एक तरुण साधक असतो.
तो एका झेन गुरूकडे ध्यानधारणा शिकत असतो.
ते सारं वातावरणच सात्त्विक, शांत, अगदी साधंसं.
हा साधक तरुण, याला वाटतं की, या वेगानं तर कितीतरी दिवस लागतील आपल्याला सगळं शिकायला. थोडी घाई करायला हवी.
तसा तो हुशार होता, त्यात कष्ट करायची तयारी.
ब:याच दिवसांनंतर एक दिवस तो न राहवून आपल्या गुरुजींकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी ही संपूर्ण ध्यानधारणा शिकून त्यात पूर्ण पारंगत व्हायला मला किती दिवस लागतील?
गुरुजी म्हणाले, दहा वर्षे.
साधक म्हणाला, इतके दिवस. पण समजा, मी खूप अभ्यास केला, खूप मेहनत केली, रात्रंदिवस काम केलं तर किती दिवस लागतील?
गुरुजी म्हणाले, वीस वर्षे
साधकाला आपली चूक कळली. वाढणं वेगळं, रुजणं वेगळं आणि नुस्तं घाईघाई करत पळत सुटणं वेगळं.
वाढीचा वेग योग्य असला तरच त्या वाढीला काही अर्थ असतो आणि ती परिपूर्ण असते हे साधकाच्या वेळीच लक्षात आलं.
***
पण आपण?
आपण वाढतोय का असे?
की नुस्ते धावतोय.
शिक्षणाच्या नावाखाली नुस्ते पळतोय,
पण आपल्याला येत काहीच नाही.
आपण शिकतोय हा भ्रम कधी फुटायचा आपला?
मुख्य म्हणजे फुटेल का?
( एका ङोन कथेच्या संदर्भानं)