- इंदुमती गणेश
कोल्हापुरातील कुंभी, कासारी, भोगावती, पंचगंगा अशा 15 नद्यांना आलेला महापूर. शेकडो गावं पाण्यानं गिळल्यासारखी. आणि माणसं हतबल. आर्मी आली आणि मग जवान बोटीतून चार-चार नागरिकांना गावातून बाहेर काढू लागले.त्या जवानांबरोबर दिसल्या पांढर्या कपडय़ातल्या काही मुली. जवानांच्या खांद्याला खांदा लावून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये उतरलेल्या या तरुण मुलींच्या गटाचं नाव आहे ‘आपदा सखी’. म्हणजेच देशातील पहिली महिला रेस्क्यू टीम. या ‘आपदा सखीं’नी पुरुषांच्या बरोबरीने नव्हे, तर अनेकदा त्यापुढे जाऊन आपल्या क्षमता सिद्ध केल्या. पाण्यात सतत काम करकरून या मुलींच्या पायांना खत लागले आहे. हातापायांना जखमा झाल्या. दिवसरात्न पाण्यात राहून थंडी-तापानं काहींना गाठलं, तर कुणाच्या रक्तदाबाच्या तक्रारी सुरू झाल्या. मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी आपलं काम एका क्षणासाठीही थांबविले नाही. औषधे घ्यायची, काहीवेळ विश्रांती घ्यायची आणि पुन्हा पाण्यात उतरायचं. त्यांच्या या शौर्याला कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्नणेनेही सलाम केला आहे. मुली नाजूक असतात, त्यांना अवजड कामं झेपायची नाहीत, पुरुषांच्या तुलनेत ताकदीची कामं त्या करू शकत नाहीत आणि पुरासारख्या आपत्तीत त्या काय काम करणार अशा जेवढय़ा म्हणून संशयशंका लोकांना असतील तेवढय़ा सार्या या मुलींच्या हिमतीनं आणि कामानं पंचगंगेच्या पात्नात विसर्जित झाल्या. या कोल्हापूरच्या तरुणींनी हजारो नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. कळा सुटलेली गरोदर महिला, बोटीतच जन्मलेलं बाळ, काही दिवसांपूर्वी या जगात आलेली निरागस बाळं, अंगावरच्या कपडय़ांनिशी घराबाहेर पडलेल्या महिला, वृद्ध, महापुराच्या धास्तीनेच हृदयविकाराचा झटका आलेले अत्यवस्थ रुग्ण, तर कुणाचा झालेला मृत्यू.. या सार्यांच्या मदतीला या मुली धावल्या. आर्मी, आपत्ती व्यवस्थापन आणि लढवय्ये कोल्हापूरकर तरुण यांच्या सोबत या ‘आपदा सखी’ आणि व्हाइट आर्मी या संघटनेतील मुली उभ्या होत्या. त्यांच्या कामाची नोंद घेत, त्यांच्या हिमतीचं कौतुक करणं तर भागच आहे.
***
व्हाइट आर्मी काम कशी करते?
व्हाइट आर्मी या संघटनेत 2008 सालापासून मुली कार्यरत आहेत; तर कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने मार्च आणि मे महिना अशा दोन टप्प्यांत 93 मुलींना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. प्रशिक्षणानंतर तिसर्या महिन्यातच या मुलींना प्रत्यक्ष कामात उतरावं लागलं. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोली, कागल, करवीर या तालुक्यांच्या ठिकाणी या मुलींना पोस्टिंग देण्यात आलं होतं. सैन्यदल आणि ‘एनडीआरएफ’च्या टीम कोल्हापुरात दाखल होण्यापूर्वीच या मुलींनी नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू केलं होतं. गावातून सुटका झालेल्या नागरिकांना बोटीतून खाली उतरवून घेणं, बोटीत बसवणं, महिला-लहानग्या बाळांना, मुलांना खांद्याभर पाण्यातून बाहेर काढणं, त्यांना वाहनार्पयत नेऊन सोडणं, एखादा रु ग्ण असेल तर काठी आणि कापडाची झोळी करून रुग्णवाहिकेर्पयत नेणं, अगदी बोटीतून मृतदेह बाहेर काढण्यार्पयतची सगळी कामं या ‘आपदा सखीं’नी न डगमगता केली आहेत. वरून धो-धो पाऊस पडायचा; त्यातच पहाटे पाच वाजता त्यांचं काम सुरू व्हायचं ते मध्यरात्नी एक-दोन वाजता संपायचं. मोठय़ा हिमतीनं ही व्हाइट आर्मी पुरात उभी राहिलेली दिसली.
***आम्ही सगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहोत. पूर आल्यानंतर सगळ्याजणी पाण्यात रेस्क्यू ऑपरेशनसाठी उतरलो. हे सगळं करताना देशसेवा आणि समाजसेवेची भावना होती. आपणही कमी नाही, उत्तम काम करू हा आत्मविश्वासही या कामानं आला. 10 दिवस पाण्यात राहिल्यानं आम्ही सगळ्या आता आजारी पडलो आहोत; पण तरी काम थांबलेलो नाही.- शुभांगी घराळे ( सदस्य, व्हाइट आर्मी)
***
नागरिकांना वाचवायचं हे एकच ध्येय आमच्यासमोर होतं. मुली आहोत म्हणून कुठेही डगमगलो नाही, कमी पडलो नाही. देशातील पहिली महिला रेस्क्यू टीम म्हणून आम्ही केलेल्या कामाचं आणि अनेकांना वाचवण्याचं समाधान कमावलं हेच मोठं आहे. - पवित्रा डांगे ( सदस्य, व्हाइट आर्मी)
( इंदुमती लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)