‘तू कालचा ‘एआयबी’चा ‘आॅनेस्ट कॅम्पस प्लेसमेंट्स’चा व्हिडीओ बघितलास ना? हाहा. सिरीयसली हिलॅरीयस..!’‘या! मॅन.. फनी अँड ट्रू. स्पेशली तो प्लेसमेंटवाला सीन. हाहाहा.’‘डूड... आपण पण तसेच पोहोचलोय.’‘लोल! सेम! आपल्या कंपनीतली सगळीच रे.’अनिकेत आणि श्रीधर. दोघंही इंजिनिअरिंगच्या आणि नुकतीच दोन वर्षं पूर्ण झालेल्या नोकरीतल्या अनुभवांविषयी बोलता बोलता आयटीत किलोकिलोनं भरती होते असं दाखवणाºया एका विनोदी व्हिडीओविषयी सांगत होते. दोघेही मुंबईचे. दोघांचं शिक्षण कंप्युटर इंजिनिअरिंगमधलं. पण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकले, कॅम्पसमधून नोकरी मिळाली आणि ट्रेनिंगमध्ये ओळख झाली. आता दोघे एकत्र पुण्यात कॉट बेसिसवर राहतात. व्हिडीओमधल्या त्या सीनमध्ये एका आयटी कंपनीतला अधिकारी ‘मास रिक्रुटर’ म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येतो. बाजारात भाजी खरेदी करायला आल्यासारखा सगळ्या मुलांना बघतो आणि किलोच्या दराने मुलांना घेऊन जातो. वरवर अतिशय मजेशीर वाटणारा असा हा सीन असला, तरी ‘प्लेसमेंट’ या इंजिनिअरिंग विश्वातील एका महत्त्वाच्या घटकावर आणि त्याच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारा हा व्हिडीओ.अनिकेत आणि श्रीधर आपल्या कॉलेजात झालेलं मास रिक्रुटिंग आठवत होते. अनिकेत आज ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीने कॉलेजमधल्या अजून दीडशे जणांना निवडलं होतं. त्यातच अनिकेत होता. श्रीधरच्या कॉलेजमध्ये हा आकडा होता दोनशे पार.‘पहिल्याच अटेम्प्टमध्ये नोकरी मिळाली. स्टार्टला ३.२ लाखाचं पॅकेज. और क्या चाहिये भाई?..’ही नोकरी तुम्ही का स्वीकारली याचं दोघांनीही हेच उत्तर दिलं. गेल्या काही महिन्यांच्या नोकरीच्या अनुभवाविषयी विचारल्यावर मात्र दोघंही वेगळंच बोलत होते. ‘काही सांगता येत नाही’ असा काहीसा चिंतेचा सूर अनिकेतचा होता, तर ‘नव्या लोकांना नाही काढणार. एवढ्या स्वस्तात, एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणणार कुठून? त्यामुळे अजून किमान दोन वर्षं तरी धोका नाही,’ असं मत श्रीधरचं होतं. मागच्या वर्षापेक्षा यावर्षी परफॉर्मन्स प्रेशर वाढल्याचं मात्र दोघांनीही कबूल केलं.असंच काहीसं म्हणणं कौस्तुभचंदेखील होतं. पण त्याचा प्रश्न अधिक गंभीर होता. कौस्तुभचं इंजिनिअरिंग झालं मेकॅनिकलमध्ये. सुरुवातीला मेकॅनिकल शाखेशी निगडित मनासारखी नोकरी मिळाली नाही. त्याचवेळी एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये त्याची निवड झाली होती. तात्पुरती ही नोकरी स्वीकारायची, पैसे कमवायचे आणि नोकरी करत करत ‘एमएस’साठी बाहेर जाण्याकरता तयारी करायची अशी सगळी त्याची योजना होती. पण वर्षभरात नवीन काम शिकण्यात तो व्यग्र होऊन गेला. अभ्यास मागे पडला. यावर्षी परत अभ्यास करून बाहेर जायची जेव्हा