- राजानंद मोरे
फक्त पुण्याची ‘केस’ घ्या!इथे किमान दोन ते अडीच लाख मुलं स्पर्धा परीक्षांच्या मार्केटची ‘ग्राहक’ आहेत.दोन-अडीच लाख गुणीले कोचिंग क्लासेसची फी गुणिले घरभाडं गुणीले जेवणाखाण्याचे पैसे...- एवढा जरी गुणाकार केला तरी तो आकडा येईल तो एकादमात वाचून दाखवणंसुद्धा मुश्कील!
काय करतोय?कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी.कुठं?पुण्यात!हे डायलॉग तरुण मुलांत इतके कॉमन की ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या ते तडक पुण्यात येतात. एकदा पुण्याला जाऊन ‘क्लासेस’ लावले की आपली नय्या पार या भावनेनंच भारी वाटायला लागतं. मग महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून मुलं पुण्यात येतात. काही यूपीएससीची स्वप्न पाहतात काही एमपीएससीत तरी आपला निभाव लागेल म्हणून तयारीला लागतात.‘तयारी’च ती, फुकट कशी होणार? त्यासाठी घसघशीत किंमत मोजावीच लागते. सरकारी नोकरीच्या सुरक्षित भविष्याची आस असलेले किंमत मोजतात आणि स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली पुण्यात उभा राहिलेला मोठा ‘उद्योग’ ती किंमत वसूल करतो. जे खपतं ते विकलं जातं किंवा जे विकलं जातं तेच खपतंय अशा दोन्ही अर्थानं पुण्यात स्पर्धा परीक्षांची मोठी इंडस्ट्रीच उभी राहिली आहे.राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या हजारो स्पर्धा परीक्षेच्छुक मुलामुलींच्या स्वागताला ही इंडस्ट्री पूर्ण तयारीनं सज्ज दिसते. पुण्यात शंभराहून अधिक स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लास आहेत. हजारो अभ्यासिका, वसतिगृह, कॉट बेसिसवर मिळणारी घरं, स्पर्धा परीक्षांसह सेल्फ हेल्प पुस्तक छापणाºया आणि विकणाºयांची साखळी हे सारं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पुणे शहर व उपनगरांमध्ये सुमारे अडीच ते तीन लाख मुलं-मुली आजच्या घडीला स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. या लाखांत एखादाच पहिल्या किंवा फार तर दुसºया प्रयत्नात यशस्वी होतो. बाकीचे अटेम्प्ट पे अटेम्प्ट करत राहतात. मिळेल ती परीक्षा देतात. कुणी विचारलं ‘काय करतोस?’ किंवा ‘काय करतेस?’, तर उत्तर तेच, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ! सालोसाल चालतं मग हे चक्र.उत्तरं बदलत नाही, प्रश्नही बदलत नाहीत. बदलतो फक्त एकच आकडा, तो म्हणजे खर्चाचा!एकीकडे पदांची संख्या कमी होतेय, दुसरीकडे परीक्षा देणाºयांची संख्या वाढतेय. स्पर्धा परीक्षांचा उद्योग त्यांना आशा देतो, लाखात एक होशील म्हणतो. मात्र प्रत्यक्षात तसं होत नाही. यासाºयात दोनच गोष्टी बदलतात : कॅलेण्डर बदलल्यानं वयाचा आकडा बदलतो आणि महागाईत खर्चाचा !शोधून पाहिलं की नक्की हे स्पर्धा परीक्षांचं अर्थकारण चालतं कसं,तर काय दिसतं?- पहिल्या फटक्यात दिसते कोट्यवधींची उलाढाल. हजारो मुलं गुणीले कोचिंग क्लासेसची फी गुणिले घरभाडं गुणीले जेवणाखाण्याचे पैसे हा एवढा जरी गुणाकार केला तरी तो आकडा येईल तो एकादमात वाचून दाखवणंसुद्धा मुस्कील ! मात्र आपल्या अवतीभोवतीचं स्पर्धा परीक्षांचं वास्तव आणि त्या चालवणारा उद्योग पाहता हे अर्थकारणही माहिती असलेलं बरं !
क्लास लावताय? - किमान ८० हजार रुपये !
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी वर्षाकाठी किमान लाखभर रुपये तरी खर्च करतो. बहुसंख्य मुलं ग्रामीण भागातील, दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातलीही. शेतीत राम नाही, निदान शिकून सरकारी नोकरी मिळेल या एका आशेवर हा खेळ सुरू होतो. काहीजण मग कर्ज काढतात. कुठं वडील शेतीचा तुकडा विकून क्लाससाठी मुलाला पैसे देतात. पुण्यात येऊन मग हमखास यशाचा वायदा करणारे अनेक खासगी क्लास लावले जातात. अनेक नामांकित क्लासेसची फी साधारण ७० ते ८० हजार रुपये इतकी असते. फी नाही. खरं तर त्याला ‘पॅकेज’ म्हणतात. प्रत्येक क्लासचे पॅकेज ठरलेले असतात. कोणतं पॅकेज निवडायचं हे ‘स्वातंत्र्य’ तेवढं मुलांना असतं ! पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, परीक्षांचा सराव, पुस्तकांचा संच, मार्गदर्शन, विषयनिहाय सराव यानुसार ही पॅकेज बेतलेली असतात. काहींना संपूर्ण पॅकेज परवडत नाही, मग ते आपल्या खिशाला परवडेल असं त्या त्या पॅकेजमधून सोयीचं ते निवडतात. शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाºया छोट्या-मोठ्या बड्या खासगी क्लासेसची संख्या शंभरपेक्षा जास्त आहे.
