- मनोज ताजणे,
‘त्या’ सातही जणी माडिया-आदिम जमातीच्या ! गडचिरोली जिल्ह्यातील सागाच्या किर्रर्र जंगलातल्या वस्तीतच जन्मल्या, वाढल्या. दुर्गम भाग, जंगल आणि शेती एवढंच जग. त्यापलीकडच्या जगाशी ना काही संपर्क ना काही ओळख. मात्र संधी मिळाली, मुख्य म्हणजे मनसोक्त खेळता-पळता आलं आणि इथंच वाढलेल्या या सात मुलींनी आपल्या पावलांना नवी वाट आणि स्वत:ला नवी ओळख शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.
काजल सोमा मज्जी (मिडदापल्ली), कल्पना शंकर मडकामी आणि सगुणा शंकर मडकामी या भगिनी (गोंगवाडा), प्रियंका लालसू ओकसा (मल्लमपोडूर), रोशनी साधू मज्जी (गोंगवाडा), मीना उसेंडी (बोटानफुंडी) आणि अनिता गावडे (होडरी) या सात मुलींची ही गोष्ट. डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसास्थित लोकबिरादरी प्रकल्पातर्फे चालविल्या जाणाऱ्या लोकबिरादरी आश्रमशाळेत या सातही मुली शिकल्या. गेल्या ६ ते ७ वर्षांत यातील पाच जणींची औरंगाबादच्या भारतीय खेळ प्राधिकरणमध्ये क्रीडा कौशल्यात पारंगत होण्यासाठी निवड झाली, तर एक विद्यार्थिनी हेमलकसा आणि दुसरी नागपूर येथे सध्या शिकत आहे.
लोकबिरादरी आश्रमशाळेत क्रीडाशिक्षक असलेल्या विवेक दुबे यांनी या मुलींतले कौशल्य हेरले, समीक्षा आमटे-गोडसे यांनी या मुलींना प्रोत्साहन दिले आणि म्हणता म्हणता या मुली जिल्हा आणि राज्यस्तरावर अव्वल येत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचं प्रतिनिधित्व करीत आहेत.
काजल सोमा मज्जी. १६ वर्षांची मुलगी. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम मिडदापल्ली या गावची. बाबा-आई शेतकरी. घरी दोन मोठ्या बहिणी आणि एक छोटा भाऊ असं कुटुंब. पाचवीपर्यंत काजल लोकबिरादरी आश्रमशाळेत असताना तिच्यातील जिद्द, चिकाटी व काटकपणामुळे लवकरच तिने लांब उडी या क्रीडा प्रकारात चमक दाखविली. २०१४ मध्ये तिला आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. पुढे लोकबिरादरी प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्या सारिका गायकवाड यांच्या मदतीने क्रीडाशिक्षक विवेक दुबे प्रकल्पातील काही निवडक खेळाडू घेऊन औरंगाबाद येथे असलेल्या भारतीय खेळ प्राधिकरणमध्ये दाखल झाले. त्यावेळी निवड चाचणीत लोकबिरादरी आश्रमशाळेचे नऊ विद्यार्थी विविध खेळांसाठी पात्र ठरले. त्यात काजल एक होती. राहण्याची, जेवणाची सोय क्रीडा संकुलात होतीच, पण शाळेचा प्रश्न होता. तो सारिका गायकवाड यांनी सोडवला. क्रीडा संकुलापासून जवळच असलेल्या ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षणाची सोय झाली.
सकाळ-संध्याकाळ ३-३ तास व्यायाम आणि तेथील प्रशिक्षक सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनात होणारा कडक सराव यामुळे २०१५ पासून स्पर्धांचे विविध टप्पे पार करत काजल राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचली. २०१७ मध्ये नागपुरात भरविण्यात आलेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत तिने लांब उडीत पहिला नंबर तर कनिष्ठ गट राष्ट्रीय खुल्या क्रीडा स्पर्धेत आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे दुसरा नंबर पटकावला. तिची उत्तम कामगिरी बघून २०१८ मध्ये तिला अंजू बॉबी जॉर्ज यांच्या बंगळुरू येथील क्रीडा अकादमीत दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. २०१८ मध्येच तिची निवड ‘खेलो इंडिया’मध्ये झाली आणि तिला केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याने ओडिशामधील भुवनेश्वर येथे असलेल्या खेलो इंडिया अकादमीत प्रवेश दिला. आता काजल पाच वर्षे तिथे राहणार आहे.
