खेडय़ापाडय़ात राहणा:या आणि सोशल मीडियाचं साधन हाती आलेल्या मुलींच्या जगात सुरू झालेलं एक नवीन युद्ध.
औरते.!
बहुत भली होती है
जब तक वे
आपकी हां में हां मिलाती है!
औरते.!
बहुत बुरी होती है,
जब वे सोचने-समझने और
खडी होकर बोलने लगती है !
ही कुअर रवींद्र हिची छोटीशी कविता खूप मोठा आशय व्यक्त करते.
जोवर मुली (स्त्रिया) कोणत्याही परिस्थितीत आपले मत व्यक्त करत नव्हत्या, विचार मांडत नव्हत्या तोवर त्या खूप चांगल्या होत्या. आता याच मुली समाजाच्या नजरेत वाईट ठरू लागल्या आहेत. कारण त्या निर्भीडपणो आपली मतं, विचार उघड व्यक्त करू पाहत आहेत.
आणि त्यासाठी त्यांना मिळालं आहे एक नवीन साधन, सोशल मीडिया त्याचं नाव. शहरीच नाही, तर खेडय़ापाडय़ात राहणा:या मुलींनाही सोशल मीडिया हा अभिव्यक्त होण्यासाठीचा उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. स्वत:च्या वैचारिक, भावनिक घुसमटीला मोकळी वाट करून देण्यासाठी या नव्या माध्यमाचा त्या पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. समाजात घडणा:या वैविध्यपूर्ण घडामोडींवर आपली स्वतंत्र मत, भूमिका अत्यंत स्पष्टपणो, काहीतर रोखठोक मांडताना दिसत आहेत.
कधीही मोकळेपणानं व्यक्त न झालेल्या मुलींसाठी फेसबुकची भिंत ही एक हक्काचं माहेर बनलं आहे. पावलापावलांवर होणारी मानसिक, भावनिक व वैचारिक कोंडी या फेसबुकच्या भिंतीद्वारे फोडली जातेय.
अगदी खेडय़ापाडय़ातल्या मुलीही स्वत:चे वेगवेगळ्या गेटअपमधे काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करायला जराही कचरत नाहीत. आपल्या फोटोंचा कुणी गैरवापर करेल अशी उथळ भीतीही त्यांच्या मनात उभी राहत नाही. सोशल मीडियाच्या मदतीने या मुलींचं बेधडकपण, निर्भीडपण अधोरेखित होत आहे, वृद्धिंगत होत आहे.
पण ही गोष्ट या मुलींसाठी सोपी नाही. रूढी, परंपरांच्या चिखलात आपले पाय घट्ट रुतवलेल्या समाजाला मुलींचं असं हे थेट बोलणं खटकतं. सोशल मीडियावर अॅक्टिव मुली पुरुषांनी त्यांच्या दृष्टिकोनातून मांडलेली मतं खोडून काढतात. वेळोवेळी वाद-प्रतिवाद करतात. ही गोष्ट सोशल मीडियावरच्या पुरु षी मानसिकतेलाही सोसत नाही. एखाद्या मुलीने एखाद्या पुरु षाच्या एखाद्या पोस्टवर थोडे जरी विरोधी मत व्यक्त केले तरी त्या पुरु षाच्या अहंला धक्का बसतो. मग अनेकदा हा पुरु ष वैयक्तिक पातळीवर उतरतो आणि तिच्यावर टीका करतो. आपल्यापरीने कंपू गोळा करून तिची बदनामी करायलाही काहीजण कमी करत नाही. काहीजणी या सा:याला पुरून उरतात. काहीजणी मात्र चिडून, वैतागून सोशल मीडियाला रामराम ठोकतात.
एकीकडे मुली बोलू लागल्या, लिहू लागल्या म्हणून कौतुकाचे फवारे उडवायचे आणि दुसरीकडे त्या लिहू-बोलू पाहणा:या मुलींचा आत्मविश्वास कमी करण्याचे उद्योगही करायचे असा अनुभव सोशल मीडियावरच नाही, तर प्रत्यक्ष जगातही नेहमीच येतो. आधुनिकतेचा बुरखा पांघरलेली जमात सोशल मीडियावर अॅक्टिव आहे, त्यात पुरुषांसोबत काही स्त्रियाही आहेत. ज्यांना वाटतं ‘आर्ची जन्मावी, पण ती शेजारच्या घरात.’
सैराटमधल्या आर्चीसारख्या बेधडक मुलींचं कीपॅडवर बोट आपटत ही जमात कौतुक करते; पण आपल्या मुलींना सोशल मीडियापासून चार हात लांब ठेवू पाहते. किंबहुना सून शोधतानाही अनेकजण आताशा थेट सांगतात की फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरत नसेल तर ते उत्तम. त्या मुलीला प्राधान्य देणारीही काही स्थळं आहेत.
दुसरीकडे अनेकदा मुलींचे कुटुंबीय, नातेवाईकही सोशल मीडियावर र्निबध आणण्याचे प्रयत्न करतात. मुळात ते फेसबुक वापरायचेच नाही ही घरच्यांची तंबी. आणि ज्या वापरतात त्यांनीही प्रेमाबिमाच्या कविता, लेख शेअर करायचे नाहीत, मित्र बनवायचे नाहीत अशी अनेक बंधनं मुलींवर घातली जातात. काही मुलीही आपल्यावरच्या बंधनात राहणंच पसंत करतात, तर व्यक्त होण्याची ऊर्मी असणा:या काही मुली स्वत:चं नाव बदलून फेसबुकावर व्यक्त होतात.
गावखेडय़ातल्या बोटांवर मोजण्याइतक्याही मुलींना सोशल मीडियाची ताकद माहीत नाही. काहींना माहत्ीा असूनही सोशल मीडियावर स्वत:चं खाते काढायचं स्वातंत्र्य नाही. त्यातून कुणालाही न जुमानता असं स्वातंत्र्य घेणा:या मुलींना अनेक अडचणींना, प्रश्नांना सामोरं जावं लागतं. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांच्या लग्नाचा. शहरातील मुलगी असो वा खेडय़ातील, जी मुलगी सोशल मीडियावर आपले विचार, मतं मांडते अशी मुलगी सून म्हणून आपल्याला डोईजड होईल असा अजब तर्कमुलांकडची मंडळी काढताना दिसतात. आणि तरुण मुलगेही या तर्काला संमतीदर्शक पुरवणी जोडतात.
सोशल मीडियावर निर्भीडपणो वावरणा:या मुलींचा आवाज असा दाबण्याऐवजी त्यांच्या विचारांना योग्य दिशा कशी मिळेल याचा प्रयत्न आभासी आणि वास्तव जगाकडून व्हायला हवा. तरच हे व्यक्त होण्याचं नवं स्वातंत्र्य मूळ धरेल असं वाटतं.
- कविता ननवरे
बी. बी. दारफळ
सोलापूर