तुम्ही घरातून निघताना भले पाण्याची बाटली घ्यायला विसराल, घड्याळ, रुमाल, पाकीट तर हमखास विसराल, पण चप्पल किंवा बूट न घालताच घराबाहेर पडले असं कधी तुमचं झालंय का?
म्हणजे होतं का?
सहसा नाहीच, बहुतेक माणसं घरातून बाहेर पडताना न विसरता पायात चप्पल-बूट घालतातच. (फारच कुणी वेंधळं असेल तर गोष्ट वेगळी.)
आपल्या पायांचंच एक्सटेंडेड रुप असावं इतक्या सहजी आपण बूट-चप्पल वापरतो. कितीही उशीर झालेला असो, कितीही घाई असो चपला अगर बूट न घालताच पळत सुटलो असं सहसा कधी होत नाही.
पण नेमकं होतं काय आपण मारे निघतो घाईघाईत आणि ज्या पत्त्यावर पोहचायचं असतं तो पत्ताच काही केल्या सापडत नाही. याला विचार, त्याला विचार, नुस्ती धांदल. अनेकदा तर लोक चुकीचा पत्ता सांगत उगीच आपल्याला घुमवत बसतात.
मात्र कल्पना करा, घरातून निघताना आपण फक्त आपल्या बुटांना असं सांगितलं की, चला अमुक पत्त्यावर जायचंय की झालंच काम. आपण काही विचार करायचा नाही, शोधाशोध करायची नाही, डोकं चालवायचं नाही, कुणाला तोंड उघडून पत्ता विचारायचा नाही किंवा मित्राला शंभरदा फोन करून अरे काहीतरी लॅण्डमार्क सांग म्हणत चिडचिड करायची नाही. आपण सांगितलेल्या पत्त्यावर कसं पोहचायचं हे आपले बूट अचूक ठरवतील. लेफ्ट-राईट टर्न सांगत आपल्याला योग्य पत्त्यावर घेऊन जातील.
-कशी वाटते आयडिया?
फॅण्टसी?
अजिबात नाही. ही फॅण्टसी नाही, नव्यानं झालेल्या तेलंगणा राज्यातल्या सिकंदराबाद शहरातल्या ‘ड्यूकेरे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ नावाच्या एका छोट्याशा स्टार्टअप कंपनीनं हा असा भन्नाट बूट शोधून काढलाय. ‘लेचल’ त्याचं नाव. ब्ल्यूटूथ असलेल हा बूट एक भन्नाट गॅजेट आहे आणि वेअरेबल टेक्नॉलॉजीच्या जगात भारतीय इन्होव्हेशनचं एक मॉडर्न पाऊलही आहे.!
अनिरुद्ध शर्मा नावाच्या २४ वर्षाच्या इंजिनिअर होऊ घातलेल्या संशोधकाला ही कल्पक आयडिया सुचली. खरंतर दृष्टिहीन व्यक्तींना उपयोगी ठरेल अशी काहीतरी गोष्ट तो शोधत होता. अशी काहीतरी गोष्ट हवी जी अंध व्यक्तींना हिंडताफिरताना मदत करेल, त्यांना स्वतंत्र बनवेल असं अनिरुद्धला वाटत होतं. त्यातून त्यानं हा बूट बनवला. हा बूट पायात घातला आणि आपल्या स्मार्टफोनला कनेक्ट केला की गुगल मॅप्सच्या मदतीनं अंध व्यक्ती सहज हिंडूफिरू शकतील अशी ही कल्पना होती. म्हणजे होईल काय की, या बुटाला लावलेले चार व्हायब्रेटर मॅपप्रमाणे व्हायब्रेट होतील. पुढे-मागे, डावे-उजवे अशा चार दिशांचे हे व्हायब्रेटर, जो व्हायब्रेट होईल त्याप्रमाणं चालायला लागायचं असं साधं सरळ लॉजिक यामागे होतं.
नंतर मात्र अनिरुद्धला वाटलं की फक्त अंध व्यक्तीच कशाला, ज्यांना नव्या ठिकाणी प्रवासाला जायचंय, जे नेहमी फिरतीचं काम करतात, नवनव्या जागी जातात त्या सगळ्यांना हा बूट नक्की उपयोगी पडू शकेल. याशिवाय जॉगर्स, माऊण्ट बायकर्स, ट्रेकिंगला जाणारे, टुरिस्ट या सगळ्यांसाठी हा बूट उत्तम काम करू शकेल.
एवढंच नव्हे तर पर्सनल टूर गाइड्स, फिटनेस ट्रेनर्स यांनाही हा बूट उपयोगी पडेल. रनिंग, वॉकिंग, सायकलिंग याप्रकारच्या व्यायामप्रकारात हा बूट उत्तम मदत करेल. किती किलोमीटर प्रवास केला, किती चालणं झालं, किती कॅलरी जळाल्या याचा डाटाही हा बूट रेकॉर्ड करू शकेल. आपण आपल्या व्यायामाचं जे उद्दिष्ट ठरवू ते गाठण्यात आपण कमी पडत असू तर स्पीड वाढवायचा किंवा कमी करायचा हेही हा बूट सांगू शकेल.
असा हा बहुद्देशीय बूट, त्याचंच नाव ‘लेचल’.
अनिरुद्धबरोबर अमेरिकेतल्या एमआयटीमध्ये शिकणार्या क्रिस्पिअन लॉरेन्सने या बुटाच्या मार्केटिंगची जबाबदारी सांभाळली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये हा बूट जगाच्या बाजारपेठेत आणि ऑनलाइनही विक्रीसाठी उपलब्ध असेल. ‘लेचल’चं पेटंटही त्यांनी घेतलं आहे.
गुगल ग्लाससह अनेक वेअरेबल गॅजेट्सची जगभर चर्चा असताना आता लेचल नावाचा हा भारतीय बूटही जगभर कुतूहलाचा विषय बनला आहे.