- संजय पाठकविदर्भातील दीक्षा. शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत. आईवडिलांसह सहा जणांचं कुटुंब. एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी मुलींना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे असं तिला कळलं. तिची परिस्थिती बघून तिची निवडही झाली. प्रशिक्षणात उत्तीर्ण झाल्याने चांगल्या पगाराची नोकरीही लागली...तृप्ती गजभिये. सुपरिमाची रहिवासी. वडील अल्पभूधारक शेतकरी. परिस्थती जेमतेम. मुलींनीच चालवायचं एक उपाहारगृह आहे म्हटल्यावर तिथं नोकरी मिळाली तर चालेल हे असं म्हणत तृप्तीलाही घरून कामाची परवानगी मिळाली.मोहिनी कांबळे नगरची. नोकरीची गरज असल्यानं तिनंही नव्या संधीला होकार भरला आणि एक नव्या कल्पक रेस्तरॉमध्ये दाखल झाली. नागपूरमधील रिना अहाके, हीदेखील जेमतेम बारावी झालेली, तर सीमा कोर्चे ही तर नववीपर्यंतच शिकू शकलेली. रेखा बंबाचार ही पवनीची. तिचे वडील वेटरकाम करतात. कुटुंबीयांना मदत म्हणून रेखा शाळकरी मुलांची ट्युशन घ्यायची. रिटा पझरे, सोनल सोनरकर, पूनम नैताम या मुलीही वेगवेगळ्या छोट्या गावातल्या. साºयांची स्थिती जेमतेम; पण परिस्थितीने शिकवलेली जिद्द, मेक ओव्हरची तयारी आणि इंग्रजीदेखील बोलावंच लागलं तर तेही शिकू अशी मनाची तयारी. खरं तर या सर्वच मुली सामान्य कुटुंबातल्या. ग्रामीण भागातल्या. आर्थिक ओढाताणीनं पिचलेल्याच. दोन जणी तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या. शिक्षण जेमतेम असले तरी त्यानुरूप फारशा संधी नाहीत. गावातील परंपरागत वातावरणात वाढल्यानं बुजºया, काहीशा अबोल.मात्र काळ कसा बदलतोय पाहा, या मुलींचं हे गरजवंत असणं, ग्रामीण भागात जगणंच त्यांना नोकरी मिळवून देणारं ठरलं. नव्या काळात नोकरी देताना कल्पक उद्योजक काय काय विचार करतात याचंही हे एक उत्तम उदाहरण आहे. उच्चशिक्षण आणि अन्य व्यावसायिक कौशल्य ही नोकरीसाठी महत्त्वाची पात्रता समजली जाते; पण या मुलींचा यूएसपीच वेगळा ठरला. मुळातच वेगळ्या थीमवर आधारित एक फूड रेस्टॉरण्ट चालवण्याची कल्पना पुढं आली आणि तिथं ज्यांना नोकरी द्यायची त्यासाठीचे निकषही वेगळेच ठरवण्यात आले. नोकरी व्यवसायासाठी प्लेसमेंट सर्व्हिस चालवणाºया संस्थांकडे उद्योजक किंवा व्यावसायिक आपल्या गरजेनुसार अनेक मुला-मुलींची मागणी करतात. ते करताना त्यांच्या आगळ्या-वेगळ्या अटीही असतात. त्या पूर्ण करताना संबंधित प्लेसमेंट कंपनीचे कौशल्यही पणाला लागत असतं. नाशिकच्या वैभव प्लेसमेंटचे संचालक श्रीधर व्यवहारे यांच्याकडे विकास गोयल नामक एक असामी आली. वर्व्ह हॉस्पिटीलिटीचे मुख्य कार्यकारी संचालक. त्यांनी भारतीय खाद्यपदार्थांच्या उपाहारगृहांची साखळी तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला; परंतु त्यांनी ठरवलं होतं की अशाप्रकारची चेन मुलीच चालवतील. आणि त्यांनी ठरवलं होतं की जिथं हे रेस्टॉरण्ट सुरू होणार तिथं काम करणाºया मुली किमान दोनशे किलोमीटर अंतराबाहेरील असाव्यात. ही अशी अट का तर त्यांना वाटत होतं की, एकतर मुली कामात अत्यंत सिन्सिअर असतात. आणि गरजवंतांना संधी दिली तर ते त्याचं सोन करतात. गरजवंत असलेला उमेदवार कामात टाळमटाळ करत नाही. अकारण कारणं सांगून सुट्यादेखील घेत नाहीत. सतत घरी पळत नाही. बंगळुरू येथील एका कारखान्यात सर्वच कारभार महिलांच्या हाती आहे. त्याच्या कामाचा पूर्वानुभव असल्यानं श्रीधर व्यवहारेंना ही कल्पना आवडली. गोयल यांच्या कामकाजातील वेगळेपणा त्यांना भावला.स्नायडरसारख्या मोठ्या कंपनीचे संचालकपद भूषविलेल्या गोयल यांनी देश-विदेशात प्रचंड प्रवास केला आहे. त्यातून त्यांना फूड चेनची एक कल्पना सुचली. भारतात आजही ७० टक्के पर्यटन हे धार्मिक स्थळीच होते. तेथे येणाºया वर्गाला सोयीचे असे पदार्थ दिले तर त्यांना ते अधिक आवडेल याचा अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी वीस भारतीय पदार्थांची निवड केली.साºया तयारीनंतर कुशल मनुष्यबळाचा शोध त्यांनी घेतला. विदर्भ, साताºयासह विविध ठिकाणी अशा प्रकारच्या तब्बल दोनशे मुली निवडण्यात अल्या. त्यानंतर निवडलेल्या मुलींची लॉजिकल टेस्ट घेण्यात आली. तोंडी परीक्षा घेताना त्यांच्यात कमी-अधिक असलेले गुणही हेरले गेले. त्यानंतर निवड झालेल्या तेरा जणींना नागपूर, यवतमाळ आणि सातारा येथे खास प्रशिक्षण देण्यात आले. आदरातिथ्य, ग्राहकांशी बोलणं, व्यवहारापुरते इंग्रजी ज्ञानही देण्यात आले. दोन महिने हॉटेलमध्ये सेवा कशी द्यावी याची रंगीत तालीम देण्यात आली आणि अखेरीस साईनगरीत युवतींनी चालविलेले पहिले ट्रेल हे चेन रेस्तरॉ सुरू झाले.गावातलं बुजलेपण बाजूला ठेवून या मुली एका नव्या अनुभवाच्या आधारे आपल्या आयुष्याची पायाभरणी करत आहेत.( लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत. sanjukpathak@gmail.com )