पवन जाधव -
मीबारावी सायन्समध्ये शिकतो. चिंचडगाव ते वैजापूर हा आमचा रोजचा प्रवास. दररोज पेपर वाचन शक्य होत नाही. ‘नॅचरल दोस्ती’ हा कॉलम मला खूप आवडतो. ते वाचून मी ही या वर्षी एक उपक्रम करुन पाहिला.
दिवाळीला सगळेच आपापल्या घराची स्वच्छता करतात. पण आपण त्यापलिकडे जाऊन काहीतरी करावं असं वाटत होतं. आम्ही मित्र एकत्र जमलो आणि ग्रामस्वच्छता अभियान राबवायचं ठरवलं. संपूर्ण गावाची स्वच्छता करायची असं म्हणत कामाला लागलो.
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणं सकाळी ८ वाजता सर्वजण एकत्र आले. बसस्टॅण्डपासून स्वच्छतेला सुरुवात केली. गावातील रस्ते, त्यांच्या बाजूला लावलेली झाडे, त्यांच्या जाळ्या, रोडच्या कडेला लावलेल्या अस्ताव्यस्त विटा यांची साफसफाई केली.गवत काढून रस्ते नीट झाडून काढले. त्यानंतर गावातील मारुतीचं मंदिर धुवून स्वच्छ केलं. त्यावरील जुने झालेले झेंडे बदलून नवीन झेंडे लावले. यापूर्वी गावात कधीही असा उपक्रम राबवलेला नव्हता. गावातील स्वच्छता बघून गावातील लोकांनीदेखील आमचे कौतुक केले. आता आम्ही प्रत्येक महिन्यातून एक दिवस असा उपक्रम राबविणार आहोत.