- संकेत थोरात
.तर मी आज तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. हवं तर गोष्टच म्हणा ना. तर ही सगळी कथा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात येऊन ठेपलेल्या एका क्लासच्या परिघाभोवती गरगर फिरत राहते.मुळात याला क्लास का म्हणावं (?) असा प्रश्नही तुम्हाला या ष्टोरीच्या शेवटाला पडेल अशी माझी लैच ठाम खात्नी आहे. परंतु असे असले तरी लौकिकार्थाने का होईना; हा एक क्लासच आहे, या मुद्दय़ावर आपण थोडावेळ का होईना रीतसरपणे ठाम होऊया. तर असा हा क्लास एकाच वेळी विविध प्रकारच्या नमुन्यांनी खच्चून भरलेला आणि भारलेला आहे. त्याला रिजनल टचसुद्धा आहे, बरं का. सबब त्याच्याबद्दल बोलताना ‘वो अपने आप में ही एक कसनुशी मिसाल है’, असं काहीसं बरळलं तर वावगं ठरणार नाही.
तर महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा केंद्रबिंदू म्हणजे मराठवाडा. त्या मराठवाडय़ात उद्योगाची पायाभरणी व्हावी किंबहुना त्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ इथल्याच मातीत तयार व्हावं म्हणून एकोणीसशेच्या कितव्या तरी साली औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजर्पयत महाविद्यालयाने अनेक अभियंत्यांच्या अनेक पिढय़ा घडवल्या आहेत. आजही पीडब्लूडी किंवा एमेसीबीतून एखादी बॅच रिटायर व्हायला आली तर त्यात निम्म्याहून अधिक अभियंते याच कॉलेजचे माजी विद्यार्थी निघतील. अर्थात त्यात अभिमान वाटावा असं फारसं काही राहिलं नाही. एकूणच जगात होणार्या बदलांचा वेग पाहता सरकारी नोकर्यांचाही काही भरवसा नाही. अन्यथा बीएसएनएल कर्मचार्यांचे कितेक महिन्यांचे तुंबलेले पगार हे कशाचे द्योतक म्हणायचे?असो.तर अशा या सरकारी महाविद्यालयात कुठल्याशा तरी ब्रँचच्या शेवटच्या वर्षात असलेला क्लास त्याचं शेवटचं महाविद्यालयीन वर्ष एन्जॉय करतो आहे. ज्याला मी इथे शेवटचं वर्ष म्हणत आहे, तेच मुळात संपत आलेलं आहे. जेमतेम एक महिना राहिला असेल फक्त. एकदा का परीक्षा होऊन सुटय़ा लागल्या की, सब खतम.मग कोण आयुष्यभरासाठी 9 ते 5 घासत बसणार? कुणी एमबीएला जाऊन कॉलेज लाईफचा राहता राहिला आस्वाद एकदाचा घेऊन टाकणार. कुणी त्यातही जीआरई देऊन परदेशात एमएस करायला जाणार. तसा हा प्राणी विरळाच म्हणायचा! इथे दुष्काळ मराठवाडय़ाच्या पाचवीला पूजला असताना कोण असल्या जीआरईसदृश कर्जाऊ उचापत्या करणार, म्हणा ! ते काहीही असो, ज्यांना वरचं काही जमलं नाही ते हमखास गेट, एमपीएससी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षारूपी मंदिराच्या गरगर प्रदक्षिणा घालणार यात शंकाच नाही.
तर अशा अधांतरी भविष्यामुळे भावी इआर लोकांच्या कॉलेज लाइफच्या शेवटाचा इस्कोट होत असताना पाहून क्लासच्या वर्गप्रतिनिधीला अचानक ट्रीप काढण्याचा चेव येतो. ( इआर म्हणजे काय? डीआरची नक्कल आहे. डॉक्टर लोक्स स्वतर्च्या नावाआधी डीआर लावतात, हे जगजाहीरच आहे. मग आम्ही इंजिनिअर लोक्सही त्यांच्यापेक्षा काही कमी नाही हे दाखवायचा एक बारकूला प्रयत्न म्हणजे नावाआधी इआर लावणं. तर लावू द्या!) वर्गप्रतिनिधीला वाटतंच की, अत्यंत एकजुटीनं यंदा क्लासची ट्रीप घेऊन जायचीच. मग अशा आणाभाका व्हॉट्सअॅप ग्रुपवर घेतल्या जातात. स्टाफच्या परमिशन्स मिळवल्या जातात. लोकेशन्स सेट केली जातात. भावी खर्चाचे एस्टीमेट्सही काढले जातात. पण कुठेतरी माश्या शिंकल्यामुळे ट्रीपचा टोटल फियास्को होऊन जातो. एव्हाना माश्यांनी मैदान मारलेलं असतं. आणि पुन्हा एकदा शेवटाची कडू सुरुवात झालेली असते. ट्रीपचं काय? कधीही काढता येईल; पण कडू शेवटाचं काय करायचं?काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात, मित्ना. लेट इट बी गो. म्हणा त्यांना निदान कल्टी तरी मारता येते.आणि इआर लोकांचं हे असं चक्र सुरूच राहतं.