- मयूर देवकर
I'm not the kind of person who tries to be cool or trendy, I'm definitely an individual.
only you & you alone can change your situation, Don't balme it on anything or anyone.
लिओनार्दो दिक्रॅप्रीओ. अॅक्टर, प्लेबॉय, फिलॉन्थ्रपिस्ट, पर्यावरणवादी आणि आता आॅस्कर विजेता अशी त्याची ओळख. परंतु बऱ्याच जणांसाठी तो आजही ‘टायटॅनिकचा हिरो’च आहे. आज त्याचा वाढदिवस. त्यानं वयाची चाळिशी ओलांडली असली तरी आजही तो अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. तो आवडतो, त्याचा अभिनय आवडतो असे दिवाने तर आहेतच; पण त्याच्या ग्लॅमरस लाइफस्टाइलची चर्चाही जगभरातील माध्यमांत सुरू असते. त्याच्या प्रत्येक आगामी चित्रपटाकडे आणि ‘नवीन’ गर्लफ्रेंडच्या नावाकडे फॅन्स आणि त्याचे टीकाकारही लक्ष ठेवून असतात. आलिशान पार्ट्यांचा शौकिन असलेला हा लिओ सुपरमॉडेल्सच्या गराड्यात दिसतो. वयाच्या फक्त २३ व्या वर्षी ज्यानं पैसा, प्रसिद्धी, नाव हे सारं कमावण्याचं रेकॉर्ड मोडलं, बनवलं आणि तो जगभरात हिरो झाला, तो आजवर. असं काय आहे या लिओत?त्याचं उत्तर अनेकजण शोधताहेत.कारण त्याला सरसकट उनाड, स्पॉईल्ड किंवा ऐयाश असं म्हणावं तर त्याचं सामाजिक कामही एवढं मोठं आहे की तो एकदम विचारीबिचारी वाटायला लागतो. कान्समध्ये यॉटवर लावण्यवतींसोबत पार्ट्या करणारा हा लिओ दिल्लीत सामाजिक विषयावर डॉक्युमेंटरी करताना दिसतो. एवढंच काय तर राष्ट्रसंघाने त्याला वातावरणातील बदलांविषयक मोहिमेचा शांतिदूत नियुक्त केलं आहे, कारण ‘क्लायमेट चेंज’ हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यासाठी नुकताच त्यानं‘बिफोर द फ्लड’ नावाचा माहितीपटदेखील बनवला.अशा एकदम परस्परविरोधी ‘इमेज’ घेऊन यशस्वी वाटचाल करणं कसं जमते त्याला? उत्तर शोधायचं तर लिओला थोडं समजून घ्यावं लागेल.लिओचा जन्म लॉस एंजलिसमध्ये झाला. तो पोटात असताना त्याची आई इर्मेलिन इटलीमध्ये प्रसिद्ध चित्रकर लिओनार्दो दा विंची यांची पेंटिग्ज बघत होती. त्याचवेळी बाळानं पोटात सर्वप्रथम पाय मारला. म्हणून त्याचं नाव तिनं ठेवलं लिओनार्दो. प्रेमाने ज्याला लिओ म्हणतात त्याचं बालपण हॉलिवूडनगरी लॉस एंजलिसच्या ‘हिप्पी कल्चर’मध्ये गेले. त्याचे वडील अंडरग्राउंड कॉमिक चळवळीमध्ये सक्रिय होते. लेखक चार्ल्स बुकोवस्की, बीट पोएट अॅलन जिन्सबर्ग आणिप्रसिद्ध एलएसडी गुरू टिमोथी लेरी यांचं त्याच्या घरी रोज उठणं-बसणं होतं.मुक्त, बंधनरहित जीवन व समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या या लोकांच्या सहवासात तो वाढला. व्यवस्थेला फाट्यावर मारणाऱ्या हरफनमौला वातावरणात सगळेच कलाकार होते. त्यामुळे त्यानं अॅक्टिंग करणं तसं काही फार वेगळं नव्हतं. रूप त्याला राजबिंडं लाभलं होतंच. लहानपणीही तो अत्यंत निरागस दिसायचा. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यानं जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. चौदाव्या वर्षापर्यंत तो वेगवेगळ्या मालिकांमध्ये झळकू लागला होता. पण मग शिक्षणाचं काय?तो सांगतो, ‘मला केवळ माझ्या आवडीच्या गोष्टी शिकायला आवडतं. बळजबरी, मारूनमुटकून माझ्याकडून काही अभ्यास होत नसे. ज्यात रस नाही त्या गोष्टींवर मला लक्ष केंद्रित करताच येत नाही. अभ्यास मी काय करणार?’ इकडं अभिनय जोमात होताच. त्याला चित्रपटात मोठा बे्रक तेव्हा मिळाला जेव्हा लेजेंडरी हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी निरोची नजर त्याच्यावर पडली. १९९२ साली त्याने डी निरोसोबत ‘धिस बॉयज् लाइफ’ चित्रपट केला आणि पुढच्या वर्षी जॉनी डेपसोबत ‘व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप’मध्ये काम केलं. यातील भूमिके साठी त्याला सहायक अभिनेत्याचं आॅस्कर नामांकन मिळालं. त्यावेळी त्याचं वय होतं फक्त १९ वर्षे.एक एक करत तो अप्रतिम चित्रपट करत होता. आताच कुठे विशीत असणाऱ्या लिओच्या अभिनय कौशल्याची ख्याती हॉलिवूडमध्ये पसरली होती. मेरिल स्ट्रीप त्याला ‘लिटिल जिनियस’ म्हणाली होती. १९९७ साली आलेल्या ‘टायटॅनिक’ने तर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. रातोरात तो ‘पोस्टर बॉय’ बनला. इंटरनेट तेव्हा बाल्यावस्थेत होतं. असं असूनही त्याच्याविषयी त्याकाळी ५०० वेबसाइट तयार झाल्या. हॉलिवूडच्या ‘ए’ लिस्टमध्ये त्याची एण्ट्री झाली आणि आजतागायत तो क्लबचा अघोषित ‘किंग’ आहे.मग खऱ्या अर्थाने सुरू झाले ‘लिओपर्व’.‘टायटॅनिक’नंतर त्याचे ‘रंगीन’ किस्से, प्लेबॉय इमेज गॉसिप कॉलम्समध्ये रंगविली जाऊ लागली. मागच्या १५ वर्षांचा विचार केला असता त्याचा कल गंभीर, कलात्मक आणि आत्मसंघर्षाने ग्रासलेल्या भूमिका करण्याकडे दिसतो. याचे कारण तो सांगतो की, ‘मला घाबरून टाकणारं, आव्हानात्मक, जोखिमेचं काम असेल तर ते करायला मजा येते. म्हणून तर मी जगभर अॅडव्हेंचर शोधत फिरत असतो.’म्हणूनच तो आजही ‘रिलेव्हंट’ वाटतो. तरुण मुलांच्या जगात त्याचे कोट्स व्हायरल होतात. ठरवून दिलेल्या साचेबद्ध चौकटी मोडत तो शोधत चाललाय आपापलं काहीतरी, चुकतमाकत, धडपडत आणि जिंकतही!( लेखक लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)
deokarmn@gmail.com