शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

WhatsApp Privacy Policy: 'प्रायव्हसी पॉलिसी' पटेना, पण 'व्हॉट्सॲप'वाचून करमेना... काय करावं कळेना!

By अमेय गोगटे | Published: May 22, 2021 12:46 PM

WhatsApp Privacy Policy: एका तासातली ४०-४५ मिनिटं व्हॉट्सॲपला चिकटलेले 'मुंगळे'ही तुम्ही पाहिले असतील. हो ना? पण, पर्यायच नाही ना! आपण सगळे जण 'आदत से मजबूर' आहोत. पण, मार्कदादांनी आणलेल्या 'प्रायव्हसी पॉलिसी'मुळे अनेकांची पंचाईत झाली आहे.

ठळक मुद्दे 'व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी' ही ज्ञानाचा अखंड वाहणारा झराच आहे. गोपनीयता धोरण मान्य करा किंवा व्हॉट्सॲपमधून बाहेर पडा, असा कंपनीचा साधासरळ फंडा आहे. २०१९ मध्ये भारतातील युजर्स महिन्याभरात सरासरी १७.२ तास व्हॉट्सॲप वापरत होते.

- अमेय गोगटे

जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांची यादी ठरावीक काळाने कुठे ना कुठे प्रसिद्ध होत असते. ज्यांचे उच्चार करताना आपली बोबडी वळावी, अशी अनेक विद्यापीठं त्या यादीत आहेत. जिभेचा व्यायाम करायचा तर तुम्ही आत्ताही ती यादी गुगल करू शकता. पण, या यादीबद्दल माझी एक तक्रार आहे. अंहं अंहं, त्यात भारताचं किंवा भारतीय विद्यापीठाचं नाव नाही किंवा असेलच तर ते भिंगाने शोधावं लागतं, याबद्दल मला खेद, राग, चिंता नाही. कारण, आपली पोरं-पोरी जाम हुश्शार आहेत, जगात भारी आहेत, हे कित्येकदा 'पुराव्यानं शाबित' झालंय. मात्र, एका विद्यापीठाचं नाव या यादीतून सातत्यानं वगळण्यात येतंय आणि ते म्हणजे तुम्हा-आम्हा सगळ्यांचं लाडकं 'व्हॉट्सॲप विद्यापीठ'! कोरोनासारखी जागतिक महामारी, गाझापट्टीतील 'मारामारी', तौक्ते वादळाचा तडाखा, राजकीय आखाडा किंवा गल्लीतला 'राडा', या सगळ्याची इत्थंभूत, सर्वांगीण माहिती देत राहणारी 'व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी' ही ज्ञानाचा अखंड वाहणारा झराच आहे. तब्बल ३९ कोटी भारतीय या ज्ञानामृताचा लाभ घेत आहेत. पण, मार्कदादांनी आणलेल्या 'प्रायव्हसी पॉलिसी'मुळे या झऱ्याचं पाणी काहीसं गढूळ, खारट झालंय. ते कसं काय प्यायचं बुवा?, असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण, पाणी न पिऊन चालेल कसं?, ते तर 'जीवन' आहे ना, अशी अनेकांची पंचाईत झालीय.

खरं तर, व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसी हा विषय नवा नाही. त्यावर बरीच चर्चा झालीय. व्हॉट्सॲपला माघार घ्यावी लागेल, एवढं मोठं मार्केट गमावणं त्यांना परवडणारं नाही, त्यामुळे ते किमान भारतात तरी हे धोरण लागू करणार नाहीत, असा काही जणांचा अंदाज होता. मात्र, व्हॉट्सॲप त्यांच्या धोरणावर ठाम आहे आणि त्यांनी उच्च न्यायालयात तसं स्पष्ट सांगितलंय. गोपनीयता धोरण मान्य करा किंवा व्हॉट्सॲपमधून बाहेर पडा, असा त्यांचा साधासरळ फंडा आहे. यासाठी कंपनीनं १५ मे ची डेडलाईन दिली होती, ती पाच दिवसांपूर्वी संपलीय. या कालावधीत काही नेटकऱ्यांनी 'दादागिरी नही चलेगी' म्हणत आपला मोर्चा 'टेलिग्राम' किंवा 'सिग्नल'कडे वळवलाही आहे. पण, गोपनीयता धोरणाच्या अटी-शर्ती मंजूर न करता व्हॉट्सॲप वापरणारेही बरेच जण आहेत. या व्हॉट्सॲपप्रेमींसाठी येणारा काळ जरा खडतर असू शकतो. कारण, अशा युजर्सची एकेक सेवा बंद होत जाणार आहे. 

