बाळासाहेब काकडे
सह्याद्री पर्वतरांगांतील शंभूमहादेवाच्या उपरांगांत मोही (ता. माण, जि़ सातारा) हे सहाशे ते सातशे उंबरठा असलेलं गाव़ आठ दिवसांपूर्वी या मोही गावाला जाण्याचा योग आला. गावात गेलो तेव्हा मनात होतंच की भारताची बुलेटट्रेन धावपटू ललिता बाबर याच गावची. मग तिच्या घरी जाण्याचा मोह आवरता आला नाही़
मोही गावापासून साडेचार किलोमीटर अंतरावर, डोंगरपायथ्याशी दक्षिणमुखी दहा बाय दहाची एक पत्र्याची खोली आणि शेजारीच बिगर दरवाजाचं छप्पर आहे. हेच ललिताचं घर. हे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या धावपटूचं घर असेल, यावर आमचा विश्वास बसला नाही़ घराकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना मोबाइलला रेंज! याच छपरात ललिताचं बालपण गेलं़ आजही या छपराखालच्या चुलीवर ललिताची आई निर्मला भाकरी थापतात़
मी गेलो तेव्हा घराच्या मागे असलेल्या शेतात ललिताची आई बाजरी खुडत बसल्या होत्या़ ललिता नाशिकला गेली होती़ तिचे चुलते गणेशराव यांनी तिच्याशी संपर्क साधून दिला़ आणि तिथं त्या छपराखाली बसल्याबसल्या तिच्याशी फोनवर बोलणं झालं. तिथं गेल्यावर कळलं की दोन चुलत्यांच्या मिळून ललितासह कुटुंबात आठ बहिणी आणि तीन भाऊ़ त्यात एक भाऊ अंध़ ललिता सर्वांत थोरली़ वडील ट्रकचालक. एका अपघातामुळे ट्रकचालकाचा जॉब सोडून ते मोहीत स्थिरावले़ जमीन जेमतेम आणि माळरानाची. मोहीचे कन्या विद्यालय घरापासून चार- साडेचार किलोमीटर दूऱ शाळेला जाण्यासाठी ओबडधोबड पायवाट! कधी सायकलवर, तर कधी अनवाणी पायांनी सुसाट शाळेला जावं लागत असे. शाळेला जाताना पायात खडे, काटे रुतले़ अनेकदा पाय रक्तबंबाळ झाले़ या वेदना शमल्या पण पायात पळण्यासाठी बळ आलं.
ललिता फोनवर सांगत होती.. ‘२००९ साली २० व्या राष्ट्रीय ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी माझी निवड झाली़ ज्ञानेश काळे यांनी मला विजयवाड्याला नेले़ पण माझ्या पायात चप्पल होती़ त्यामुळे मला स्पर्धेत भाग येता येणार नाही, असं सांगण्यात आलं. काळे सरांनी अनेकांना विनंती केली, तेव्हा एका मुलाने त्याच्या पायातील शूज काढून दिले़ ते शूज पायात चढवून मी धावले आणि चौथ्या क्रमांकाने शर्यत जिंकली़ माझी पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा होती़ या प्रसंगाने मला लढण्यासाठी हिंमत दिली़ त्याच वर्षी छत्तीसगडला ३५ वी राष्ट्रीय ग्रामीण अॅथलेटिक्स स्पर्धा झाली़ या स्पर्धेसाठी जाण्यास पैसे नव्हते़ ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली़ वडिलांनी ५० हजारांचे कर्ज काढलं. याच स्पर्धेत मला सुवर्णपदक मिळाले आणि माझा धावण्याचा प्रवास वेगाने सुरू झाला़ माझ्या यशाचा पाया माहीच्या कन्या विद्यालय आणि महालक्ष्मी महाविद्यालयात रचला गेला़ त्याचे श्रेय क्रीडाशिक्षक आणि माझ्या चुलत्यांना जातं. त्यावेळी ना पायात शूज होते, ना अंगात टी-शर्ट़ फक्त शाळेसाठी पळायचे़ त्यात मोठी मजा होती.’
बोलता बोलता ललिताची आई सांगत होती की,
‘चुलीवरचा स्वयंपाक ललिताला विशेष आवडतो़ ललिता घरी आली की घरकाम आणि शेतीचं काम करते. गायीची धार काढते, आईला स्वयंपाक करू लागते, भांडी घासते़ कामाची कसली लाज?’
हे सारं बोलत असताना ललिताला मिळालेल्या बक्षिसांनी व पुरस्कारांनी गच्च भरलेलं कपाट दिसत होतं. काही बक्षिसं चुलत्यांच्या घरात ठेवलेली होती. ललिता आज पळताना दिसत आहे, केवळ तिचे चुलते गणेशराव यांच्यामुळेच़ ते सांगतात, ती कशासाठी पळते, हे आम्ही तिला कधी विचारले नाही़ एकदा गेली की सहा-सहा महिने घरी येत नाही. पण पोरीनं नाव काढलं!
ललिताच्या घरी आलो, गप्पा मारल्या, निघालो..
तरी कानात घुमत राहते, जिद्द आणि कष्टांची अविरत कहाणी..
(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत वार्ताहर आहेत़)