-शर्मिष्ठा भोसले
जब मुश्किल समय आए
सबकुछ बेकाबू हो जाए
उससे थोडा और प्रेम करना
जिससे अब तक तुम करते आए..
- प्रिय कवी गीत चतुर्वेदी यांची ही कविता. कोरोनाकाळात, कडेकोट लॉकडाऊनच्या काळात हे किती खरं वाटून गेलं आहे. कोरोनाकाळात सगळं जग अनिश्चित, असुरक्षित तऱ्हेनं कोंडलेलं-थांबलेलं असताना आपल्या नात्यातला श्वास जमेल तसा एकमेकांना देत राहण्याची कसरत सगळ्याच माणसांनी केली. कोरोनाकाळात काय झालं माणसांच्या प्रेमाचं, काही नाती घट्ट झाली, काही तुटलीही असतील. कुणाच्या वाट्याला यश आलं, कुणाच्या नाही.
अनेकांशी बोललं तर हाती लागले काही अनुभव.
माझं नाव छापू नकोस, असं बजावतच एक मित्र म्हणाला, मी लहान गावातला. ती शहरातली. आम्ही दोघं गेली १० वर्षे रिलेशनशिपमध्ये आहोत. दोघेही १८ वर्षांचे असताना प्रेमात पडलो. डिप्लोमाला शिकत होतो. त्यावेळी आजूबाजूच्यांना आणि घरच्यांनाही आमचं प्रेम बालिश वाटायचं. आता लॉकडाऊनच्या काळात तर लोकांच्याच नाही तर आमच्याही नजरेत परस्परांच्या प्रेमाबद्दल जास्तच आदर निर्माण झालाय.
घडलं असं, की आता आम्ही दोघंही सरकारी नोकरीमध्ये आहोत. लॉकडाऊनच्या काळात तिच्यासोबत रूमवर असणारी मैत्रीण गावी निघून गेली. आम्ही एकमेकांपासून ९० किलोमीटरवर ड्युटी करत होतो. एकाएकी तिची तब्येत खूप बिघडली. हिमोग्लोबिन अतिशय कमी झालं. तशात ती एकटीच. ऑफिसमध्येच तिला एकाएकी चक्कर आली. आम्ही दोघेही अत्यावश्यक सेवांच्या नोकरीत. तो लॉकडाऊनचा सुरुवातीचाच काळ होता. मला रजा मिळू शकत नव्हती. आणि ती तिकडे एकटी होती.
पहाटे चार वाजता निघून सकाळी सहा वाजता तिथं पोचलो. तिला दवाखान्यात नेलं. खूप अशक्त झाली होती. टेस्ट केल्या. डॉक्टर म्हणाले, या काळात दवाखान्यात तर ऍडमिट करता येणार नाही. घरूनच उपचार घ्यावे लागतील. तिच्या घरच्यांना परिस्थिती कळवली होती; पण त्यांच्या शहरात कडक लॉकडाऊन असल्यानं कुणालाच येणं शकत नव्हतं. मी रोज १८० किलोमीटर जाणंयेणं असा प्रवास करायचो. असं सलग पंधराएक दिवस केलं.
तिला मेडिकल लिव्ह मिळाली. मला रजा मिळाली नाही. मग तसंच ऑफिस आणि दवाखाना अशी धावपळ त्या दिवसात केली. खूप दमवणारे आणि ताणातले दिवस होते; पण हेसुद्धा खरं आहे, की याकाळात आमचं नातं खूप पक्कं झालं.
एकदा सुरुवातीच्या काळात दवाखान्यात जाताना पोलिसांनी अडवलं. आम्ही मेडिकल रिपोर्ट दाखवले. पोलीस म्हणाले, तू कोण? आणि ही मुलगी घरच्यांसोबत न जाता तुझ्यासोबत दवाखान्यात का येते आहे? मी समजावलं तरी ऐकेनात. मग तिच्या आईला फोन लावला आणि बोलणं करून दिलं. तेव्हा शेवटी पोलिसांचं समाधान झालं. या काळात मी रोज स्वयंपाक करायचो. कपडे धुवायचो. भांडी घासायचो. बाकीही सगळी स्वच्छता-लहानसहान कामं पहायचो. ते दिवस आठवले की, अजूनही दोघांच्या डोळ्यात पाणी येतं. या दिवसांत आम्ही अजूनच जास्त जवळ आलो.’
ती पूर्णपणे बरी झाली. दोघांच्याही घरच्यांच्या मनात त्यांच्या प्रेमाबद्दल खूप विश्वास निर्माण झाला, हे या मित्राला खूप खास वाटतं. खरंतर हे दोघं प्रेमी मागच्या मेमध्ये कोर्ट मॅरेज करणार होते; पण लॉकडाऊनमध्ये ते मागं पडलं. आता कोरोना थोडासा ओसरल्यावर ते हॅपीली मॅरिड होणार आहेत.
