- प्रज्ञा शिदोरे
डेव्ह हान या अमेरिकन गिर्यारोहकाचं नाव नुकतंच गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डसमध्ये नमूद करण्यात आलं. कारण त्यानं माउण्ट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर हे तब्बल 15 वेळा सर केलं. बरं, पण याही पेक्षा अधिक वेळेला एव्हरेस्ट सर करणारे वीर आपल्या माहीत आहेत आणि ते म्हणजे तिथले शेरपा. त्यांचं रेकॉर्ड एक वेगळंच मानलं जात. आपा शेरपा यानं हा एव्हरेस्ट तब्बल 21 वेळा सर केलेला आहे. तर या डेव्हला एका मुलाखतकत्र्यानं एकदा विचारलं की, ‘एवढा मोठा पर्वत सर करताना, एवढय़ा जास्त जिवावर बेतेल अशा प्रसंगांना सामोरं जाताना अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला सर्वात मौल्यवान वाटली?’ या प्रश्नावर त्याचं उत्तर फारचं बोलकं होतं. तो म्हणाला की, ‘अनेक अशा वस्तू आहेत की ज्या नसत्या तर मी कधीच हा डोंगर चढू शकलो नसतो. त्यात आम्ही वापरत असलेली स्टिक आहे, बूट आहेत, दोरखंड आहे. पण, यापेक्षाही अधिक महत्त्वाचं जे काही असेल ती वस्तू निश्चित नाही. ती आहे एक व्यक्ती. एक शेरपा, ज्यामुळे किंवा ज्यांमुळेच मी एवढय़ा वेळेला पर्वत सर करू शकलो. ते नसते तर मलाच काय तर जगातल्या कोणालाही हा महाकाय पर्वत कधीच सर करता आला नसता.’ तो म्हणतो की कोणताही एव्हरेस्टवीर तेच सांगेल, की हे शेरपा नसते तर एव्हरेस्ट चढणं अशक्यचं झालं असतं.या सर्व शेरपांमध्ये एक नाव गौरवानं घेतलं जातं ते म्हणजे तेनझिंग नोर्गे. एडमंड हिलरी आणि तेनझिंग यांनी 1953 साली सर्वप्रथम एव्हरेस्ट शिखर सर केलं. 20व्या शतकातल्या सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी ही एक मानली गेली. यामध्ये मानवी साहसाबरोबरच प्रगत तंत्नज्ञानही साथीला होतं. हा पराक्र म गाजवल्यावर हिलरी हिरो झाला, तेन्झिंग काहीकाळात प्रसिद्धीच्या झोतात होता; पण काहीकाळानंतर दाजिर्लिंगमधल्या आपल्या घरी, तो अतिशय सामान्य आयुष्य जगत होता.पण ज्या शेरपांचं आयुष्य ज्यानं कायमचं बदललं, त्याला म्हणावं तसं श्रेय त्याच्या हयातीत मिळालं नाही. ‘तेनझिंग नोर्गे अॅण्ड शेरपाज ऑफ हिमालय’ हे पुस्तक तेनझिंग यांच्या आयुष्यतील काही महत्त्वपूर्ण घटना, ट्रेक्स यांचा लेखाजोखा आहे. तेनझिंगच्या नातू, ताशी तेनझिंग यानं लिहिलेल्या या पुस्तकात गेल्या 100 वर्षातल्या हिमालयीन सफारीचा आणि त्यामध्ये शेरपांचा हातभार याविषयीही सविस्तर माहिती आहे. साहसकथा आवडणार्या, आवर्जून ट्रेकिंग करणार्या कोणीही वाचावं असंच हे पुस्तक आहे. याबरोबरच ‘क्लाइम्बिंग टू द रूफ ऑफ वल्र्ड https://www.youtube.com/watch?v=1ixhZlyX0lA या नावाची डॉक्युमेण्टरी यूटय़ूबवर नक्की पाहा. यामध्ये त्या ऐतिहासिक सफारीचं नियोजन, आलेल्या अडचणी, अंतर्गत राजकारण अशा सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतील.
pradnya.shidore@gmail.com