टेक्नॉलॉजीनं प्रेम करण्याची रीतच बदलून टाकली. आता प्रेमात पडलेले भेटतात कमी, बोलतात जास्त. त्या अतिबडबडय़ा प्रेमाची ही गोष्ट.
प्रेम सेम असतं असं कितीही म्हटलं, तरी प्रत्येक पिढीचे ते व्यक्त करण्याचे, साजरे करण्याचे ट्रेण्ड भलभलतेच असतात, वेगळे असतात आणि मागच्या पिढय़ांना विचित्र वाटावेत इतके भन्नाट आणि अकलनीय असतात.
आता व्हॅलेण्टाईन वीक सुरू आहे. कितीतरी वर्षे हा वीक साजरा होतो आहे. तेच गुलाब देणं, टेडी देणं, चॉकलेट देणं नी कॉफी प्यायला येतेस का विचारणं हे सारं अजूनही होतं. तितकंच टिपिकलं होतं.
तरी आता प्रेमात पडलेल्यांचे आणि डेटिंगचे फंडे बरेच बदलले आहेत. जे पूर्वी प्रेम करणा:यांच्या वाटय़ालाच आलेले नाहीत. कारण काय तर टेक्नॉलॉजीची कृपा आणि चोवीस तास कनेक्टेड असण्याची चंगळ.
त्यातलेच हे काही प्रेमातले नवे ट्रेण्ड्स.
आणि ते काही आपल्याच देशात आहेत असं नव्हे, तर जगभर हे ट्रेण्ड्स दिसू लागलेत.
त्यापैकीच काही महत्त्वाच्या ट्रेण्ड्सची ही एक झलक.
फोन कशाला? मेसेज कर ना !
अगदी दोनपाच वर्षापूर्वीर्पयत, मोबाइल हातोहात झाले तो काळ. कुणाचा फोन तासन्तास बिझी आला की लोक त्याला हमखास विचारत, काय रे प्रेमात पडलाये की काय? उत्तर मिळालं नाही तरी तेच असायचं. प्रेमात पडणं. तासन्तास बोलणं. रात्री तोंडावर पांघरुण घेऊन हळूहळू बोलत राहणं.
आता ते संपलं.
कारण बोलत राहायचं म्हणजे मग कुणीतरी ऐकणार, चर्चा होणार. त्यात कोपरे शोधा, लपून बसून बोला ब:याच भानगडी होत्या. त्या आता कुणी करत नाही. बोलण्यावर आणि फोन कॉलवर पैसे खर्च होण्यावर सोपा उपाय म्हणजे मेसेजिंग. सतत टुकटुक. सतत मेसेज. हरघडी. हरक्षण. रात्रंदिवस. दोन निळ्या रेषांचे सारे खेळ.
त्यामुळे आता तर अनेकांचं भेटणंही कमी झालं आहे. जे बोलायचं ते होतंय ना बोलणं, मग रोजरोज कशाला भेटायचं आणि कुणी पाहिलं म्हणत घाबरायचं असं म्हणणारे वस्तादही आहेत.
चावट गप्पांचा पूर
हे एक सर्रास सुरू झालेलं प्रकरण. सेक्सटिंग. शरीरसुखाशी संबंधित आणि उत्तेजित करणारं टेक्स मेसेजमधून बोलत राहणं. याचं प्रमाण अनेकदा इतकं वाढतं की, प्रत्यक्ष भेटल्यावर अनेकांना काहीच बोलता येत नाही. आणि सगळी एक्साईटमेण्ट या बोलण्यातून भागवली जाते. काही काळानंतर या सा:याचं व्यसन वाढतं. आणि ते घातकही ठरू शकतं. तसले मेसेज सतत करण्याची मागणी यातून ब्रेकअपचं प्रमाणही वाढतं असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.
स्क्रोल करत वाचत राहा.
एवढे मेसेज एकमेकांना करायचे आणि मग ते वाचत बसायचे. ते वाचणं, वाचून हसणं अनेकांना आताशा रोमॅण्टिक वाटतं. अर्थात ते वाटण्यात मुली आघाडीवर. त्या पुन्हा पुन्हा ती चॅट वाचतात. हरखून जातात. नव्यानं प्रेमात पडतात.
प्रेमाचं पीडीए
हे एक आणखी महत्त्वाचं. निदान शहरी भागात तरी. प्रेमाबिमात पडले आणि घरनं परवानगी मिळाली की मग सुरू होतं प्रेमाचं जाहीर प्रदर्शन. त्याला पीडीए म्हणतात. म्हणजेच पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन. म्हणजे काय तर आपल्याला त्या व्यक्तीविषयी जे वाटतं ते सोशल साइट्सवर जाहीर सांगणं. फोटो, कविता, बर्थडे विश इथपासून पहिल्यांदा एकत्र चहा प्यायला गेलो त्याची अॅनिव्हरसरी इतर्पयत काय काय फंडे लढवून इम्प्रेशन कायम ठेवलं जातं. जे असं पीडीए करत नाहीत त्यापैकी काहीजणांत हमखास त्यावरुन भांडणं होतात.
नॉन कमिटेड
पूर्वी अमुकतमुक माझी जीएफ आहे किंवा बीएफ आहे असं सांगण्यात फुशारकी होती. आता असं काही कुणी सांगण्यात नी मिरवण्यात इंटरेस्टेड नाही. म्हणजे यांचं अफेअर आहे हे ज्यांना माहिती आहे, त्यांना आहेच. बाकी इतरांना ते कुणी सांगत नाही, तसं लपवतही नाही.
त्याऐवजी नॉन कमिटेड असं सांगितलं जातं. आणि मग एकदा बाकायदा साखरपुडा ठरला कीच पाटी झळकते, एंगेज्ड!
ब्रेकअप. बाय.
पूर्वी अनेकांना प्रेमभंग किती मोठी गोष्ट वाटायची. किती जणांचे देवदास व्हायचे. ते आजही होतात. प्रेमभंग पचवणं सोपं नसतंच. पण आता या कडवट प्रसंगी अनेकजण प्रत्यक्ष भेटत नाहीत. बोलत नाहीत. एकदा का निर्णय झाला की एक मेसेज फक्त पाठवला जातो. इट्स ओव्हर. ब्रेकअप. बाय.
संपला विषय. त्यानंतर दुस:यानं पुन्हा पुन्हा संपर्क करू नये, बोलू नये अशी अपेक्षा असते. विशेष म्हणजे, आकांडतांडव न करता अनेकजण हा नियम पाळतातही.
- निशांत देशपांडे