प्रेम किती सहजपणे माणसांना जेंडर रोल्सच्या पलीकडं जायला शिकवतं, त्याचं हे एक रूप आहे.
योगेश ढाकणे. माध्यम क्षेत्रातला मित्र. लॉकडाऊनच्या काळात त्याच्याही जगण्यात ‘प्यार में ट्विस्ट’वाली फेज आली. योगेशची गर्लफ्रेंड एका मेट्रोसिटीमध्ये नर्स आहे. कोरोनाकाळात ती २४ तास ऑनड्यूटी. योगेश दिल्लीत एका माध्यम संस्थेत कामाला होता. लॉकडाऊन लागल्यावर तो तिकडंच अडकून पडला. त्यानंतरच्या काही महिन्यांनी त्याचा जॉबही गेला.
योगेश सांगतो, ‘आम्ही एरवी महिन्यातून एकदा तरी भेटायचोच; पण या याकाळात सलग सहा-सात महिने एकमेकांना पाहिलंही नाही. मला दिल्लीतून निघून भेटायला जाता नाही आलं. ती सतत कोरोना पेशंट्सना बरं करत त्या सगळ्या आणीबाणीच्या काळात वावरायची. त्या काळात तिची साहजिकच अपेक्षा होती, की मी तिला भेटायला जावं. त्यातून तिला जरा आधार आणि बळ मिळेल; पण मला ते खरोखर शक्य झालं नाही. मग आमची भांडणंसुद्धा होऊ लागली. आमच्यात खूप तणाव निर्माण झाला.
अर्थात आता आमचं नातं छान आहे; पण तो सगळा काळ घुसमटीचाच होता. विशेषतः ती माझ्यावर चिडायची तेव्हा खूप वाईट वाटायचं; पण माझा नाईलाज होता. ती फोनवर सतत मला भेटायला ये, असं म्हणायची. ‘तुला फक्त कामाचं पडलंय का? तू मला भेटायला यायला भीतोस का? मी तर कोरोनाला न घाबरता ड्यूटी करते आहे.’ असं ऐकवायची. माझा इगो हर्ट व्हायचा. एरवी आपण जवळच्या व्यक्तीला जगभरातले वाद-ताण सांगून मन मोकळं करतो. मात्र, त्याच व्यक्तीशी अबोला होत असेल तर मग काय? मग लॉकडाऊनच्या शेवटी तीच मला भेटायला आली. या काळात खरंच नात्यातल्या समंजसपणाचा कस लागला. मीपण खूप बदललो. आधी खूप चिडचिडा होतो. कदाचित खूप अपेक्षा करायचो जगण्याकडून. आता आतून हेच वाटतं, की आपण जिवंत आहोत हेच खूप आहे. आपण आपल्या प्रिय माणसाला या याकाळात गमावलं नाही, त्याच्यासोबत आहोत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, ही जाणीव झाली. एरवी लहानसहान गोष्टींसाठी किती आटापिटा, आदळआपट करतो ना आपण.
या काळात ती सतत कोरोना पेशंट्सवर उपचार, त्यांची सेवा करत राहिली. मात्र, तिला एकदाही कोरोना झाला नाही. अनेकदा तिच्या तिथल्या परिस्थितीची कल्पना करून मलाच ताण यायचा; पण ती सुरक्षित राहिली. तिनं तिचं कामही प्रामाणिकपणे केलं. माझ्या नजरेत तिच्याविषयीचा आदर अजूनच वाढला.
आता मोल कळलंय नात्याचं, माणूस म्हणून एकमेकांचं. आपलं सगळं आयुष्यच खूप फिल्मी आहे, हे मला नेहमी वाटतं. आता कोरोनानंतर तर हे खूपच ठळकपणे जाणवतं आहे. या सगळ्या काळाला त्यासाठी थँक्स!'
अशा कहाण्या ऐकल्या की, आपसुक शायर जिगर मुरादाबादी आठवतात. ते म्हणूनच गेलेत,
‘ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे
इक आग का दरिया है और डूब के जाना है..'
- लॉकडाऊनचा काळ या प्रेमीजनांसाठी आपापल्या पातळीवर खरोखरच आग का दारिया होता. यातून पार होताना त्यांचं प्रेम अधिकच उजळून निघालं...पण प्रेमच ते, आग दरिया, तो परीक्षा पाहिल्याशिवाय थोडंच पास करणार होता...
( शर्मिष्ठा मुक्त पत्रकार आहे.)