काही चालत नाही

 हुंड्याचा ताण मुलींनाच येतो असं नाही, तर मुलांनाही येतो. मुलगे म्हणतात, आम्ही कात्रीत अडकलोय, रीत सुटत नाही, घरचे ऐकत नाहीत आणि तसंही आमचं काही चालत नाही. .. आणि तसंही मुलींचे बापच तयार असतील, तर काय गैर आहे? प्रश्न अगदी साधा.. एरवी स्वतंत्र, बेदरकार, आपलं तेच खरं करणारी मुलं हुंडा घेताना घरच्यांच्या मागे का लपतात? तेव्हा का ‘नाही’ म्हणण्याचं बळ एकवटू शकत नाहीत? या प्रश्नाचा ‘त्रास’ बहुसंख्य मुलांना झाला हे आलेल्या तमाम पत्रातलं वास्तव. दुखऱ्या नसेवर कचकन पाय पडावा आणि वेदनेने तडफड व्हावी असं अनेक मुलांनी कळवळून लिहिलं! बहुसंख्य मुलांचं म्हणणं की, ‘एवढं सोपं नसतं, घरच्यांच्या विरोधात जाणं, त्यांनी ठरवलेल्या स्थळाला नाही म्हणणं, आणि हो म्हटलंच तरी हुंड्याला नाही म्हणणं! लगेच घरात इमोशनल धारावाहिक सुरू होतं. ‘आम्ही तुझ्यासाठी एवढं केलं, लग्नाआधीच तू बायकोचा होणार, नंतर तर आम्हाला लाथच मारशील..’ असा तोंडाचा पट्टा सुरू होतो. उपाशी राहणं, रडणं-पिडणं असतंच. समाजातले चार मोठे लोक आणले जातात समजुतीसाठी! हा एवढा वैताग करण्यापेक्षा आपल्याला मुलगी पसंत असली तर म्हणायचं आता करा, तुम्हाला काय करायचं ते!’ मुद्दा काय, ‘घरच्यांसमोर आपलं चालत नाही’ हे अनेक मुलं मान्य करतात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा वरकरणी लिहिणं टाळलेला पण वळसे घेऊन घेऊन तेच सांगितलेला आणखी एक मुद्दा आहे. तो म्हणजे अनेक मुलांना अजूनही असंच वाटतं की, थोडाबहूत हुंडा घेणं, टोलेजंग लग्न मुलीकडच्यांनी करून देणं यात काही गैर नाही. हुंडा दिला नाही तरी थाटामाटात लग्न लावून देण्याची जबाबदारी तरी मुलीच्याच वडिलांची. त्यातून त्यांना कन्यादानाचं पुण्य मिळतं! हे सगळं जुनाट आहे हे मान्य करणारे पण हळूच सांगतात की, रीत आहे आपल्याकडची. एकदम कशी तुटेल. हळूहळू तुटेल. आम्ही नाही का बहिणींच्या लग्नात शेती विकून, कर्ज काढून हुंडा दिला, त्याला नाइलाज असतो. आणि मग त्या नाइलाजाच्या कहाण्याही वाचायला मिळतात. अनेक मुलांनी लिहिलं आहे की, तीन तीन बहिणींच्या लग्नात हुंडा दिला आहे. डोक्यावर दहा लाखांपर्यंतचं कर्ज. वडिलांना हातभार लावतोय. स्वत:चं लग्न लावण्याइतपत पैसा नाही हाताशी. कुठं काय बोलू? होऊ द्यायचं जे होतं ते.. त्यात अनेकांना नोकरी नसते. असली तर ती टेम्पररी. ही तात्पुरती नोकरी अनेकांची मजबुरी दिसते. एकतर आधीच नोकऱ्या मिळत नाहीत. शहरात मिळालीच नोकरी तरी मुलगी चटकन कुणी देत नाही. आणि दिलीच तर मग ही तात्पुरती नोकरी अडचण ठरते. मग मुलीकडचेही पर्मनण्ट होण्यासाठी (द्यावी लागणारी लाच म्हणून) पैसे देतात किंवा घरचे मागतात. मुलं यासाऱ्यासमोर मान तुकवतात. या अशा अनेक गोष्टी. एकीकडे लग्न जमत नाही. काहींना शहरात नोकरी नाही म्हणून कुणी मुलगी देत नाही. कुणाच्या डोक्यावर कर्ज, कुणाला जातीपातीचे काच, समाजाचं प्रेशर, आपल्या वागण्यानं लग्न करून गेलेल्या बहिणींच्या संसारांवर होणारे परिणाम यासगळ्याची गणितं या पत्रांत वाचायला मिळतात. वरकरणी हुंड्याचं समर्थन कुणीच करत नाही, पण आपण हुंडा का घेतला किंवा का घ्यावा लागतो, याची उत्तरं तर देतातच. आणि त्याच उत्तरात एक सगळ्यात मोठं उत्तर म्हणजे, मुलीकडच्यांची प्रतिष्ठा! आपल्या मुलीला भरभरून देण्याची पालकांची तयारी असते. आणि त्या साऱ्याला नको म्हणणाऱ्यांना ते मुलगीच देत नाही. उलट मुलात दोष आहे म्हणत बदनामी करतात. हे