- प्रज्ञा शिदोरे
विचार करा, गणितसारखा विषय जर तुम्हाला तुमच्या घरी, मित्रमंडळींबरोबर मजा करत, काही व्हीडीओ बघत बघत शिकता आला असता तर? किंवा भारताचा भूगोल, प्रत्यक्ष नद्या, जंगलं, शहरं बघून? आणि फिजिक्समधल्या काही कन्सेप्ट्स अशा की, ज्या मास्तरांनी १० वेळा समजावून सांगूनही नाही समजल्या, त्या एका वेगळ्या पद्धतीनं गोष्टीच्या स्वरूपात शिकता आल्या असत्या तर?
काय मज्जा येईल ना!
अशी मज्जा अनुभवायची आणि विषय समजून घेऊन पक्का करून घ्यायचा तर ‘खान अकॅडमी’ या संकेतस्थळावर जा!
२००६ साली सलमान खान (आपला दबंग फेम स्टार खान नाही हं!!) नावाच्या एका व्यावसायिकानं आपल्या भाच्चेकंपनीला गणिताच्या काही संकल्पना समजावण्यासाठी एक व्हिडीओ तयार केला. या चिल्ल्यापिल्ल्यांना हा व्हिडीओ पाहायला खूपच मज्जा आली. त्यांना संकल्पना कळल्या आणि ही सगळी प्रक्रिया अगदी मजेची, हलकी-फुलकी होती. सलमानने तो यू ट्यूब वर टाकला आणि आश्चर्य म्हणजे तो व्हिडीओ अनेक जणांनी पाहिला. त्याला फारच चांगला प्रतिसादही आला. अशा व्हिडीओचा इतरांना का उपयोग होऊ नये? इथूनच ‘खान अकॅडमी’ची संकल्पना पुढे आली. आणि व्हिडीओजच्या माध्यमातून शिक्षण देण्याची आणि तेही विनामूल्य ही संकल्पना पहिल्यांदा अस्तित्वात आली.
‘खान अकॅडमी’ हे एक शैक्षणिक साहित्य पुरवणारं संकेतस्थळ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संकेतस्थळावरील साहित्य सर्वांसाठी अगदी विनामूल्य उपलब्ध आहे. इथे गणितापासून जीवशास्त्रापर्यंत आणि भूगोलापासून ते इतिहासापर्यंत सर्व विषयांवर ७ ते १४ मिनिटांचे छोटे-छोटे असे ३००० च्या वर व्हिडीओज् आहेत. तुम्ही शाळेतले विद्यार्थी असाल तर तुम्हाला तो विषय नीट समजून घेण्यासाठी, शिक्षक असाल तर तो विषय कसा मांडावा याची कल्पना येण्यासाठी नाहीतर अगदी गंमत म्हणून काहीतरी नवीन बघायचं असेल तर इथला ‘फ्रान्समधील चित्रकार’ असा एखादा व्हिडीओ बघू शकता.
एखादी संकल्पना जर आपल्याला चित्ररूपात समजावली तर आपल्याला ती अधिक काळ लक्षात राहते असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच आज अमेरिकेमधल्या अनेक शाळांमध्ये हे व्हिडीओ रोजच्या अभ्यासक्र मात घेतले आहेत. आणि आता आपल्याही अनेक शाळांमध्ये शिकण्यासाठी अशाच चित्रफितींचा उपयोग केला जातो.
तर आपली ज्ञानाची कवाडे उघडण्यासाठी नक्की बघा : www.khanacademy.org