आईवडील स्वातंत्र्य देतात, पण ते नियंत्रित. कासरा फक्त लांब सोडतात आणि पूर्वीसारखंच मुलांना बंधनात ठेवतात, असं सांगणारं एका मित्रचं पत्र ‘ऑक्सिजन’ने प्रसिद्ध केलं होतं.
त्याला आलेल्या या काही निवडक प्रतिक्रिया.
प्रेमाचा पहारा
लग्नानंतर मी बंदी झालेय !
मी प्रेमात पडले. घरी सांगितलं. आंतरजातीय लग्न. त्याच्या घरच्यांचा विरोध. पण माङया आईबाबांनी पुढाकार घेऊन लग्न लावून दिलं.
लग्नानंतर आम्ही त्याच्या आईबाबांच्या घराजवळच घर घेतलं. आता लग्नाला वर्ष झालं. त्यांची अपेक्षा आहे मी त्यांच्याकडच्या सगळ्या चालीरिती शिकाव्या. त्या शिकले. सासरी पडेल ते काम केलं.
आता तो म्हणतो, माझ्या घरच्यांना तुझं शिक्षण सुरू असणं मान्य नाही. ते तू सोड. तसंही शिकून तू कुठं नोकरी करणारेस? पण हे असं पंजाबी ड्रेस घालून कॉलेजात जाणं काही बरं दिसत नाही.
त्यावरून भांडणं. आता तर शिक्षण सोड नाही तर मला, अशी धमकीही मिळाली आहे.
आता वाटतं, आईबाबांनी आणलेली स्थळं नाकारून, स्वतंत्र निर्णय घेऊन, लव्ह मॅरेज करून मी काय मिळवलं?
- अनामिका
नावाचं स्वातंत्र्य बाकी नजरकैद
मी माझ्या ममीपपांची एकुलती एक मुलगी. तेही टिपिकल सांगतात, आम्हाला एकच मुलगी आहे असं वाटतच नाही. तू आमचा मुलगाच आहे.
मला वाटतं, मुलीला मुलगा मानण्यात त्यांनी समाधान मानलंय. आतून आपल्याला मुलगा नाही याचं त्यांना काहीतरी दु:ख असणारच !
पण तो वेगळा विषय.
तर मला घरात स्वातंत्र्य आहे की नाही, तर आहे. मला मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. हवे ते कपडे घालता येतात. हवं तिथं जाता येतं.
पण हे सारं असताना मी नजरकैदेत असते.
त्या जाहिरातीतल्या मुलीसारखं. तिचे वडील तिला सायकल घेऊन देतात. पण ती सायकल चालवत असताना लपून पाहतात की, ही पडत तर नाही?
आमच्याकडेही तेच आहे.
सतत आईची सोबत. मी येते ना बाहेर तुङयाबरोबर. तू मैत्रिणीकडे कशाला जातेस? त्यांनाच आपल्याकडे बोलव. सगळ्यांचे नंबर माङया मोबाइलमध्ये सेव्ह कर. लॅण्डलाइनही कर.
वर सांगतातही की, हे सारं जमाना वाईट आहे म्हणून; बाकी आमचा तुङयावर पूर्ण विश्वास आहे.
त्यांची काळजी मला समजते, पण हे असं आडून आडून माङयावर लक्ष ठेवणं मला आवडत नाही, हे त्यांना कसं सांगणार?
- प्रांजली
बोरिवली
तुझं तू बघ असं कसं म्हणता?
माझ्या मित्रंना वाटतं की, माझे आईबाबा फार चांगले आहेत. ते मला सगळी मोकळीक देतात.
ते खरंही आहे. कारण त्यांना काहीही विचारा ते म्हणतात, तुला हवं ते कर ! निर्णय तुझा. अनेकदा मलाच विचारायला येतात की, आता पुढे तू काय करणार आहेस?
मी कुठं जातो, कुणाला भेटतो, काय करतो यावर काही रोकटोक नाही. माझ्या मित्रंना माझा हेवा वाटतोच. पण त्यांची माझ्या आईबाबांशी चांगली दोस्तीही आहे. ते मित्रंनाही सल्लेबिल्ले देतात.
आता या सा:यात मला त्रास होण्यासारखं काय आहे?
पण मला होतो. त्रास होतो म्हणण्यापेक्षा भीती वाटते. प्रेशर येतं.
सगळी जबाबदारी आपली. काही चूक करण्याची मुभाच नाही. त्यांना वाटतं आपला मुलगा जे करेल ते योग्यच करेल.
पण असं कसं होईल? माझ्या अनुभवाच्या जोरावर माझे निर्णय चुकूही शकतात.
मला वाटतं, त्यांनी म्हणावं की निर्णय घे तू, आम्ही सोबत आहोत.
पण त्यांचं तसं नाही. ते म्हणतात तुझं तू ठरव. या पूर्ण स्वातंत्र्याचं किती प्रेशर येतं हे माङया मित्रंना कसं कळणार?
मला मात्र सतत स्वत:ला सिद्ध करत राहावं लागतं.
काही चुकलं की आईबाबा बोलून दाखवत नसले तरी अप्रत्यक्षपणो त्यांचा टोन एकच असतो, आम्ही तुला एवढी मोकळीक दिली तरी तुला संधीचं सोनं करता येत नाही.
अशावेळी काय होतं माझं काय सांगणार?
मला वाटतं, आईबाबांनी स्वातंत्र्य द्यावं, पण चार पाऊलं सोबतही चालावं. चुकलं तर सावरावं, रागवावं, सल्ले द्यावेत, निर्णय घ्यायला मदतही करावी.
तुझं तू बघ, ही काही योग्य स्ट्रॅटेजी नव्हे !
- अमित
पुणो
आमच्या डोळ्यादेखत तो गेला.
दोन वर्षापूर्वीची गोष्ट.
मी आणि माङो काही मित्र पिकनिकला गेलो होतो. अलिबागच्या समुद्रावर.
खूप मजा केली. आमच्यातल्या काहींनी ठरवलं की दिवस मावळल्यावर पोहायला जाऊ. काहीजण गेले. काही काठावर बसून राहिले.
एकदम पाणी भरायला लागलं.
पोहायला गेलेले काही भराभरा बाहेर आले. पण एक दोस्त आलाच नाही.
आमच्या डोळ्यांदेखत तो गटांगळ्या खात बुडाला.
आम्ही काहीच करू शकलो नाही.
आजवर त्याच्या आईबाबांना मी तोंड दाखवू शकलेलो नाही.
त्यानंतर पुढचं वर्षभर मी घराच्या बाहेर पडलो नाही. कुणाशी बोललो नाही.
मानसोपचार घेतले फक्त.
आता विचार करतोय की चूक नक्की कुणाची होती?
उत्तर येतं- आमचीच.
आम्ही का गेलो रात्रीचे पाण्यात?
त्यांना थांबवलं का नाही?
का नको ते धाडस केले, कसला माज दाखवला?
आता जेव्हाही पेपरात अशा बुडून मरण्याच्या बातम्या येतात तेव्हा मी हादरतो. रडतो. पण काहीच करू शकत नाही.
माझं सर्व मित्रंना एकच सांगणं आहे,
असं धाडस करू नका.
जीव एकदा गेला की परत येत नाही.
स्वत:ला सांभाळा. मरू नका.
- एक मित्र