-निशांत महाजन
अनलॉकिंग सुरूझालेलं असलं तरी प्रत्यक्षात रोजगार/उद्योगांना मोठा फटका बसला आहे. अनेकांचे जॉब गेले, ज्यांचे टिकले ते कमी पगारावर काम करताहेत. कुणाकडे तक्रार करणार, पोट भरण्यासाठी आहे त्या नोक:या टिकवणंही भाग आहे. त्यात आता सर्वदूर रेटा आहे की, नवीन स्किल्स शिका. त्यातून काहीतरी इनोव्हेटिव्ह शिका, त्याचा कंपनीला फायदा झाला पाहिजे आणि तो तसा झाला तर पर्यायाने कर्मचा:यांना होईल आणि काहीसे लवकर करिअर मार्गी लागेल.मात्र हे सारं करायचं तर कसं? गुगल करुन पाहिलं तर शंभर स्किल आणि हजारो सल्ले सापडतील की हे करा, ते करा. ते जमवा, तसं वागा; पण प्रत्यक्षात करणं आणि वाचणं यात मोठंच अंतर आहे. वाचताना ज्या गोष्टी सोप्या वाटतात त्या प्रत्यक्ष करणं, अंगवळणी पाडणं सोपं नसतं. अनेकदा तर सोप्या सोप्या गोष्टीही कृतीत येताना फार त्रस देतात. आणि आता तर प्रश्न अस्तित्वाचा आहे.वर्क फ्रॉम होम एरव्ही कुणी केलं असतं? पण गरज म्हणून तेही आपण शिकलोच. त्यात धडपडलो, चिडलो; पण जमवलं. कारण प्रश्न पोटापाण्याचा आहे. मग नव्या काळात तगून राहायचं तर या अजून काही गोष्टी ठरवून शिकायला हव्यात.
1) आला प्रश्न की सोडव.वाटतं सोपं हे प्रकरण, पण तसं ते सोपं नाही. इंग्रजीत ज्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अॅबिलिटी म्हणतात. म्हणजे काय, तर आपल्यासमोर उभ्या प्रश्नाला भिडायचं. थेट. अनेकदा होतं काय, आपण कारणं सांगतो. प्रश्नाला भिडायला घाबरतो. नाहीतर बॉसला म्हणतो की, ही एवढी अडचण आहे तुम्ही काय ते पाहा.मात्र तसं न करता, तो प्रश्न सोडवणं आपल्या आवाक्यातलं आहे असं वाटलं, तर सरळ त्याला भिडणं आणि जे आपल्या टप्प्यात नाही ते लपवून न ठेवता, त्या प्रश्नावर बसून न राहाता सरळ कुणाची तरी मदत घेणं.तात्पुरती मलमपट्टी करून प्रश्न टाळणं, त्यापासून पळ काढणं हे काही कामाचं नाही. सध्या गोगेटर लोकच व्यवस्थापनांना हवे असतील, त्यामुळे बिनधास्त प्रश्नांना भिडायचं हे धोरण स्वत:पुरतं राबवलेलं बरं.
2) अॅनालिसिस येतं, मग सरका पुढे. अॅनालिसिस म्हणजेच विश्लेषण येतं? या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तात्पुरती तुमची नोकरी, काम टिकेलही. कारण बहुसंख्य लोकांना तेच येत नाही. मात्र यशस्वी व्हायचं असेल तर कॉम्प्युटरच्या एक्सेल शिट भरण्यापलीकडे काम शिकावं लागेल.त्यासाठी डेटा वाचणं शिका. विश्लेषण अनेक पद्धतीने करता येतं. त्याची माहिती गुगल केली तरी मिळेल, ते शिका. मुख्य म्हणजे आपलं साधं व्यवहारज्ञान वापरा की मग ते सुचेल जे कॉम्प्युटरला सुचत नाही.एकच डेटा समोर असेल तरी त्यात वेगवेगळी माणसं वेगळं पाहतात, त्यांना वेगळ्या गोष्टी दिसतात. माहितीचा उत्तम वापर करून घेता येणं आणि विश्लेषण कृतीत उतरवणं हे आता गरजेचं आहे.
3) गप्पा मारत बोला.मार्केटिंगचे जॉब काही तसे कमी होत नाहीत. तिथं आवश्यक असतो संवाद. मात्र वरवर, कोरडं, टिपिकल इंग्रजाळलेलं असं बोलण्यात काही पॉइंट नाही.असं बोला की समोरच्याशी दोस्तीच झाली पाहिजे. एकदम काळजाला हात घालता आला पाहिजे. थेट इमोशनल कनेक्ट साधण्याची ताकद पाहिजे शब्दात.ती जेव्हाच येईल जेव्हा आपल्या आवतीभोवतीची माणसं जसं बोलतात, तसं त्यांच्या भाषेत बोलायला हवं. माणसांचं मन वाचता यायला हवं. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन जे नातं तयार होतं ते इमेज, ब्रॅण्ड्स यांच्या पलीकडे असतं.सोशल मीडियात रमू नका, तिथं माणसांचा अंदाज येत नाही, माणसं वाचायची तर फिजिकल डिस्टन्सिंग पाळून का होईना माणसांतच जायला हवं.
4) काय बाद? काय आबाद?बघा, साबण ही गोष्ट बाद होत चालली होती. त्याऐवजी लिक्विड सोप, श्ॉम्पू, अन्य प्रसाधनं चलतीत होती. सॅनिटायझरची तर कुणाला गरजच नव्हती.पण कोरोना काय आला हे सुपरहिरो झाले. तेच आपल्याला आपल्या करिअरचंही करायचं आहे, बदलत्या काळात काय बाद होतं आहे आणि काय आबाद होतं आहे यावर नजर ठेवून त्या दिशेनं चालायला लागायचं आहे.संधी सर्वात आधी दिसणं आणि त्यासाठी धोका पत्करणं हीच मोठी गोष्ट आहे.
5) मल्टिटास्किंग पुरेकोरोनाने अनेक गोष्टी बदललत्या, तसं एक गोष्टही बदलली, मल्टिटास्किंगचा जमाना असला एका विषयात तरी आपण दादा पाहिजे. त्यातलं सखोल ज्ञान पाहिजे. नाहीतर पोपटपंची खूप; पण सगळे विषय कच्चे असं झालं तर यापुढे कुणी भाव देणार नाही.असा एकतरी विषय हवा की लोकांनी म्हटलं पाहिजे त्या विषयातलं काहीही विचारा त्या अमूकला येतंच. असे ‘मास्टर्स’ आता दुर्मीळ आहेत. त्यामुळे आपण नव्या काळात त्या दिशेनं गेलेलं बरं.
( निशांत मुक्त पत्रकार आहे.)