- श्रेणिक नरदे
जगात कुठंही गेलं तर दोन व्यक्तींमधे कायमचा सलोखा राहील असं कुणी लिहून देऊ शकत नाही. प्रत्येक दोन माणसांत भांडणं ही होतच राहतात. जगात कुठंही जा, ती होतातच. अगदी कशावरूनपण भांडता येतंच असतं. या भांडणात इतर सगळ्या गोष्टींप्रमाणं मापं असतात. उदाहरणार्थ- सौम्य भांडण, तीव्र भांडण, मध्यम भांडण (तू जेवली नाय तर मीपण जेवणार नाय...) अशा स्वरूपात ही भांडणं जगभर विविध भाषात, देशात, घरात, दारात वेगवेगळ्या कारणांसाठी होत राहतात.या भांडणात एका पार्टीने माघार घेतली तर ते मिटायची शक्यता असते नाही तर हमखास पेटायची शक्यता असते. राग, मोह, माया, काम, क्रोध विंचू चावून अशी भांडणं होऊ शकतात, म्हणजे होतात.प्रियकर-प्रेयसी यांची भांडणं हीसुद्धा सुदैवाने रोज होत असतात आणि त्यातून प्रेम वाढत राहतं. मुळात एकमेकांना समजून घेण्यासाठी सुरू झालेल्या प्रकरणात भांडणाशिवाय बºयापैकी समजून घेताच येत नाही असा समज असल्याने ही भांडण होत असावीत.पुरुषसत्ताक संस्कृती जरी आसली (म्हणजे असं बोललं जातंय) तरीही आपल्या समाजातील स्त्री हीच मॅनेजर असल्याचं वेळोवेळी दिसून येतं. उंबºयाच्या पलीकडे सत्ता गाजवणारे लोक घरात कुणाच्या इशाºयावर चालतात हे आपल्याला माहिती असावंच. विशेषत: भांडण या विषयात सतत मुद्दा लावून धरणं, मुद्दा रेटणं, आपली बाजू कशी योग्य ही पटवून देताना चार अयोग्य गोष्टी झाल्या तरी चालतील, पण मुद्दा पुढच्याला पटवून देणारच असा उत्साह हा फक्त मुलींच्या ठायी असतो. तो आम्हा बापड्या पोरांत नसतो. त्यामुळे सर्वाधिक प्रेमसंबंधातील भांडणात मुलगा हा बघत राहणं, ऐकून घेणं, मान डोलावणं यापलीकडे जास्त व्यक्त होत नाही.भांडण मिटवणं ही गोष्ट सहजासहजी शक्य नसते. यावेळी मित्र-मैत्रिणी हेच काय ते मेसेंजर, समजून घेणारे, समजूत काढणारे असतात. त्यांच्या मध्यस्थीनं बºयापैकी भांडणं मिटत असतात. नंतर मिटवणारे बाजूला पडत असतातच.पण कोणतंही भांडण हे चांगलंच असतं. हे बरीच भांडणं झाल्यानंतर झालेलं माझं मत आहे. कोणत्याही भांडणावेळची आपली मन:स्थिती शाबूत ठेवून भांडणाचा आनंद घेणे याइतका आनंद दुसरा कशात नसतो. भांडणात सहसा आपल्याला आपली खरी स्थिती कळते. आपल्याबद्दलचा पुढच्या व्यक्तीच्या मनातला राग कशावर आहे ते कळतं. रागाने फुटणाºया, तडतडणाºया व्यक्ती कढईतल्या जिलेबीसारख्या फुगत जात असतात. लाह्यासारखे तडतडत असतात आणि तडतडून हलक्या होतात. शेवटी लाह्या काय आणि जिलेबी काय आपणच खाणार असतो. त्यामुळे शांत राहून या भांडणाचा आनंद घ्यावा, आग कमी- अधिक लावणं हे आपल्या हातात असतं. ते आपल्याच हाती राहिलं तर आपण हारूनही जिंकत असतो.उलट भांडण ही संधी असते. एवढं कोण बोलून घेत असतं काय? एवढं बोलूनही बिचारा गप्प बसला, समजून घेतलं, शांत राहिला, एकही अक्षर उलट बोलला नाही. या समजुती पुढच्या व्यक्तीच्या मनात तयार झाल्यातर भांडण ही फायदेशीर गोष्ट नाही का?प्रेम व्यक्त करण्यासाठी माणसाला असंख्य धडपडी कराव्या लागतात. त्यातून आपलं प्रेम (व्यक्त केलेलं) किती प्रमाणात पोहोचलं? हे मोजण्याच कोणतंही साधन नसतंच. त्यापेक्षा साधं एखादं भांडण होईल अशी काळजी घेतली तर असंख्य गोष्टी साधता येतात.भांडणाच्या नादात अनेक नसलेल्या गोष्टी पुढे येऊन त्यावर चर्चा होऊन काहीतरी नवीन सापडतं. जुना मुद्दा भरकटत ठेवून नवीन मुद्दा घेऊन भांडणं यानं आपल्याच माणसाचा अंदाज येतो. मन मोकळं होतं. उगीच गैरसमज राहत नाही.भांडण हे व्यासपीठ आहे. भांडण हा प्रेमाचा अविभाज्य घटक आहे. त्यातून आपल्याला आनंदच मिळतो. नव्या गोष्टी समजत राहतात. प्रेमावर आलेली साय, शेवाळ निघून जातं. प्रेम पारदर्शी होतं. यासाठीच पाश्चात्य लोकांनी व्हॅलेण्टाइन्स डे नंतर स्लॅप डे चा प्रकार आणला असावा. अशी ही सुंदर भांडणं टाळू नयेत. कडाक्याच्या उन्हाळ्यात कडाडून भांडणं होत राहोत आणि दोघांतलं प्रेम वाढत राहो.