- राहुल गायकवाड
ते सगळे पुण्यात शिकायला आलेत.देशभरातून, जगभरातून मुलं पुण्यात शिकायला येतात, आयुष्य घडवायला येतात तसेच. त्यांचं राज्य एरव्हीही सतत बातम्यांत गाजतं; पण पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांची काश्मिरी ही ओळख अनेक नजरांना जणू खुपायला लागल्यासारखंच वातावरण आहे. पुण्यात सरहद संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी आलेल्या विद्याथ्र्र्याना भेटलं, गप्पा मारल्या तर ते आपलं मन मोकळं करतात. लांबून आलेले आपले हे बांधव-दोस्त शिकायला म्हणून एवढय़ा लांब आलेले, तर त्यांची घालमेल समजून घ्यायची म्हणून त्यांना भेटलं तर काय सांगतात ते.खरं तर आधीचा अनोळखी संकोच बाजूला ठेवून सार्या नजरा सांगतात की, दहशतवादी हल्ला झाला, त्याचं दुर्ख, ती भयंकर वेदना आमच्यातही आहे. मात्र त्याचवेळी त्या नजरांमध्ये काही प्रश्नही दिसतात, कारण गेल्या काही दिवसांत देशभरात काश्मिरी मुलांवरचे हल्ले वाढले आहेत.या तरु णांशी संवाद साधल्यावर कळतं की शिक्षणाप्रति त्यांची तळमळ किती मोठी आहे. काश्मीर खोर्यातून बाहेर पडून दूर शिकायला जाणं हेसुद्धा फार सुदैवी जिवांच्या वाटय़ाला येतं, बाकीचे तिकडेच राहून जातात. मात्र ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली ते हे तरुण कळकळीनं सांगतात, आम्हाला शिकू द्या, बोला आमच्याशी, आमचं जगणं समजून घ्या. आणि हो, तो नजरेतला संशय तेवढा काढा!
**काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे सर्व भारतीयांप्रमाणे आम्हीसुद्धा दुर्खी आहोत. भारतातील प्रत्येक व्यक्ती जितकी देशप्रेमी आहे तितकेच देशप्रेमी आम्हीसुद्धा आहोत. आपण सगळे एक आहोत आणि नेहमी एक असू. पण तिकडे हल्ला झाला म्हणून इकडे काश्मिरी तरुणांकडे पाहणार्या नजरांतला संशय आम्हाला फार छळतो. खरं तर आज काश्मीरमधील विद्याथ्र्याना उत्तम शिक्षण हवंय. शांतता हवी आहे. दहशत काय असते याचा अनुभव काश्मिरी मुलांनी अनेक वर्षे घेतलाय. त्याला कंटाळलेल्या काश्मिरी मुलामुलींनी उत्तम शिक्षणाची वाट धरली. आज अनेक तरु ण उच्चशिक्षित आहेत. कोणी सैन्यात भरती झालंय, आयएएस/आयपीएस करणारेही आता अनेकजण आहे, खासगी क्षेत्रात मोठय़ा पदांवरही आहेत. टेलिव्हिजनवर काश्मीरचं जसं चित्र दाखवलं जातं तितकी वाईट परिस्थिती काश्मीरमध्ये नाही. आज तरु णांना शिक्षण हवंय, नोकर्या हव्या आहेत. असं नाहीये की प्रत्येकालाच काश्मीरमधून बाहेर जाऊन शिकायचं आहे, प्रत्येकाला ती संधी मिळतेच असं नाही.आम्हाला बाहेर येऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली म्हणून आम्ही इकडे येऊन शिक्षण घेतोय. पण मग प्रत्येकवेळी आम्हालाच का देशभक्ती सिद्ध करायला लावता? जम्मू-काश्मीरच्या सैन्याच्या तुकडीत हजारो काश्मिरी तरु ण सैनिक आज आहेत. जे सीमेवर भारतासाठी लढताहेत. यापेक्षा अधिक देशभक्ती काय सिद्ध करायची? - मुख्तार अहमद
तरुण विद्यार्थी हेच देशाचं भवितव्य आहेत. तेच पुढे जाऊन खोर्यात सांगणार आहेत की बाकीचा भारत कसा आहे. त्यामुळे भारतातील विविध ठिकाणी शिक्षणासाठी आलेल्या विद्याथ्र्याना सतावणं योग्य नाही. - जावेद वाणी
काश्मिरी तरु ण हा शिक्षणासाठी भारतातल्या विविध शहरांमध्ये जातो, तो पाकिस्तानमध्ये जात नाही. जायचा प्रश्नच नाही कारण आम्हीही भारतीयच आहोत आणि आम्हाला भारतात कोठेही शिक्षण घेण्याचा हक्क घटनेने दिला आहे. काश्मीरचे विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत. परंतु त्यांना शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत. काश्मीरमध्ये शाळा, महाविद्यालये फार कमी आहेत. त्यातही कमी जागा असल्याने अनेक काश्मिरी तरु ण शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे महाविद्यालयांची संख्या काश्मीरमध्ये वाढवणं आवश्यक आहे.खरं तर पुण्यात इतकी वर्षे शिक्षण घेताना आम्हाला कधीच वाईट अनुभव आला नाही. - जाहीद भट रिकामं डोकं असेल तर त्यात काही वाईट लोक दगड भरतात. हेच तरु ण मग जवानांवर दगडफेक करतात. काश्मीरमध्ये सगळेच तरुण वाईट नाहीत. काही वाईट लोकांमुळे काश्मीर बदनाम होतंय. अगर मसला सुलझाना हैं तो एज्युकेशन और पॉलिटिकल डायलॉग बहुत जरु री है! - आदील मलिक
(राहुल लोकमतच्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आहे.)