#weekiversary
-हा शब्द मिलेनिअल्स लव्हबर्ड्सला तसा काही नवीन नाही. आताशा तर प्रेमात पडलेले आपल्या प्रेमाचं पीडीए ( तेच पब्लिक डिस्प्ले ऑफ अटेंशन) इन्स्टाग्रामवरच करतात. बात तो यहाँ तक पहुँच गयी है की, तु्म्ही इन्स्टावर #weekiversary #lovepost या हॅशटॅगसह फोटो टाकत नाही तोवर तुम्ही खरंच सिरीअसली ‘कमिटेड’ आहात हे तुमचे मित्र मैत्रिणीही मान्य करत नाही. तिथं इतकं गुडीगुडी लिहितात अनेकजण की, इतरांना वाटावं यांचंच तेवढं काय ते प्रेम. आपण तर एकदम तुच्छ जीव.
मात्र या साऱ्याचा इतका अतिरेक होतोय की, प्रेमात असण्यापेक्षा, प्रेम करण्यापेक्षा त्याच्या प्रदर्शनाचाच सोस जास्त होतो आहे का असा प्रश्न अमेरिकनच नाही तर जगभरातलं इन्स्टा प्रेम पाहून चक्क न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रालाही पडला आहे. अलीकडेच तिथं प्रसिद्ध झालेला एक अत्यंत गंभीर लेख, त्याचा मथळाच आहे की, ‘आर यू रिअली इन लव्ह इफ इट्स नॉट ऑन इन्स्टाग्राम?’ या लेखात इन्स्टा पोस्ट, त्यासाठी खास काढलेले व्हिडिओ, फोटो, चुरचुरीत कॅप्शन्स. लालचुटूक हार्ट्स हे सारं म्हणजे प्रेम आहे का, आणि असलंच तर प्रत्यक्ष आयुष्यात ते इतकंच उत्कट असतं का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
यासह चर्चा जुनीच आहे की, डिजिटल काळातलं शो-शा -पीडीए प्रेमातला खरा थरार, त्यातला रोमान्सच घालवून टाकत आहे का?
कोरोना काळात तर या प्रश्नाची चर्चा अपेक्षितच होती. कारण सगळं ऑनलाइन गेलेलं असताना प्रेमही अधिकच डिजिटल झालं.
मात्र प्रश्न एवढाच आहे की, त्याच प्रेम किती आणि पीडीए किती. #weekiversary अर्थात दर आठवड्याला प्रेमाचा वाढदिवस नुसती पोस्ट लिहून साजरा करताना, त्यात खरंच प्रेम आहे का? #check!
......................