मेसेज फॉरवर्ड करणं, स्टेटस अपडेट करणं, ब्रॉडकास्ट लिस्टचा वापर, नवे ग्रूप बनवणं, व्हॉईस मेसेज किंवा स्टिकर्स पाठवणं, ही फीचर्स प्रायव्हसी पॉलिसी मान्य न करणाऱ्या युजर्सना वापरता येणार नाहीत. व्हॉट्सॲप सतत तुम्हाला गोपनीयता धोरण स्वीकारण्याबाबत पॉप-अप देत राहील. दोन आठवड्यानंतरही तुम्ही ते मान्य केले नाहीत, तर तुम्हाला मेसेज आणि कॉल येणंही बंद होणार आहे. 

२०१९ मध्ये भारतातील युजर्स महिन्याभरात सरासरी १७.२ तास व्हॉट्सॲप वापरत होते. हा वेळ २०२० मध्ये २१.३ तास इतका झाला. म्हणजेच, दिवसातील सुमारे ४० ते ४५ मिनिटं आपण व्हॉट्सॲपवर घालवतो. अनेक जण म्हणतील, काहीही काय?, आम्ही तर व्हॉट्सॲपवर अक्षरशः 'पडिक' असतो. ४५ मिनिटांत काय होतंय भाऊ? पण, ही सरासरी आहे. एका तासातली ४०-४५ मिनिटं व्हॉट्सॲपला चिकटलेले 'मुंगळे'ही तुम्ही पाहिले असतील. हो ना? पण, पर्यायच नाही ना! घरातल्या घरात चार जणांचा ग्रूप, नातेवाईकांचा ग्रूप (आईकडचे - बाबांकडचे), शाळेचे मित्र, कॉलेजचे मित्र, क्लासचे मित्र, सभ्य मित्र-पोचलेले मित्र, ऑफिसमधील सीनिअर्स, सहकारी, मित्र यांचे वेगवेगळे ग्रूप, बिल्डिंगचा ग्रूप, एरियाची खबरबात सांगणारे एखाद-दोन ग्रूप आणि वन-टू-वन गप्पा, या सगळ्याचं गणित मांडलं तर दिवस 'यूss' संपून जातो हो! काही जण 'डिजिटल डिटॉक्स' वगैरे करतात, पण तो झाल्यावर 'अनुशेष' भरूनही काढतात. खरं तर, आपण सगळे जण 'आदत से मजबूर' आहोत. त्यात लॉकडाऊनच्या, सोशल डिस्टन्सिंगच्या काळात या सोशल मीडियानेच आपल्याला बांधून ठेवलं होतं. त्यामुळे ही गाठ सोडणं आता तितकंसं सोपं राहिलेलं नाही.

प्रत्येकालाच 'प्रायव्हसी' हवी असते. ती मिळावी, जपली जावी, यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली, तर आपल्या सगळ्या गप्पा, चॅटिंग गोपनीय राहणार नाही, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. तुमची काळजी रास्तही आहे. पण, आपण नवा मोबाईल ॲक्टिव्हेट करताना, नवी ॲप इन्स्टॉल करताना जी सगळी  Allow ची बटणं दणादण दाबतो, त्यानंतर इंटरनेट प्रायव्हसी किंवा डेटा प्रायव्हसीचा विचार करण्यात फारसा अर्थ नाही. कारण, आपल्याबद्दलची बरीचशी माहिती आपण कंपन्यांना देऊन बसलेलो आहोत. तुम्हीही अशी Allow ची बटणं दाबली असतील, तर व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसीचं बटणही दाबून टाकायला हरकत नाही. कारण, आपला जेवढा डेटा द्यायचा होता, तो आपण दिलाय आणि त्यांनी आधीच घेतलाय. त्यामुळे या धोरणामुळे आपल्यासारख्या सामान्य युजर्सना फारसा फरक पडणार नसल्याचं अनेक टेक-एक्स्पर्टचं म्हणणं आहे. बिझनेस अकाउंट्सवर या प्रायव्हसी पॉलिसीचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. 

घसा खवखवत असला की पाण्यामध्ये मीठ घालून आपण गुळण्या करतो. त्याने घसा मोकळा होतो. व्हॉट्सॲपच्या ज्ञानरुपी झऱ्यातील खाऱ्या पाण्याचा अशाच गुळणीसाठी उपयोग करा. भरपूर गप्पा मारून मन मोकळं करण्यासाठी तिचा उपयोग होऊ शकतो. अर्थात, 'प्रायव्हसी' तुमची आहे, त्यामुळे निर्णयही तुम्हालाच घ्यायचाय. म्हणूनच, जे काही ठरवाल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा #मीजबाबदार!

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया