-ऑक्सिजन टीम
प्रेमाची केमिस्ट्री असते. तशी दोस्तीची काही केमिस्ट्री असते..? म्हणजे हा आपला जवळचा, तो थोडा जवळचा, ती थोडी लांबची, ती लांबून जवळची, अशी काही मित्रमैत्रिणींची व्याख्या करता येते.? का मुळात अशी व्याख्या करणं म्हणजेच मैत्रीवर अविश्वास दाखवणं आहे..? -प्रश्न बरेच आहेत. पण प्रेमाची असते तशी दोस्तीचीही केमिस्ट्री असते.. आणि त्या केमिस्ट्रीतल्या केमिकल लोचात पुरतं लडबडल्याशिवाय नाहीच कळत की, आपलं मटेरिअल नेमकं कोणत्या केमिकलसाठी अनुकूल आहे.. फार बायो-केमिस्ट्रीचा क्लास झाला असं वाटतंय का.?
पण खरंच सांगतो, प्रेमापेक्षा अवघड असतं हे दोस्तीच्या केमिस्ट्रीचं प्रकरण. ते समजून घ्यायचं तर आल्याला जरा आपल्या दोस्तांना वेगवेगळ्या कॅटेगरीत घालायला लागेल..
- आता पुन्हा तेच हं, काही लोक म्हणतील दोस्तांना कॅटेगरीत घालणंच पाप..!
पण त्यांना सोडून ज्यांना आपल्या सच्चा दोस्तांची कदर करण्यासाठी काही प्रयत्न करावेत, असं वाटतं त्यांनी हा कॅटेगरीचा विचार करून पाहायला काही हरकत नाही..
तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तिथं असते ना ही कॅटेगरी करण्याची पद्धत.
आपल्या तमाम फ्रेण्ड्सना विविध कॅटेगरीत घालता येतं.
तसं प्रत्यक्ष आयुष्यात करता येईल का काही अत्यंत म्हणजे अत्यंत जवळचे मित्र..
काही फक्त दिनभरके,
म्हणजे कॉलेजच्या कटय़ावरचे..
काही फक्त कॅण्टिनवाले..
काही फक्त ट्रेकवाले..
काही ट्रेनवाले..
काही फक्त बसवाले..
काही फक्त गल्लीवाले..
- तुम्ही कराल तेवढय़ा कॅटेगरी.
आता या प्रत्येक विभागात ज्यांच्याशी आपली दोस्ती आहे त्यांच्याशी आपली वेगवेगळी केमिस्ट्री असते..
1) म्हणजे जे दोस्त आपल्या घरी येतात, आपले आईबाप आपल्यापेक्षा ज्यांच्यावर जास्त भरवसा ठेवतात, जे आपल्या वस्तू स्वतर्च्याच मालकीच्या समजून वापरतात, जे आपल्याला येता जाता डोस देतात, जे आपल्याला छळतात, जे आपल्याला जगणं नको करून सोडतात, जे आपण स्वतर्चं वाटोळं करून घ्यायला लागलो की जास्त सैरभैर होतात आणि आपल्याला ताळ्यावर आणतात..
अशा दोस्तांशी आपली केमिस्ट्री वेगळी असते..
मुळात ती जी काही केमिस्ट्री असते ती आपल्यालाच उलगडत नाही..
म्हणून खरं तर असं नातं निर्माण होतं..
ते नातं असतं म्हणून आपण असतो..
तेव्हा हे नातं निभावतांना आपण डोक्याचा वापर करू नये, व्यवहार पाहू नये हेच उत्तम.
उलट त्या दोस्तीचे आणि दोस्ताचे मानावे उपकार की ते आपल्या आयुष्यात आहेत.
2) पण सगळेच दोस्त असे नसतात. काही कामचलाऊ असतात. जे सतत पैसे उसने मागतात. आपल्या पैशावर मजा मारतात. आपल्या गाडय़ा उडवतात. आपलं क्रेडिटही ढापतात. अशा मित्रमैत्रिणींना वगळून टाकावं का आपल्या आयुष्यातुन..?
- तर अजिबात नाही, उलट हे दोस्त शिकवतात आपल्याला व्यवहार आणि देतात फुकट जगण्याचे धडे. सांगतात जगणं असंच जालीम आहे. त्यात टिकायच तर तुला हे सारं डिल करता यायलाच हवं.
ते जमतं, त्यांच्यामुळे, त्यामुळे त्यांच्याकडून ही व्यवहाराची केमिस्ट्री समजूनच घ्यायला हवी.
3) काही मित्रमैत्रिणी असतात जरा डँबिस ते फक्त अभ्यासाचा आणि आपल्याच करिअरचा विचार करतात. फक्त नोट्स, अभ्यास आणि करिअरसाठी ते येतात जवळ, त्यांच्याशी सुरक्षित अंतर राखणं हेसुद्धा जमायलाच हवं.
4) याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यायलाच हवा अंदाज की, कोणते दोस्त किती महत्त्वाचे. तेवढा जरी आला आणि आपल्याला ओळखता आले तरी खूप झाले.
5) आणि आपण करायला हवी स्वतर्शीही दोस्ती.
तीच नसेल तर इतरांवर आपण काय ठेवणार विश्वास..?