वेळ आली तेव्हा वेगळाच प्रश्न समोर उभा राहिला. मेकॅनिकल शाखेत शिक्षण घेऊन ‘आयटी’मध्ये केलेल्या दोन वर्षाच्या कामामुळे बाहेर प्रवेश मिळणं आज कठीण होऊन बसलंय. अशातच हा ज्या सॉफ्टवेअरवर सुरुवातीला काम करत होता ते आता जवळजवळ कालबाह्य झालंय. आता त्याच्या ऐवजी नवीन आलं. म्हणजे त्याचं पुन्हा ट्रेनिंग आलं. ते नाही व्यवस्थित केलं तर मागे पडण्याची भीती. त्यामुळे नोकरी गमावण्याची भीती. अशा विचित्र परिस्थितीत तो अडकलाय. निराश झालाय.आवडती शाखा की पैसेवाली नोकरी अशी कौस्तुभची घालमेल होते, तशी अनेकांची होते. पण सगळ्यांची होते का? पूजा म्हणाली नाही. तिचं मजेत चाललंय आयटीत. ती सांगते, ‘मला शिक्षण झाल्या झाल्या लगेच नोकरी हवीच होती. कारण लोन काढलं होतं, ते फेडायचं टेन्शन होतं. त्यामुळे इलेक्ट्रिकलमध्ये जरी माझं इंजिनिअरिंग असलं तरी मी इथे आले. पण मी खूश आहे. कष्ट काय सगळीकडेच करावे लागतात; जर तुमचं काम चांगलं असेल तर काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही असं मला वाटतं’ - पूजा तिच्या तीन वर्षांच्या अनुभवांबद्दल सांगत होती. ती तर यावर्षी कंपनीकडून कामानिमित्त मलेशियालाही जाऊन आली. इंजिनिअरिंग कॉलेजपेक्षाही तुम्ही कंपनीमध्ये कसं आणि किती वेगाने गोष्टी शिकता ते खूप महत्त्वाचं आहे असं तिचं मत आहे.मात्र प्रतीक सांगत होता ते अगदी वेगळंच होतं. प्रतीक औरंगाबादजवळच्याच एका गावातला. कंप्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यावर लगेच नोकरी मिळाली नाही. घरची परिस्थिती तशी बरी. त्यामुळे वेगवेगळे कोर्स करायचे आणि त्याबरोबर नोकरी शोधायची या उद्देशाने गेल्या वर्षी, त्याच्या दोन मित्रांबरोबर तो पुण्याला आलाय. इथे आल्यापासून कोर्स फी आणि राहण्या-खाण्यासाठी झालेल्या खर्चात इंजिनिअरिंगची अजून दीड दोन वर्षं निघाली असती असं तो सांगत होता.‘आम्ही कॉलेजमध्ये असताना काहीच शिकलो नव्हतो; त्या सगळ्यापेक्षा हा कोर्स बराच अवघड आहे. पण आता पैसे खूप खर्च होतायत’ - तो सांगत होता. त्याच्या मित्रांपैकी एक मागच्याच महिन्यात परत गावाला गेला. कोर्सच्या सरांच्या ओळखीतून प्रतीक पुढच्या आठवड्यात एका ठिकाणी मुलाखत द्यायला जाईल. सुरुवातीला पंधरा हजार मिळतील असं त्याला सांगितलंय. पण आता असंच हात हलवत माघारी जायचं नाही. मिळेल ते काम करायचं असं त्यानं ठरवलंय.पुण्यासारख्या शहरात राहण्याखाण्याचा खर्च जास्त. त्यात शिकायचं. मुलगा इंजिनिअर झाला म्हणजे भारी नोकरीला लागेल असं पालकांचं मत. त्यांच्या अपेक्षा, वाढतं वय आणि न दिसणारी संधी यात प्रतीकसारखे अनेकजण पुण्यात भरडले जाताना दिसतात. राबराब राबतात.आणि आताशा तर त्यातही एक नवीन ट्रेण्ड आला आहे.ते सारे कम्प्युटरच्या नवनवीन भाषा शिकत कोर्सेसच्या फिया भरतात.पुण्यात राहणाºया अनेक नव्या इंजिनिअर मुलामुलींना विचारा, सध्या काय करतोय?