डॅनियल मकवान. मुंबईच्या जिजामाता उद्यानात जाऊन प्राण्यांचं निरीक्षण करायचं हा त्याचा आवडता उद्योग. बी.ए.ची पदवी मिळवल्यावर डॅनियलसाहेब गॅलिना नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले आणि तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी थेट तिच्या गावात मणिपुरात तमिंगलाँग गावी पोहचले. डॅनियल लग्नाची मागणी घालायला तिकडे गेला खरा; पण तिकडे गेल्यावर त्याला दिसला एक धक्कादायक प्रकार. हा प्रकार बघितला आणि तो तिथंच थांबला. आज त्याची पत्नी गॅलिना आणि तो तमिंगलाँगमध्ये वन्यप्राण्यांसाठी काम करतात.मणिपूरची राजधानी इम्फाळपासून तमिंगलाँग १६० किमी अंतरावर आहे. एकदम हिरवंगार आणि दाट झाडीने वेढलेलं. त्याच्याजवळच १० किमी अंतरावरच्या एका १३५ चौरस किलोमीटर अंतराच्या जंगलाला बायोडायव्हर्सिटी हेरिटेज एरिआ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जगातील अत्यंत दुर्मीळ प्राणी, पक्षी आणि वनस्पती, कीटक या जंगलामध्ये आढळतात. तमिंगलाँगमध्ये गॅलिनाबरोबर फिरताना त्याला एकेदिवशी रस्त्यावरच प्राणी आणि पक्षी मांडलेले दिसले. त्यामध्ये जंगलातून पकडून आणलेली खवल्या मांजरंही होती. रानमांजरं, खवल्या मांजरं, कासवं अशी भाजी मांडल्यासारखी पाहिल्यावर डॅनियलच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली. हे काही साधेसुधे प्राणी नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं तडक घरी येऊन कॉम्प्युटर उघडला आणि माहिती तपासली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं हे प्राणी संरक्षित यादीतले होते आणि त्यांची विक्री किंवा शिकार करणं बेकायदेशीर आहे. डॅनियलने या प्राण्यांबाबत चौकशी सुरू केली. खवल्या मांजरासारखे प्राणी म्यानमारमार्गे चीनमध्ये जातात असे लोकांनी त्याला सांगितलं. ईशान्य भारतामध्ये त्याचा औषधांसाठीही वापर होतो. वाघाची हाडं, खवल्या मांजराचे खवले, रानमांजराचं, अजगराचं, माकडाचं मांस आणि हाडं औषधांसाठी वापरले जातात. तो म्हणतो इकडे होणाऱ्या शिकारीच्या परिणामांचा अजून योग्य अभ्यास केलेला नाही अन्यथा इथल्या वन्यजीवांची घसरलेली संख्या नीट समजेल. वाघ, मगरी, कोल्हे, अस्वलं, क्लाउडेड लेपर्ड यांच्यासारखे असंख्य प्राणी आणि पक्षी तमिंंगलाँगच्या आसपासच्या प्रदेशातून नष्ट झाले आहेत असे तो सांगतो.ही सगळी माहिती अत्यंत धक्कादायक होती. डॅनियलने मग तिथं राहूनच काम करायचं ठरवलं. खवल्या मांजरं, कासवं, रानमांजरांची शिकार करू नका हे स्थानिकांना पटवून देणंच तसं अवघड; पण डॅनियलने हे काम हातात घेतलं. जाळ्यात सापडलेले पक्षी, जखमी प्राणी, पिंजºयातले प्राणी त्यानं विकत घ्यायला सुरुवात केली, त्यांच्यावर उपचार करून पुन्हा जंगलात सोडायचं काम त्यानं सुरू केलं. मणिपूरमध्ये प्राण्यांचे डॉक्टर फारसे नसल्यामुळे त्यानं महाराष्ट्रातल्या आपल्या मित्रांची मदत घेतली. एखादा जखमी प्राणी आणला की मग त्याच्यावर कसे उपचार करायचे, त्याला काय खायला द्यायचं, कधी खायला द्यायचं हे सगळं फोनवर तो समजून घेऊ लागला. एकदा त्यानं रानमांजराचं पिलू १००० रुपयांना विकत घेतलं. आईपासून ताटातूट झालेल्या त्या चिमुकल्या पिलाला काही तासांच्या अंतरानं दूध पाजण्याचा प्रयत्न केला; पण ते फार वेळ जगलं नाही.