पर्सनल कोचिंगच्या वायद्याचे छोटे छोटे क्लासहे नामांकित क्लासही ज्यांना परवडत नाही ते पुण्यात अनेक छोटे छोटे क्लासेस लावतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे असे अनेक छोटे क्लासेस पुण्यात बक्कळ आहेत. अनेक मुलं त्या क्लासला जातात. काही फक्त सरावासाठी क्लास लावतात. त्यासाठीचे पैसे मोजतात. म्हणाल ते पॅकेज असंच साधारण चित्र. त्यापोटीही साधारण ४० ते ६० हजार रुपये मोजावेच लागतात. त्यात हे क्लासवाले व्यक्तिगत लक्ष, पर्सनल कोचिंग यावरही भर देत असल्याचं म्हणतात म्हणून मग नामांकित क्लासची गर्दी टाळून अनेकजण या छोट्या क्लासही जातात.
आपली अभ्यासिकाच बरी; पण साधी की एसी?हे सारंही ज्यांना परवडत नाही ते अभ्यासिकांकडे वळतात. आपली आपण पुस्तकं आणायची आणि अभ्यासिकेत अभ्यासाला जायचं असं करणाºयांची संख्या मोठी आहे. विशेषत: क्लासेस लावूनही उत्तीर्ण न होणारे मग अभ्यासिकात जाऊ लागतात.अभ्यासिकेचंही भाडं असतंच. अभ्यासिकेत बसायचे महिना साधारण ५०० ते १२०० रुपये द्यावे लागतात. पण या झाल्या साध्या अभ्यासिका. कम्फर्ट पाहिजे तर त्यांचेही पैसे वाढतात. पुणे शहरात आजच्या घडीला हजारहून जास्त अभ्यासिका आहेत. ज्यांना क्लास परवडत नाहीत, दिवसभर बसायची काही सोय नाही त्यांना या अभ्यासिका बºया वाटतात. काही साध्या चार बाकडे, वर्तमानपत्रांची सोयवाल्या. काही वातानुकूलित, संगणकाची सोय, ग्रंथालयाची सोय अशा संपन्न. त्यांचं मासिक भाडं जास्त असतं. ज्याचं जसं बजेट, त्याला तशी सोय हे समीकरण अभ्यासिकांनीही जुळवलं आहेच.
घरभाडं किती?शहरात आल्यानंतर शोध सुरू होतो घराचा. खासगी वसतिगृहं, वन-टू बीएचके फ्लॅटमध्ये १० ते १५ जणांची एकत्रित सोय होते. घरमालक विद्यार्थ्यांना जागा देतात. ते त्यांच्या फायद्याचं असतं. फक्त एक कॉट एवढीच सोय. दहा बाय दहाच्या खोलीतही पाच-सहा विद्यार्थी कोंबलेले असतात. याचं भाडं दोन ते अडीच हजाराच्या घरात. तसंही ही मुलं केवळ रात्री झोपण्यासाठीच तिथं येतात. मात्र झोपण्याची, आंघोळीची सोय म्हणून घरभाडं भरतात.
जेवणाचे किती पैसे?दिवस अभ्यासिका किंवा क्लासमध्येच जातो. म्हणून मग बहुसंख्य मुलं दुपारचं जेवणच स्किप मारतात. मात्र सकाळी चहा, नास्ता आणि रात्रीचं जेवण लागतं. काहीजण सकाळी नास्ता उशिरा करून रात्री एक वेळच्या जेवणाचा डबा फक्त लावतात. अनेकजण तर दोघांमध्ये एक मेसचा डबा लावतात. तेवढंच जेवतात. रविवारी खानावळ बंद असली की बिस्कीट किंवा वडापाववर दिवस काढतात. काहीजण मेसमध्ये काम करून तिथं आपल्या जेवणाची सोय लावून घेतात.खानावळीसाठी महिना किमान २२०० ते २५०० रुपये एका मुलामागे लागतातच ! याशिवाय निदान दोन वेळचा चहा हवा. पाचशे रुपये किमान चहासाठी तरी खर्च होतात.
खर्चिक जनरल नॉलेजस्पर्धा परीक्षा म्हणजे करंट अफेअर माहिती पाहिजे. जनरल नॉलेज पाहिजे. त्यासाठी वर्तमानपत्र, मासिके, इतर पुस्तके हवीत. ग्रंथालय लावायला हवं. त्यासाठी महिन्याला सरासरी हजार रुपये खर्च होतात.
एकूण खर्च किती?क्लासचा खर्च ४० ते ८० हजारांच्या घरात. बाकी राहणं, खाणं, चहापाणी, पुस्तकं आणि कपडालत्ता, औषधपाणी यापायी होणाºया खर्चाची बेरीज केली तर एका मुलाला वर्षाला किमान दीड लाख रुपये तरी पुण्यात तग धरून रहायला हवे. सुमारे अडीच लाख विद्यार्थी गुणीले किमान दीड लाख असा ढोबळ गुणाकार केला तर किती रक्कम होईल याचा विचार करून पहा.- स्पर्धा परीक्षांचा उद्योग किती तेजीत आहे हे स्पष्ट दिसतं.
( राजानंद लोकमतच्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आहे.)