- माधुरी पेठकर
आपल्या लहानपणीच्या अनेक आठवणी एका व्यक्तीभोवती केंद्रित झालेल्या असतात. ती व्यक्ती म्हणजे आजी. आजीचं घर, आजीच्या हातचा स्वयंपाक, आजीच्या गोष्टी, आजीची गाणी, आजीची माया आणि आजीचा धाकही. आजी ही लहानपणात अनुभवविश्वाचा भाग झालेली असते.प्रत्येकाच्या मनातली आजी वेगळी असते. प्रत्येकाच्या आजीविषयीच्या आठवणी या वेगवेग्ळ्या असतात. पण प्रत्येकाच्या आजीत काही समान गोष्टी सहज सापडतात. माधवी वागेश्वरीलिखित-दिग्दर्शित ‘माई’ या शॉर्ट फिल्ममधली आजीही प्रत्येकाच्या मनातल्या आजीशी नातं सांगणारीच आहे.ही आजी भेटते ती माईच्या रूपात. पैठणच्या जुन्या वाडय़ात. सतत अभंग म्हणणारी, अंगाईगीतं गाणारी ही माई. शरीरानं अतिशय थकलेली; पण उत्साह दांडगा. ही माई भेटते ती आपल्या नातीच्या नजरेतून आणि आठवणीतून. ही माई मूळची पैठणजवळच्या बिडकीनची. लहानपणापासून तिच्या मनावर अभंग आणि ओव्यांचे संस्कार. त्यामुळे तिला लळाही त्याचाच. चौथी शिकलेल्या माईनं स्वतर्ला पाठ असलेले, नसलेले सर्व अभंग वहीत लिहून ठेवलेले असतात. पण एकदा ही अभंगाची वही हरवते. माई अस्वस्थ होते. खरं तर आताच्या संगणकाच्या कीपॅडच्या जगात माईची अभंगाची वही काही तासात परत तयार होऊ शकते. पण माईला एकसारख्या अक्षराची आखीव रेखीव ‘कॉपी’ नको असते. मग घरातला प्रत्येकजण वहीमध्ये अभंग लिहित माईची अभंगाची वही पूर्ण करत जातो. त्या एका वहीत घरातल्या प्रत्येकानं अक्षरं गिरवलेली असतात. माईंसाठी ही अक्षरं म्हणजे माणसंच. अक्षरांच्या रूपातली खरीखुरी माणसं माईला जास्त प्रिय वाटतात.नवर्याच्या पाठीमागे शिवणक्लास घेत, शिवणकाम करत आपला संसार सांभाळणारी ही माई, तिच्या संघर्षाची भली मोठी कथा सांगत नाही. दोन-चार वाक्यात आपल्या आयुष्यातले खडतर दिवस सांगून ती देवपूजेत रमते. नातीशी खेळण्यात दंग असते. बाळांतिणीच्या खोलीपासून वाडय़ातल्या अंगणार्पयत माई सर्वत्र वावरत असते. घरातल्या प्रत्येकाशी जोडलेली माई एकांतात राहून आपल्या मनातल्या सुख-दुर्खाशी गुजगोष्टी करतानाही दिसते. तिला पाहताना आपल्या आजीची आठवण सतत येतेच..माधवी वागेश्वरीची 19 मिनिटांची ‘माई’ ही केवळ शॉर्ट फिल्म नसून ती ‘डॉक्यु फिक्शन’चा एक प्रयोगही आहे. आजीच्या आठवणीतल्या काही गोष्टी फिक्शनचा आधार घेत उभ्या करताना दिग्दर्शिकेनं वास्तवातल्या आजीलाही चालतं-बोलतं केलं आहे. आठवणीतली आणि प्रत्यक्षातली माई अशा दोन माई या प्रयोगात प्रेक्षकांना भेटतात.दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्याकडून शॉर्ट फिल्मचे धडे गिरवल्यानंतर, त्यांच्यासोबत काम केल्यानंतर माधवीला स्वतर्लाही एक शॉर्ट फिल्म करावीशी वाटली. पण ती करताना तिला तिच्या आठवणीतलं, तिच्या स्वतर्जवळंच असं काहीतरी घेऊन फिल्म करायची होती. आणि तिच्या सर्वात जवळची म्हणजे माई. आपल्या आई-अण्णांपेक्षाही जिच्यासोबत जास्त काळ घालवला अशी माई. माईसारखा स्वयंपाक करता यायला हवा, माईसारखं घर ठेवता यायला हवं, माईसारखं संघर्षात तगून राहता यावं, माईसारखं मूल्यांवर आणि माणसांवर जिवापाड प्रेम करता यावं असा प्रत्येक बाबतीत माईचा प्रभाव असलेल्या माधवीला मग आपल्या फिल्मचा विषयही माईच ठेवावासा वाटला.