प्रज्ञा शिदोरे
ही गोष्ट आहे अशीच एका इतिहास आणि नकाशे वेड्या प्रकल्पाची. या प्रकल्पाचं नाव ‘मनहट्टा प्रोजेक्ट’!तर १६०९ सालच्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला हेनरी हडसन आणि त्याच्या सहकाºयांनी पहिल्यांदा आपले जहाज, इकडचे स्थानिक ज्याला ‘मनहट्टा’ नावाच्या बेटावर आणून पोहचवले. डच किंवा इंग्लिश हे खरंतर नोंदी ठेवण्यामध्ये माहीर. पण १६०९ साली काय झालं माहीत नाही. नवीन भूमीच्या शोधाच्या इतिहासामधल्या कदाचित सर्वात महत्त्वाच्या सफारीची फारशी नोंद त्यांनी केलेली नाही. रॉबर्ट ज्युव्हे या एकमेव इसमाने त्याच्या डायरीत तेव्हाच्या ‘मनहट्टा’ बेटाविषयीच्या, इथल्या लोकांविषयीच्या नोंदी ठेवल्या आहेत. पण त्यांना काय माहीत हो, की हे ‘मनहट्टा’ बेट अजून साधारण तीन-चारशे वर्षांनी जगातल्या कदाचित सर्वात महत्त्वाच्या शहराचा, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच ‘मॅनहॅटन’ म्हणून नावारूपाला येणार आहे ते!एरिक सॅन्डर्सन या लॅण्डस्केप इकॉलॉजिस्टला हे काही अनुत्तरित प्रश्न सतावू लागले. वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटीमध्ये काम करत असताना त्याने एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला होता. प्रकल्प होता ‘ह्यूमन फूटप्र्रिंट’ नावाचा. यामध्ये मानवजातीने आपल्या प्रगतीच्या प्रवासात पृथ्वीवर कुठे आणि कसा परिणाम केला आहे ते तपासून पाहण्याचा.त्याच्या प्रकल्पामध्ये न्यूयॉर्क शहराला खूप महत्त्व आहे. कारण त्यांच्या मते न्यूयॉर्क शहराने जेवढे बदल पाहिले, एवढ्या कमी काळात एवढा परिणाम सहन केला तेवढा कोणत्याही शहराने केलेला नाही. त्यामुळे या शहराच्या सुरुवातीचा इतिहास समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या या शोधात त्याने ‘मॅनहॅटन’ या भागाचा नकाशा तयार करण्याची सुरुवात केली. त्यामध्ये ‘मनहट्टा’ बेटावर पहिल्या आलेल्या गटाला हे बेट कसं दिसलं असेल, अशा विचाराने त्याने हा नकाशा काढायला सुरुवात केली. ‘मनहट्टा’ याचा अर्थ ‘पुष्कळ टेकड्यांची भूमी’. तर मग या टेकड्या आहेत कुठे? नोंदींमध्ये आढळलेले तलाव, झरे कुठे आहेत याचा शोध घ्यायला त्याने सुरुवात केली. या थ्रीडी नकाशामध्ये तेव्हा असलेली जीवसृष्टी, नद्या, डोंगर यांबद्दल माहिती आहे.या शहरामधल्या हरवलेल्या गोष्टींचा शोध घेताना त्याला जाणवलं की माणसाने कितीही इथल्या संसाधनांवर आक्रमण केले असले तरीही ४०० वर्षांपूर्वीचा या भूभागाचा बाज अजून तसाच आहे. हा भाग आहे नवनिर्मितीला जन्म देणारा, विविधता जपणारा आणि जोपासणारा, भरपूर ऊर्जा देणारा, असा.एरिक म्हणतो की हा सारा इतिहास आपल्याला हे शहर पुढच्या ४०० वर्षांमध्ये कसं वाढवायचं आहे हे ठरवायला मदत करेल.म्हणजे पहा, हे लोक पुढच्या चारपाचशे वर्षांचा विचार आत्तापासून करत आहेत. आपण विचार केला आहे का हो आपली शहरं अजून ४० वर्षांनी कशी असतील याचा? घेऊ शकू आपण नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई या आपल्या शहरांचा असा शोध?एरिककडून प्रेरणा घेण्यासाठी त्याच्या टेड टॉक नक्की ऐका!
पाहान्यूयॉर्क- बिफोर द सिटीhttps://www.ted.com/playlists/138/adventures_in_mapping