- कविता ननवरे
बी. बी. दारफळ
सोलापूर
‘kavitananaware3112@gmil.com
आपल्या प्रेमाच्या गाडीला लग्न नावाचं
अंतिम स्टेशन मिळावं हा अट्टहास आताच्या
ग्रामीण तरुण पिढीचाही राहिलेला नाही.
कारण तिथवर पोहचणं अवघड,
जातीपातीचे, खानदानवाल्यांचे
काच जिवाला छळतात हे माहितीये आता सगळ्यांना !
मात्र तरीही या मुलामुलींना चोरूनलपून का होईना
प्रेम करून पाहायचं आहे.
आपल्या मनासारखं कुणीतरी भेटलं
याचा आनंद जगून पाहायचा आहे.
तेवढं जमणंही फार आहे अजूनही !
कॉलेजच्या दुस:या वर्षाला असणारी सुर्की लेक्चर बंक करून तिच्याच गावातल्या सत्तूच्या गाडीवर बसून शहराबाहेर हायवेवर फिरायला जाते तेव्हा तिला आभाळही ठेंगणं झालेलं असतं.
***
बसने कॉलेजला अपडाऊन करणा:या रानी आणि जावेदला बसमधे एका सीटवर जागा मिळते तेव्हा ते दोघंही सातवे आसमानपर पोहोचलेले असतात.
***
बाजारहाटासाठी गावातून शहरात आलेल्या गाववाल्यांच्या नजरा चुकवत ज्ञानू आणि सीमा बाजारातच असणा:या एखाद्या हॉटेलात चहा घेतात तेव्हा त्या चहासमोर सीसीडीतली कॉफीही फिकी असते.
***
गावखेडय़ातून शहरातल्या कॉलेजमधे रोज बसने शिकायला जाणा:या मुलामुलींसाठी डेटवर जाणं याहून वेगळं अजिबात नसतं. मेट्रो सिटीजमधल्या मुलामुलींसारखं फिल्मीस्टाईल प्रेम करावंसं त्यांनाही वाटतंच की. पण जिथं प्रेम हा शब्द उच्चारायचीही बोंब असते तिथं डेटवर वगैरे जाणं म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट.
आजच्या इंटरनेटच्या जमान्यात लहानथोरांच्या हातात स्मार्टफोन आलेले आहेत. गावखेडय़ातली मुलंमुलीही अपवाद नाहीत. कॉलेजच्या वेळेव्यतिरिक्त बाकीचे सगळे तास घरच्यांच्या, गल्लीतल्यांच्या नजरकैदेत असणा:या या तरुण मुलामुलींना आपल्याला आवडणा:या मुलाशी/ मुलीशी व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करायला, फोनवर बोलायला मिळणं हेसुद्धा आईसिंग ऑन द केकच असतं. शहरातल्या कॉलेजात जाताना बसस्टॉपवर उभं असताना होणारी एखादी नजरानजर, एखादा चोरटा कटाक्ष, खचाखच भरलेल्या बसमधे होणारा एकमेकांचा एखादा ओझरता स्पर्श हेही त्यांच्यासाठी प्रचंड रोमॅण्टिक फिलिंग असतं.
डेटिंग, सीसीडी, कॅण्डललाईट डिनर, ट्रेकिंग हे शब्द फक्त त्यांच्या स्वप्नातल्या डिक्शनरीतच वास्तव्याला असतात. या सगळ्या रोमॅण्टिक गोष्टींसाठी लागणारा पैसा तर त्यांच्याजवळ नसतोच नसतो आणि त्याहूनही अत्यावश्यक म्हणजे तशी संधीही नसते.
दहावी पास होऊन पुढचं शिक्षण घ्यायला शहरातल्या कॉलेजात जाणारे मुलंमुलीच फक्त प्रेम करतात असं अजिबात नाही. पुढच्या शिक्षणाचा खर्च आईवडिलांना ङोपत नाही म्हणून शिक्षण अध्र्यावर सोडणा:या, ऐपत असूनही शिक्षणाची फारशी गोडी नसणा:या गावातल्या मुलामुलींच्याही भावनांना प्रेमाचे धुमारे फुटतातच. पण प्रेमाबिमात म्हणजे काय असतं हे कळायच्या आधीच त्यांना बोहल्यावर चढवलं जातं. उरलेल्या बोटावर मोजता येणा:या काहींच्याच वाटय़ाला प्रेमाच्या बेटावर बागडण्याचं भाग्य लाभतं. अर्थात तेही सुखासुखी, सहजासहजी होत नाहीच.
त्याच्या मित्नांकरवी किंवा तिच्या मैत्रिणीकरवी दिल्या-घेतल्या जाणा:या निरोपांना इथं मैने प्यार किया मधल्या कबुतराहूनही अधिक महत्त्व असतं. हळूहळू बहरणारं, फुलणारं प्रेम कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून जिवाचा आटापिटा केला जातो. शिक्षणाच्या निमित्तानं कॉलेजात जाऊन का होईना प्रेम करण्याची संधी मिळते. मात्र ती ज्यांना मिळत नाही त्या कमी शिकलेल्या, रोजंदारीवर मोलमजुरी करणा:या, बाराही महिने गावातच राहणा:या किंवा फक्त नळावर पाणी भरायला जाण्यापुरतं घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य मिळालेल्या आणि तरीही प्रेमात पडलेल्यांना आपण एकमेकांसाठी रोमिओ-ज्युलिएट किंवा लैला-मजनूच आहोत असं वाटतं.