ते सांगतात, ‘लँग्वेजेस’!आणि त्या येत नाहीत कारण इंजिनिअरिंग करताना कम्प्युटरवालेसुद्धा या लॅँग्वेजेस शिकत नाहीत.तेच तेच प्रोग्राम्स, पाया भक्कम होण्यासाठी थिअरी चांगली हवी यामुळे जेमतेम शिकवलेली प्रॅक्टिकल्स. केवळ फाइल पूर्ण करायला दिलेल्या असाईनमेंट्स. इंजिनिअरिंगच्या दुसºया वर्षात गेल्यावर अचानक सगळे प्रोग्राम्स अंगावर येतात. पहिल्या सेमिस्टरला कसेबसे पाठ करून प्रोग्राम्स लिहिले जातात. मग तिसºया वर्षाला येईपर्यंत पेनड्राइव्ह लावून प्रोग्राम्स कॉपी करता येतात हे कळलं. तिसºया वर्षाला असलेला प्रोजेक्ट दुसºया कॉलेजमधल्या एका ओळखीच्या मुलाकडून आणला जातो. शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टचं कोणी कोडिंग बाहेरून करून घेतलेलं, तर कोणी अख्खा प्रोजेक्टच!मला भेटलेल्या बहुतेक सर्व, नोकरीसाठी आणि नोकरीमध्ये खस्ता खाणाºया मुलांच्या इंजिनिअरिंगच्या महत्त्वपूर्ण असा तीन वर्षांचा हा प्रवास. आयओटी, बिग डेटा हे तर त्यांच्या गावीही नसतं. कुणी शिकवलंच नाही ते, शिक्षकच बोगस होते म्हणून वेळ मारून नेली जाते.आणि मग इंजिनिअर झाल्यावर अनेकजण जागे होतात. आणि मग या तमाम लॅँग्वेजेस शिकायला कोर्सेस लावतात. बाकी शाखांचे इंजिनिअर तर त्यात असतातच, पण कम्प्युटर सायन्सवालेपण असतात. पुण्यात त्यासाठी येतात. आणि एकाएकी इंटरनेट आॅफ थिंग्जपासून बिग डाटा, नव्या भाषा त्यांच्या आयुष्यात येतात. आणि त्यासाठी नव्या क्लासेसचं चक्र सुरू होतं.आणि म्हणूनच शिक्षण होऊनही नोकरी नसलेल्यांची ‘कसली का असेना नोकरी हवी’ असं म्हणून ती मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे; त्यासाठी या लॅँग्वेजेसचा आधार घेतला जातो. ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना ती टिकवण्याचं टेन्शन. हे आयटीत नोकरी करणारे काही आता खडबडून जागे झाले आहेत. ते आॅनलाइन कोर्स शोधत आहेत. कोणाकोणाचे सल्ले ऐकून अजून नव्या कोर्सच्या मागे लागत आहेत. स्टार्टअप्सच्या आडवाटेने जाणाºयांची अस्तित्वाची वेगळीच जंग चालू आहे. अजून या नोकरीधंद्याच्या जात्यात न अडकलेले नक्की काय घडतंय याची फिकीर न करता सुपात निपचित पडून आहेत.जो तो आपापल्या परीनं आयटीत योग्य ‘लॉजिक’ शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण सगळ्यांच्या हाताशी ते कुठं लागतंय..?
1 इंजिनियरिंगचा टिळा लागलाय, त्यांना मिळेल ती नोकरी शोधण्याचं टेन्शन!2 जॉब आहे त्यांच्या नशिबी परफॉर्मन्स प्रेशर! शिकलेलं इतक्या वेगात जुनं होतंय, की आॅनलाईन कोर्सेस करून का असेना, नवं शिकायची तारांबळ! एक शिकली, की लगेच दुसरी लॅँग्वेज!3 स्टार्टअप्सच्या आडवाटेने जाणाºयांची वेगळीच जंग चालू!4 आणि अजून या नोकरीधंद्याच्या जात्यात न अडकलेले नक्की काय घडतंय याची फिकीर न करता सुपात निपचित पडून!