अशीच गोष्ट कल्पना शंकर मडकामी या मुलीची. तिचे गाव गोंगवाडा. दुर्गमच. घरात दोन भाऊ आणि एक बहीण. आई-वडील शेतकरी. २०१६मध्ये आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने लांब उडीत पहिला नंबर पटकावला. लोकबिरादरी आश्रमशाळेत सातवीत शिकत असताना २०१७ मध्ये तिची निवड भारतीय खेळ प्राधिकरण, औरंगाबाद येथे झाली. महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यास निवड झाली नाही म्हणून तिच्या शिक्षकांनी तिला आंध्र प्रदेशकडून खेळविण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये आंध्र प्रदेशातील स्टेट फेडरेशनच्या स्पर्धेत तिने पहिला नंबर पटकावला. त्यानंतर २०१८ मध्ये महाराष्ट्र स्टेट फेडरेशनच्या स्पर्धेत ती अव्वल राहिली. रायपूर येथे झालेल्या वेस्ट झोन क्रीडा स्पर्धेत ती दुसऱ्या स्थानी होती. भोपाळ येथे दोन महिन्यांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी तिची निवड झाली. २०१९ मध्ये पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत कल्पनाने सहभाग नोंदवला. एवढेच नाहीतर, विशाखापट्टणम, राजस्थान येथील स्पर्धाही तिने गाजविल्या. यावर्षी ती दहावीची परीक्षा देत आहे.
कल्पनाची मोठी बहीण सगुणा हीसुद्धा उंच उडी आणि भालाफेकची खेळाडू आहे. नववीमध्ये तिला भारतीय खेळ प्राधिकरणमध्ये प्रवेश मिळाला. तिथे भालाफेकमध्ये तिने उत्तम कामगिरी केली. राष्ट्रीय स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेत २०१५ मध्ये तिने भालाफेकमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. आता ती औरंगाबाद येथे पदवी अभ्यासक्रमाला शिकत आहे. विद्यापीठातर्फे क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असते.
प्रियंका लालसू ओकसा (रा. मल्लमपोडूर) आणि रोशनी साधू मज्जी (रा. गोंगवाडा) यांची पाचवीत लोकबिरादरी प्रकल्पाच्या आश्रमशाळेत असताना खेळ प्राधिकरणसाठी निवड झाली. औरंगाबाद येथे राहून प्रियंकाने ८०० मीटर रनिंग स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील विविध स्पर्धांत सहभाग नोंदवला, तर रोशनी हिने आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत गोळाफेकमध्ये पहिला नंबर पटकावला. पण, पुढे औरंगाबादमध्ये तिला ४०० मीटर रनिंगसाठी निवडण्यात आले. आता ती राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धांत सहभाग नोंदवत आहे.
या पाचही मुली आदिवासी समाजातील मागास माडिया जमातीमधील आहेत. पण, त्यांची जिद्द आणि मेहनत अशी की त्यांच्या सरावाच्या आड तक्रारींचे पाढे कधी आलेच नाहीत. या मुलींशिवाय अजून दोन मुली राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यातील एक मीना उसेंडी ही बोटानफुंडी येथील रहिवासी. भालाफेक स्पर्धेत २०१८-१९ आणि २०१९-२० असे सलग दोन वर्षे तिने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव घेतला. ती आश्रमशाळेत बारावीत शिकते आहे. याशिवाय होडरी या गावातील अनिता गावडे या विद्यार्थिनीने २०१९-२० मध्ये भालाफेकमध्ये राष्ट्रीय स्पर्धा खेळली. यावर्षी ती नागपूर येथून अकरावीची (विज्ञान) परीक्षा देत आहे.
दुर्गम भागातील मुलामुलींना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळालं तर अनेक उत्तम खेळाडू घडतील, असं लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे सांगतात.
अर्थात म्हणून सोपा नाहीच या मुलींचा प्रवास, वयाच्या मानाने समोर खडतर वाट आहे, कष्ट तर आहेतच. मात्र कशाचाही बाऊ न करता, त्या खेळ हेच आपलं ध्येय मानून आता राज्यच नाही, तर राष्ट्रीय पातळीवरही आपली गुणवत्ता सिद्ध करीत पुढे निघाल्या आहेत.
(मनोज ‘लोकमत’चे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी आहेत.)