स्वत:च्या कमाईतून बाजूला काढून ठेवलेल्या किंवा घरून वह्यापुस्तकांसाठी, फीसाठी मिळालेल्या रकमेतून काटकसर करून साठवलेल्या पैशातून आपल्या मित्नासाठी/मैत्रिणीसाठी छोटीशी भेटवस्तू खरेदी करणं, ती कित्येक दिवस सॅकामध्ये दडवून ठेवणं, ती दडवून ठेवताना होणारी त्नेधातिरपीट आणि ती देण्यासाठी लपूनछपून कुठल्यातरी छोटय़ाशा हॉटेलात, कॉलेजच्या कोप:यावर तिची-त्याची भेट हीच त्यांची रोमॅण्टिक व्हॅलेण्टाईन डेट असते. मॅकडी, सीसीडी, बीच अशा ठिकाणी जाऊन ते काही त्यांचा व्हॅलेण्टाईन सेलिब्रेट करू शकत नाहीत. पण म्हणून त्यांचं प्रेमाचं सेलिब्रेशन त्यांच्यापुरतं थांबत नाही.
काही महिन्यांच्या, वर्षाच्या प्रेमात एकमेकांना साक्षी ठेवून घेतलेल्या आणाभाकांना कुणी शेवटर्पयत जागतं, तर कुणाला त्याची गरजही वाटत नाही. ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ करण्याचं धाडस बहुधा अनेकांकडे नसतं. मात्र खेडय़ापाडय़ातल्या बहुतेकांच्या प्रेमाची गाडी लग्नाच्या आधीच पटरी सोडते. जातीपातीच्या घोळात सारंच बिनसतं.
पण एक मात्न खरं की, आपल्या प्रेमाच्या गाडीला लग्न नावाचं अंतिम स्टेशन मिळावं हा अट्टहास आताच्या ग्रामीण तरुण पिढीचाही राहिलेला नाही.
स्वातंत्र्य नुकतं लाभत असताना, चोरूनलपून का होईना प्रेम करून पाहायचं आहे. आपल्या चॉईसनं कुणीतरी निवडून पाहायचं आहे. आपल्या मनासारखं कुणीतरी भेटलं याचा आनंद जगून पाहायचा आहे. हे करताना लगAाच्या अंतिम स्टेशनच्या अगोदर प्रवास थांबवावा लागू शकतो याची त्यांना कल्पना असतेच. पण त्यांचं म्हणणं इतकंच आहे की, ‘आम्हाला आमचे निर्णय घेऊ द्या, आता जगू द्या मनासारखं !’ पण तेवढी मुभा देईल तो आपला समाज कुठला.?
एक मात्र खरं, शहरातल्या प्रचंड मोकळीक मिळालेल्या प्रेमीयुगुलांचं जसं महिन्या- दोन महिन्यात ब्रेकअप-पॅचअप होतं तसं गावातल्यांचं होत नाही. शहराच्या तुलनेत ब्रेकअपचं प्रमाण कमीच. याला कारण म्हणजे एकमेकांचा क्वचित कधीतरी मिळणारा सहवास, आठ-पंधरा दिवसातून एकदा-दोनदा फोनवर बोलायला मिळणं. त्यामुळे गावातल्या प्रेमिकांसाठी प्रेमातले नव्याचे नऊ दिवस कित्येक महिने चालतात म्हणून नावीन्यही टिकतं.
शहरातल्या मुलामुलींसाठी प्रेमातून शरीरसुखार्पयत जाणारा मार्ग बराचसा सोपा असतो. हाच मार्ग गावातल्या मुलामुलींसाठी कल्पनेच्याही पलीकडचा असतो. जिथं मुलामुलींनी फक्त समोरासमोर बोलणंही निषिद्ध मानलं जातं तिथं या गोष्टी म्हणजे निव्वळ पापच. फोनवर बोलणं, चॅट करणं यासारख्या गुन्ह्यात पकडले गेलेल्यांना आजही जबर शिक्षा मिळते. त्यामुळे कुणीतरी आपल्याला आवडतं आणि आपणही कुणालातरी आवडतो याच्यापुढे फारसा विचार कुणी करत नाही. त्यात ऑनर किलिंग, सामाजिक पत, प्रतिष्ठा यांसारख्या प्रकारांना घाबरून अनेक मुलामुलींच्या मनात कोवळ्या, उमलू पाहणा:या भावनांचं बोन्साय होतं. आणि काहीतर कायमच अव्यक्त राहतात.
खेडय़ापाडय़ातल्या डेटिंगचं हे वास्तव. त्यात छिपछिपकेची मजा असली, तरी मनाचा कोंडमाराही मोठा आहे.