कुठे गेले बरं हे दोघं? सांगितलं होतं इथेच थांबा - पाच मिण्टात येतो म्हणून. आता इतक्या गर्दीत कुठे, कसं शोधायचं यांना? फोनपण बंद झालाय कधीचा. इथेच थांबायचं ठरलं होतं ना?हो - इथेच. काय करावं बरं? थांबूया जरा वेळ - असतील कुठेतरी आसपास - येतील इथेच. एक मिनिट, मी ठरल्या ठिकाणी तर नक्की आहे, पण ठरलेल्या ‘वेळे’त आहे ना? क्या भन्नाट आयडिया आहे, बॉस! म्हणजे मी जर असा पाच मिनिटात येतो म्हणून गेलो आणि परत आलो - उद्या या जागी तर? किंवा मी परत आलोय इथेच पण समोर उभा आहे डायनासॉर! कसली एपिक चुकामुक! एकदम सायफाय - मस्त इंग्लिश पिक्चर काढता येईल असा - एकदम हिट. कसले नसते विचार राव. एक नाही पन्नास पिक्चर निघाले असतील असले टाइम ट्रॅव्हलचे आजवर. डिट्टो गोष्टपण सांगितली असेल एखाद्यात. पण म्हणून काय झालं, माझी आयडिया माझी आहे. आत्ता आत्ता सुचली मला. ढापली नाय काय कुणाची. तरीपण.. उशिराची आयडिया. पिक्चर बघून लोक म्हणणार, ‘अरे ये तो उसकी कॉपी है.’ कोणाची बरं मुलाखत होती ती - म्हणे - ‘एकविसावं शतक आहे - किती काय काय लिहून, वाचून, सांगून, ऐकून, चितारून, पाहून करून झालंय माणसांचं. आता जे काही करू त्यातलं काही ना काही, कुठे ना कुठे करून झालेलं असणार. सो कॉपी असण्यात वाईट नाही वाटून घ्यायचं पण त्या कॉपीत काही नवीन शोधता येईल का, ते बघायचं’ - वाह, छान लक्षात राहिलंय की! अगदी पाठ केलेल्या उत्तरासारखं. म्हणायला सगळंच सोप्पं पण करायला?‘एक्सक्यूज मी, मिस्टर तंद्री. चला, निघायचं का?’ - मित्र क्र . १‘हो ना - पाच मिनिटांत परत आलात खरे पण इथे उभं राहून गेली दहा मिनिटं कसला विचार चालवलाय?’ - मित्र क्र . २
आलोच पाच मिण्टात..
By admin | Published: March 15, 2017 7:00 PM