-डॉ. यशपाल गोगटे
प्यार किया नहीं जाता, हो जाता है, असं किती सहज म्हटलं जातं.वयात येताना तर प्रेमात पडणं, कुणाविषयी आकर्षण वाटणं, आवडलेल्या माणसांचा डीपी किंवा फेसबुक प्रोफाइल तासंतास पाहत राहणं, दुसरं काहीच करावंसं न वाटणं.हे सारं किती रोमॅण्टिक वाटतं. मात्र प्रेमात पडणं किंवा आकर्षण वाटणं म्हणजे मनाचा नाही तर शरीराचा केमिकल लोचा असतो, आणि त्याकाळात आपण त्या लोचामुळे भलभलते निर्णय घेतो, हे माहिती असलेलं बरं. जरा कोरडी वाटेल ही माहिती, कारण प्रेमात पागल झालेले लैला मजनू आपल्याला माहिती असतात, मात्र या केमिकल लोचाविषयी आपल्याला काहीच माहिती नसतं, त्यामुळे आपण प्रेमात पडलोय, शारीरिक आकर्षण वाटतं आहे म्हणजे नक्की काय होतं आहे हे कळतही नाही. प्रेमाचं वेड मात्र असंच लागत नाही, कुणीतरी आवडलो आणि आपण पाहताक्षणी प्रेमात पडलो असंही सोपं हे गणित नाही. प्रेमाचं हे वेड लागतं, त्याला कारणीभूत असतात आपल्या शरीरातले हार्मोन्स.आणि ते हार्मोन्स केमिकल लोचा करतात आणि मग प्रेमात पडल्यासारखं वाटतं. प्रेमात पडणं, प्रेमानं एकत्र, जोडीने राहणं ही भावना मुख्यतर् सस्तन प्राणी व पक्षी यांच्यात आढळते. आणि या प्रेमळ भावनेसाठी जवाबदार असलेलं हार्मोन म्हणजे ओक्सिटोसिन. आयुष्यभर सर्व प्रकारच्या प्रेम भावना निर्माण होतात त्या या ओक्सिटोसिनच्या कमी जास्त होणार्या प्रमाणामुळे. मेंदूच्या तळाशी वाटाण्याच्या आकाराच्या पिट्युटरी ग्रंथीत हे हार्मोन तयार होतं. पिट्युटरी ग्रंथीतून निर्माण होणार्या ओक्सिटोसिनचा जोडीदार हार्मोन म्हणजे वॅसोप्रेसीन. याच बरोबर कार्यरत असणारी हार्मोन्सची दुसरी जोडगोळी ही सेरोटोनिन - डोपामिनची. मेंदूत तयार होणारे हे हार्मोन्स. या संपूर्ण व्यवस्थेला सक्रिय ठेवण्याकरता अॅड्रिनल ग्रंथीतून निर्माण होणारे कॉर्टिसॉल व जननग्रंथीतून निर्माण होणारे टेस्टोस्टेरॉनही तेवढेच महत्वाचे असतात. शरीरातील संपूर्ण हार्मोनव्यवस्था प्रेमासाठी तत्परच असते.म्हणजे आपल्या शरीरातच प्रेमाचा एक उत्सव साजरा केला जातो. शास्त्नीय दृष्ट्या प्रेम हे तीन प्रकारांत असतं. मातृप्रेम, प्रणय (रोमँटिक लव्ह ) व बंधू-मित्न प्रेम. या तीनही प्रेमासाठी हामोन्स वेगवेगळ्या प्रकारात सक्रीय होतात. म्हणून तर अनेकदा आपल्याला आपले दोस्त जवळचे वाटतात. मैत्री, जिव्हाळा, आपुलकी व विश्वास हे सारं अधिक असतं. या बंधू- मित्न प्रेमाचा अतिरेक म्हणजे प्रत्येक वेळेस फेसबुकवर टाकलेल्या पोस्टना मिळणार्या लाईक्स मोजणं. त्या अधिक असल्यास शरीरात डोपामिनचे प्रमाण वाढतं. मग त्याचं व्यसन जडतं. अगदी दारू, सिगारेट व तंबाखू सारखंच मग फेसबुक- व्हाट्सअपचंही व्यसन लागू शकतं.
प्रणय अर्थात रोमँटिक लव्ह ही भावना हार्मोनच्या दृष्टिकोनातून जटील प्रकारात मोडते. या प्रेमाची सुरवात ही ओक्सिटोसिनमुळेच होते, या बरोबरच कॉर्टिसॉल, सेरोटोनिन व टेस्टोस्टेरॉन हे देखील सक्र ीय होतात. हे हार्मोन्स या सुरवातीच्या काळातील अनिश्चितता, उत्सुकता, असुरिक्षतता या संमिश्र भावना निर्माण करतात. धड धड वाढते ठोक्यात अशी काहीशी अवस्था होते. एकदम खूप प्रेमात पडल्यासारखं वाटतं, खूप रोमॅण्टिक वाटतं. हूरहूर जाणवते.त्याउलट म्हणजे प्रेमाच्या विरु द्ध असलेले राग, क्र ोध अथवा हिंसा या भावनांमागे देखील हार्मोन्सच जवाबदार असतात. त्यामुळे आपण प्रेमात पडलोय, कुणाविषयी आकर्षण वाटतं आहे, म्हणजे नेमकं काय झालं आहे, त्यातून आपली ही अनिश्चित अशी अवस्था आहे, त्यात एकदम मोठे निर्णय घेऊ नयेत. विचारपूर्वक, तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे. धडधड वाढते प्रेमात हे खरं, पण म्हणूनच जरा जपून असं सांगावं लागतं!
( लेखक हार्मोन तज्ज्ञ आहेत.)