लोकमत ‘ऑक्सिजन’ पुरवणीमधला हेरंब कुलकर्णी यांचा साधेपणानं लग्न करणार कोण? हा लेख वाचला. आपल्याकडे लग्न ही जितकी वैयक्तिक बाब आहे तितकीच ती सामाजिक बाबही आहे. कारण आपल्या कुटुंबातील लग्न करण्याच्या पद्धतीचे चांगले-वाईट परिणाम आवतीभोवतीच्या समाजावर कसे होतात हे आपण सगळेच पाहत आहोत. अलीकडेच माझ्या मोठय़ा भावानंही असंच हटके पद्धतीने लग्न केलं आणि कौतुकासोबतच त्याला, आम्हाला, वहिनीला आणि तिच्या घरच्यांनाही अनेकांचा रुसवा-फुगवा सहन करावा लागला. (ती तर पंजाबी आहे. त्यांच्याकडे लग्नविधी 3-4 दिवस चालतात. म्हणजे विचार करा??) पण आज सर्वानाच त्यांच्या निर्णयाचं कौतुक वाटतं! मी ही जेव्हा केव्हा लग्न करीन तेव्हा तेही साधेपणाने करेन. मात्र कुलकर्णीच्या लेखातला एक मुद्दा मला मान्य आहे की विवाह पद्धतीचा इव्हेण्ट करण्यापेक्षा वैवाहिक आयुष्याचा सोहळा व्हावा. लग्न करण्याच्या पद्धतीतूनच त्या सोहळयाला सुरुवात होऊ शकते. लग्न नोंदणी पद्धतीनं करणं, हुंडा न घेणं, न देणं, मंगल कार्यालय, रोषणाई, कपडे, दागिने, फोटोग्राफी यावर कमीत कमी खर्च करणं यासारख्या अनेक मुद्दय़ांचं मी समर्थन करते. आपण सर्वानीच साधेपणानं लग्न या गोष्टीचा प्रामाणिकपणे विचार करून कृती करायला हवी. - वीणा जामकर
साधेपणानं लग्न यासंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर हेरंब कुलकर्णी यांच्याशी herambkulkarni1971@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करा.