सारं सांगताना अनेक तरुणांनी आपले अनुभव लिहिले आहेत. खेड्यापाड्यात, छोट्या शहरात राहणाऱ्यांनी तर समाज, जात, भाऊबंद, सोयरे या साऱ्यांनी आपलं जगणं कसं वेढून ठेवलं आहे आणि त्याचा जाच आणि काच किती पक्का आहे, याच्या कहाण्याही सांगितल्या आहेत. आणि त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत हे नक्की! त्यामुळे जे पारंपरिक पद्धतीनं हुंडा घेऊन, दणक्यात लग्न लावून घ्यायला तयार आहेत, त्यांचं सोपं आहे. त्यांना ना कसला दोष वाटतो, ना त्यातून काही अपराधगंध येतो. पण जी मुलं विचार करतात, त्यांना मात्र आपण कात्रीत सापडलो आहोत, असं वाटून गुदमरायला होतं आहे. आणि हे गुदमरणं मोठं आहे, असं ही पत्रं नक्की सांगतात. मुलग्यांचा नाइलाज होतो, कारण... १) मुलीकडचेच बळजबरी हुंडा देतात, हुंडा घेतला नाही तर बदनामी अटळ. २) घरचे इमोशनली ब्लॅकमेल करतात. ३) बहिणींच्या लग्नात हुंडा मोजलेला असतो, म्हणून नाइलाजानं स्वत:च्या लग्नात हुंडा घ्यावा लागतो. ४) हुंडा हा समाज, जातीत, भाऊबंदकीत प्रतिष्ठेचा विषय असतो. हुंडा घेतला नाही तर आपलं नाणं खोटं अशी समाजात चर्चा होते.नाही म्हणणारे आवाज परिस्थितीच्या कचाट्यात सापडून किंवा परंपरेत रुतून काहीजण हुंडा घेत आहेत, आणि काही प्रतिष्ठेचा भाग म्हणूनही आपली बोली लावत आहेत, हे वास्तव तर आहेच. पण या साऱ्यात आशेची काही किरणंही आहेत. पत्रांच्या गठ्ठ्यात खेड्यापाड्यातून आलेली काही अशीही पत्रं सापडतात जी म्हणतात, ‘आम्ही नाही घेणार हुंडा. नाहीच मुलीच्या वडिलांसमोर हात पसरणार. साधेपणानं लग्न करू. इतरांनाही समजावू.’ या पत्रांची संख्या कमी असली तरी तशी पत्रं आहेत हीच एक मोठी आशेची गोष्ट आहे. ( हुंडा नको असं म्हणणारी त्यातली निवडक पत्रं पान ६ वर वाचता येतील) मात्र हुंडा घेऊ नये असं वाटणाऱ्या सगळ्याच तरुण मुलांना असा ठोस निर्णय नाही करता येत. त्यातले बहुसंख्य आपल्या मनासारखं करायचं की घरच्यांचं ऐकायचं या कात्रीत सापडलेले दिसतात. पण हे काय कमी आहे की, निदान हुंडा घ्यावा की नाही, इतपत प्रश्न तरी आता अनेक मनं कुरतडू लागला आहे. ज्यांना असा प्रश्नच पडत नाही आणि आपली पाच आकडी नोकरी ही आपल्या हुंड्याची मोठी किल्ली आहे, असं वाटणाऱ्यांचा वर्ग वेगळा आहे. आणि दुर्दैवानं तो वाढतो आहे. मात्र कमी शिकलेली किंवा जेमतेम ग्रॅज्युएट मुलं, खेड्यापाड्यात वेगळा विचार करताहेत, हा विरोधाभास सुखकारक म्हणावा असा आहे! मुलीच म्हणतात, करा ना आमच्यासाठी खर्च! मुलाकडचे हुंडा मागतातच. पण मुली? त्यांनाही वडिलांकडून शक्य तितकं सारं हवं आहे. टोलेजंग लग्न, दागिने, सगळा संसार, ब्यूटिपार्लरमध्ये जाऊन उत्तम मेकअप आणि जमल्यास चांगलं हनिमून डेस्टिनेशन बुकिंगही. अनेकींना वाटतं की, वडिलांनी हे सारं आपल्यासाठी करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. काही जरा कमी पडतं आहे असं वाटलं तरी आकांडतांडव करणाऱ्या मुली आहेतच. मुलं म्हणतात, ‘मुलींनाच जर सगळं हवं आहे, तर आम्ही नाही म्हणणारे कोण? त्या मागतात, त्यांचे आई-वडील देतात. तो त्यांच्या खुशीचा मामला आहे.’ काहीजण तर असंही लिहितात की, मुलींना वाटतं की, वडिलांच्या इस्टेटीत आपलाही वाटा आहे. तो पुढे मिळेल न मिळेल. लग्नात जेवढं जमेल तेवढं मिळवलेलं बरं. तेव्हा वडील नाही म्हणत नाहीत. ‘हावऱ्या’ जर मुलीच होत असतील तर हुंड्याची सक्ती मुलं करतात? असा प्रश्न कसा विचारतात, असा सवालही अनेक पत्रांमध्ये दिसतो.